चिखली बसस्थानकावर ‘हिरकणी कक्ष’ सुरू; स्तनदा मातांसाठी सुरक्षित सुविधा उपलब्ध

KHOZ MASTER
1 Min Read

चिखली 

सार्वजनिक ठिकाणी स्तनदा मातांना होणारी गैरसोय दूर करण्यासाठी राज्य शासनाच्या महिला व बाल विकास विभागामार्फत राबविण्यात येणाऱ्या ‘हिरकणी कक्ष’ योजनेअंतर्गत चिखली बसस्थानकावर आधुनिक सुविधा असलेला हिरकणी कक्ष सुरू करण्यात आला आहे.

चिखली बसस्थानक येथे उभारण्यात आलेला हा कक्ष प्री-फॅब्रिकेटेड स्वरूपात असून, जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी कार्यालय आणि जिल्हा नियोजन समितीच्या माध्यमातून जिल्हा वार्षिक योजना २०२५-२६ अंतर्गत हा उपक्रम राबविण्यात आला आहे. याची अंमलबजावणी मे. अयान ग्रीन इन्फ्रा LLP, नाशिक यांच्या माध्यमातून करण्यात आली आहे.

या कक्षामध्ये स्तनदा मातांसाठी बसण्याची सुविधा, पलंग, व्हीआयपी खुर्ची, पंखे, एलईडी टीव्ही, थंड पाण्याची सोय तसेच लहान मुलांसाठी खेळणी उपलब्ध करून देण्यात आली आहे. त्यामुळे प्रवासादरम्यान महिलांना सुरक्षित, स्वच्छ आणि खाजगी वातावरणात स्तनपानाची सुविधा मिळणार आहे.

या कक्षाची पाहणी २१ मे रोजी आगार व्यवस्थापक संतोष जोगदंडे, सागर परदेशी आणि इतर अधिकाऱ्यांनी केली. या वेळी एसटी बसने प्रवास करणाऱ्या महिलांनी या सुविधेचा लाभ घ्यावा, असे आवाहन करण्यात आले.

Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *