माळशिरस तालुक्यात महावितरणकडून वीजचोरी करणाऱ्या शेतकऱ्यांच्या मोटारी व स्टार्टर पेट्या जप्त

KHOZ MASTER
2 Min Read

​सायंकाळच्या लोडशेडिंगने नागरिक हैराण; वाढत्या अनधिकृत लोडवर नियंत्रण मिळवण्यासाठी महावितरणची विशेष मोहीम

माळशिरस ;

​सध्या शेतीच्या हंगामामुळे शेतीपंपांसाठी विजेची मागणी मोठ्या प्रमाणावर वाढली आहे. मात्र, काही शेतकऱ्यांकडून वीजतारांवर अनधिकृत आकडे टाकून मोठ्या प्रमाणावर वीजचोरी केली जात आहे. या अनधिकृत आणि अतिरिक्त भारामुळे (लोड) वीज वितरण यंत्रणेवर मोठा ताण येत असून, नाईलाजाने महावितरणला सायंकाळी ६ ते रात्री १० या वेळेत ‘सिंगल फेज लोडशेडिंग’ करावे लागत आहे. या समस्येवर तोडगा काढण्यासाठी आणि अनधिकृत वीजचोरीला आळा घालण्यासाठी माळशिरस तालुक्यात महावितरणने आता अत्यंत कडक पावले उचलली आहेत.
​सायंकाळची वेळ ही घरात वर्दळीची आणि विद्यार्थ्यांच्या अभ्यासाची असते. नेमक्या याच वेळी ६ ते १० या वेळेत सिंगल फेज लोडशेडिंग होत असल्याने सर्वसामान्य नागरिकांना अंधारात राहावे लागत आहे.विजेअभावी उकाड्याने आणि अंधारामुळे वयोवृद्ध तसेच आजारी माणसांना या लोडशेडिंगचा सर्वाधिक नाहक त्रास सहन करावा लागत आहे.

​वाढत्या अनधिकृत लोडमुळे ट्रान्सफॉर्मर जळण्याचे आणि तांत्रिक बिघाड होण्याचे प्रमाणही वाढले आहे. हे सर्व थांबवण्यासाठी आणि प्रामाणिक ग्राहकांना अखंडित वीजपुरवठा देण्यासाठी अकलूज विभागातील महावितरणच्या कर्मचाऱ्यांनी वीजचोरांविरुद्ध विशेष मोहीम हाती घेतली आहे.

​अनधिकृत आकडे टाकून वीजचोरी करणाऱ्या शेतकऱ्यांच्या शेतावर थेट धाडी टाकल्या जात आहेत.​वीजचोरी उघडकीस आल्यास तात्काळ शेतीपंपाच्या मोटारी आणि स्टार्टर पेट्या (पेटी) जागेवरून काढून जप्त केल्या जात आहेत.
​ही कारवाई अत्यंत वेगाने सुरू असून यामुळे अनधिकृत वीज वापरणाऱ्यांचे धाबे दणाणले आहेत.

अकलूज विभागाचे कार्यकारी अभियंता संपत गावडे यांच्या मार्गदर्शनाखाली लोड शेडिंग बंद व्हावे यासाठी अनाधिकृत विजचोरी करणाऱ्या नागरिकांवर कारवाई करण्याचे काम सुरू आहे.वीजचोरी करताना आढळल्यास केवळ साहित्य जप्त होणार नाही,तर दंडात्मक आणि कायदेशीर कारवाईलाही सामोरे जावे लागेल, सिंगल फेज मध्ये शेती पंप मोटारी चालवू नये यामुळे अनधिकृत लोड कमी होऊन सर्वसामान्य नागरिकांना सायंकाळच्या लोडशेडिंगपासून दिलासा मिळेल,असे वेळापूर चे उपकार्यकारी अभियंता रवीकुमार दासरी यांनी सांगितले.

Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *