चिखली
शहरातील पाणीटंचाई, विस्कळीत पाणीपुरवठा आणि स्वच्छतेच्या गंभीर समस्यांबाबत राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) आणि काँग्रेसच्या नगरसेवकांनी चिखली नगर परिषद प्रशासनाला निवेदन सादर केले आहे. या समस्यांवर तातडीने उपाययोजना न झाल्यास आंदोलन छेडण्याचा इशाराही देण्यात आला आहे.
निवेदनात शहरातील नवीन पाणीपुरवठा योजनेचे काम निष्काळजीपणे सुरू असल्याचा आरोप करण्यात आला आहे. त्यामुळे जुन्या पाइपलाईनद्वारे होणारा पाणीपुरवठा विस्कळीत झाला असून काही भागात आठ दिवसांनी तर काही ठिकाणी तब्बल वीस दिवसांनी पाणी मिळत असल्याचे नमूद करण्यात आले आहे.
शहरातील कचरा व्यवस्थापन आणि स्वच्छता व्यवस्था ढासळल्याचाही आरोप करण्यात आला आहे. अनेक कचरा गाड्या नादुरुस्त असून नियमित कचरा संकलन होत नसल्याचे नगरसेवकांचे म्हणणे आहे. तसेच नाल्यांची साफसफाई वेळेवर होत नसल्याने नागरिकांच्या आरोग्यावर परिणाम होत असल्याचे निवेदनात म्हटले आहे.
या पार्श्वभूमीवर प्रशासनाने तातडीने ठोस उपाययोजना कराव्यात, अशी मागणी करण्यात आली आहे. अन्यथा नागरिकांना सोबत घेऊन तीव्र आंदोलन करण्यात येईल, असा इशाराही नगरसेवकांनी दिला आहे.
या निवेदनावर प्राचार्य डॉ. निलेश गावंडे, डॉ. मो. इसरार, प्रा. मिनल गावंडे, उबेद अली खान, आनंद बोंद्रे, अमोल लहाने, गोकुळ शिंगणे, संतोष देशमुख, रत्नदीप शिनगारे, गोपाल देव्हडे, प्रशांत भटकर, डॉ. प्रकाश शिंगणे आदी नगरसेवकांच्या सह्या आहेत.
दरम्यान, प्रशासन यावर काय भूमिका घेते याकडे नागरिकांचे लक्ष लागले आहे.
