ताट भरतेय; पण ‘पोषणाची भूक’ अजूनही कायम

KHOZ MASTER
2 Min Read

धान्य मिळते; पण बालकांत कुपोषणाची समस्या गंभीर

बुलढाणा 
जागतिक भूक दिनानिमित्त जिल्ह्यातील पोषण आणि कुपोषणाच्या वास्तवावर पुन्हा एकदा चर्चा सुरू झाली आहे. शासनाकडून धान्य, पोषण आहार आणि विविध योजनांची अंमलबजावणी होत असली तरी ग्रामीण भागात आजही अनेक कुटुंबांमध्ये कुपोषणाची समस्या गंभीर स्वरूपात कायम असल्याचे चित्र आहे.

महिला व बालविकास मंत्रालयाच्या ‘पोषण ट्रॅकर’ अहवालानुसार जिल्ह्यातील हजारो बालकांमध्ये कुपोषणाची लक्षणे आढळून आली आहेत. उपलब्ध आकडेवारीनुसार बुलढाणा जिल्ह्यात सुमारे २.३९ टक्के बालके कुपोषित तर १३.३३ टक्के बालकांचे वजन कमी असल्याचे समोर आले आहे. तज्ज्ञांच्या मते, ही परिस्थिती चिंताजनक असून भविष्यातील पिढीसाठी धोक्याची घंटा मानली जात आहे.

आरोग्य तज्ज्ञांच्या मते, कुपोषणामागे केवळ अन्नाचा अभाव कारणीभूत नसून योग्य पोषणमूल्यांचा अभाव, असंतुलित आहार, गरिबी, बेरोजगारी, स्वच्छतेचा अभाव आणि आरोग्यविषयक अपुरी जागरूकता ही देखील प्रमुख कारणे आहेत. ग्रामीण भागातील अनेक कुटुंबांमध्ये आजही मुलांच्या आहारात प्रथिने, जीवनसत्त्वे आणि आवश्यक पोषकतत्त्वांचा अभाव दिसून येतो.

दरम्यान, अंगणवाडी आणि शाळांमधून पोषण आहार दिला जात असला तरी त्याची प्रभावी अंमलबजावणी, नियमित आरोग्य तपासणी आणि पालकांमध्ये जनजागृती आवश्यक असल्याचे मत व्यक्त केले जात आहे. विशेषतः गर्भवती माता, स्तनदा महिला आणि लहान बालकांच्या पोषणाकडे अधिक लक्ष देण्याची गरज तज्ज्ञांनी व्यक्त केली आहे.

जागतिक भूक दिनाच्या निमित्ताने सामाजिक संस्था, आरोग्य विभाग आणि प्रशासनाने केवळ धान्यपुरवठ्यावर न थांबता ‘संतुलित पोषण’ या संकल्पनेवर भर देण्याची आवश्यकता असल्याचे मत जाणकारांनी व्यक्त केले. “ताट भरलं म्हणजे पोट भरतं; पण योग्य पोषण मिळालं तरच शरीर आणि भवितव्य मजबूत होतं,” अशी प्रतिक्रिया आरोग्य क्षेत्रातील अभ्यासकांनी दिली.

ग्रामीण भागातील कुपोषणमुक्त समाज घडविण्यासाठी शासन, प्रशासन आणि नागरिकांनी एकत्रितपणे प्रयत्न करण्याची गरज असून, पोषणाबाबत जनजागृती ही काळाची गरज असल्याचेही यावेळी अधोरेखित करण्यात आले.

Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *