सिंदखेड राजा व देऊळगाव राजा तालुक्यात वादळी पाऊस व गारपीट , राहेरी बु. येथे वीज पडून दुचाकीस्वार ठार; एक गंभीर जखमी

KHOZ MASTER
3 Min Read

सिंदखेड राजा/देऊळगाव राजा :

खामगाव जिल्ह्यात सोमवारी सायंकाळी अचानक झालेल्या हवामान बदलामुळे सिंदखेड राजा व देऊळगाव राजा तालुक्यात वादळी वाऱ्यासह मुसळधार पाऊस आणि गारपीटीने नागरिकांना अक्षरशः झोडपून काढले. या नैसर्गिक संकटात सिंदखेड राजा तालुक्यातील राहेरी बु. येथे वीज कोसळून एका दुचाकीस्वाराचा मृत्यू झाला असून दुसरा गंभीर जखमी झाला आहे. तर अंढेरा परिसरात घरांवरील टिनपत्रे उडून झाडे उन्मळून पडल्याच्या घटना घडल्या.

राहेरी बु. येथे वीज कोसळून एकाचा मृत्यू

राहेरी बु. येथील प्रतिनिधीकडून मिळालेल्या माहितीनुसार, सोमवारी रात्री अंदाजे ९ वाजताच्या सुमारास दोन जण दुचाकीने शेतातून घरी परतत होते. यावेळी अचानक विजांचा कडकडाट सुरू असताना त्यांच्या अंगावर वीज कोसळली. या दुर्घटनेत लक्ष्मीकांत भगवानराव देशमुख (वय ५०) यांचा जागीच मृत्यू झाला. तर बालू रामलाल मगर (वय ४५) हे गंभीर जखमी झाले असून त्यांना पुढील उपचारासाठी जालना येथे हलविण्यात आले आहे. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.

देऊळगाव राजा तालुक्यात गारपीट व वादळी वाऱ्याचा तडाखा

देऊळगाव राजा शहर व तालुक्यात सोमवारी सायंकाळी अचानक काळे ढग दाटून आले आणि काही क्षणांतच वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाला सुरुवात झाली. अनेक ठिकाणी गारपीट झाल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले. जोरदार वाऱ्यामुळे काही घरांचे स्लॅब हादरले तर विविध भागांमध्ये झाडे उन्मळून पडली.

वादळी वाऱ्यामुळे वीजवाहिन्यांमध्ये बिघाड होऊन शहरातील अनेक भागांचा वीजपुरवठा खंडित झाला. अचानक वीज गेल्याने नागरिकांना अंधारातच वेळ काढावी लागली. काही ठिकाणी रस्त्यावर झाडांच्या फांद्या पडल्याने वाहतुकीलाही अडथळा निर्माण झाला.

अंढेरा परिसरात घरांचे नुकसान

अंढेरा येथील वार्ताहराने दिलेल्या माहितीनुसार, अंढेरासह पिंपरी आंधळे व परिसरातील अनेक गावांमध्ये दुपारनंतर अचानक हवामान बदलून वादळी वाऱ्यासह जोरदार गारपीट झाली. सोसाट्याच्या वाऱ्यामुळे अनेक घरांवरील टिनपत्रे उडाली असून काही घरांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. गोठ्यांचेही नुकसान झाल्याचे समोर आले आहे.

वादळी पावसामुळे शेतात पाणी साचले असून फळबागा व भाजीपाला पिकांना मोठा फटका बसला आहे. काही ठिकाणी झाडे उन्मळून पडल्याने वीजपुरवठा काही काळ खंडित झाला होता. उन्हाच्या तीव्रतेने हैराण झालेल्या नागरिकांना पावसामुळे काहीसा दिलासा मिळाला असला तरी अचानक झालेल्या गारपिटीमुळे शेतकऱ्यांचे मोठे आर्थिक नुकसान झाले आहे.

पंचनाम्याची मागणी

खरीप हंगामाच्या पेरणीपूर्व तयारीसाठी शेतकरी बियाणे व खतांची जुळवाजुळव करत असताना आलेल्या या अवकाळी संकटामुळे शेतकऱ्यांसमोर आर्थिक अडचणी उभ्या राहिल्या आहेत. दरम्यान, तहसीलदार वैशाली डोगरजाड यांनी अंढेरा फाटा परिसराला भेट देऊन परिस्थितीची पाहणी केली. नुकसानग्रस्त भागांचा तातडीने पंचनामा करून मदत जाहीर करण्याची मागणी शेतकऱ्यांकडून करण्यात येत आहे.

Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *