चाकूर पंचायत समितीतील मनरेगा भ्रष्टाचार प्रकरणाची SIT चौकशी करण्याची मागणी

KHOZ MASTER
1 Min Read

१०० कोटींच्या गैरव्यवहाराची कसून चौकशी करून दोषींवर कठोर कारवाईची मागणी

चाकूर प्रतिनिधी :
चाकूर तालुक्यातील पंचायत समिती अंतर्गत महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेत (मनरेगा) अंदाजे १०० कोटी रुपयांचा भ्रष्टाचार झाल्याचा गंभीर आरोप करत या प्रकरणाची विशेष तपास यंत्रणा (SIT) मार्फत सखोल चौकशी करण्यात यावी, अशी मागणी लोकनेते बालाजी पाटील चाकूरकर यांनी केली आहे.

यासंदर्भात त्यांनी मुंबई येथे राज्याचे मुख्यमंत्री, दोन्ही उपमुख्यमंत्री, राज्याचे मुख्य सचिव तसेच पंचायतराज व ग्रामविकास विभागाच्या अप्पर सचिवांसह महाराष्ट्र शासनातील वरिष्ठ अधिकाऱ्यांची प्रत्यक्ष भेट घेत निवेदन सादर केले.

निवेदनात पंचायत समिती अंतर्गत मनरेगा योजनांमध्ये मोठ्या प्रमाणावर आर्थिक गैरव्यवहार झाल्याचा आरोप करण्यात आला आहे. संबंधित प्रकरणात अधिकारी, कर्मचारी, अभियंते, ग्रामसेवक, सरपंच आणि इतर संबंधित घटकांच्या भूमिकेची निष्पक्ष चौकशी करण्याची मागणी करण्यात आली आहे. तसेच दोषी आढळणाऱ्यांवर कठोर कारवाई करून शासनाची रक्कम वसूल करण्यात यावी, असेही निवेदनात नमूद करण्यात आले आहे.

बालाजी पाटील चाकूरकर यांनी सांगितले की, ग्रामीण विकासासाठी असलेल्या निधीचा अपहार झाल्यास त्याचा थेट परिणाम सामान्य नागरिक आणि शेतकरी वर्गावर होतो. त्यामुळे या प्रकरणात कोणालाही पाठीशी न घालता पारदर्शक चौकशी होणे आवश्यक आहे.

दरम्यान, या प्रकरणामुळे चाकूर तालुक्यात मोठी खळबळ उडाली असून, शासन या मागणीची दखल घेऊन SIT चौकशी जाहीर करणार का, याकडे नागरिकांचे लक्ष लागले आहे.

Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *