पाणीटंचाई व स्वच्छतेचा प्रश्न ऐरणीवर; चिखलीत काँग्रेस-राष्ट्रवादी नगरसेवक आक्रमक

KHOZ MASTER
1 Min Read

चिखली

शहरातील वाढती पाणीटंचाई, विस्कळीत पाणीपुरवठा आणि ढासळलेली स्वच्छता व्यवस्था यावरून काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) नगरसेवकांनी नगर परिषद प्रशासनाविरोधात आक्रमक भूमिका घेतली आहे. या संदर्भात प्रशासनाला निवेदन देत तातडीने उपाययोजना न झाल्यास नागरिकांना सोबत घेऊन तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा देण्यात आला आहे.

निवेदनात नगरसेवकांनी आरोप केला आहे की शहरात सुरू असलेली नवीन पाणीपुरवठा योजना कंत्राटदाराच्या निष्काळजीपणामुळे रखडली आहे. यामुळे जुन्या पाइपलाइनद्वारे होणारा पाणीपुरवठा विस्कळीत झाला असून काही भागात ८ दिवसांनी तर काही भागात तब्बल २० दिवसांनी पाणी मिळत असल्याने नागरिकांना गंभीर अडचणींचा सामना करावा लागत आहे.

त्याचबरोबर शहरातील कचरा व्यवस्थापन पूर्णपणे कोलमडल्याचा आरोपही करण्यात आला आहे. नियमित कचरा संकलन, नाल्यांची साफसफाई आणि आरोग्यविषयक सुविधा अपुऱ्या पडत असल्याने नागरिकांच्या आरोग्यावर परिणाम होत असल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे.

या निवेदनावर प्राचार्य डॉ. निलेश गावंडे, डॉ. मो. इसरार, प्रा. मिनलताई गावंडे, उबेद अली खान, आनंद बोंद्रे, गोकुळ शिंगणे, संतोष देशमुख, रत्नदीप शिनगारे, गोपाल देव्हडे, प्रशांत भटकर यांच्यासह अनेक नगरसेवकांच्या सह्या आहेत.

या वेळी डॉ. निलेश गावंडे यांनी प्रशासनावर टीका करत गेल्या सहा महिन्यांपासून पाणीपुरवठा आणि स्वच्छतेचे प्रश्न प्रलंबित असल्याचा आरोप केला. नागरिकांच्या कराचा पैसा योग्य विकासकामांसाठी वापरला जावा, अशी मागणीही त्यांनी केली.

Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *