धाड येथील पेट्रोल पंपावर रात्री ११ वाजता धडक; प्रशासनाच्या हस्तक्षेपानंतर डिझेल वाटप सुरू
बुलढाणा प्रतिनिधी :
सध्या राज्यभर पेट्रोल आणि डिझेलची टंचाई निर्माण झाल्याने सर्वसामान्य नागरिकांसह शेतकरी वर्ग अडचणीत सापडला आहे. खरिपाच्या हंगामाच्या तोंडावर शेतीकामांसाठी आवश्यक असलेल्या डिझेलसाठी शेतकऱ्यांना रात्रभर रांगेत उभे राहावे लागत असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. अशाच एका प्रकारामुळे धाड येथील भोंडे पेट्रोल पंपावर तणाव निर्माण झाला होता. मात्र ॲड. शर्वरी रविकांत तुपकर यांच्या आक्रमक भूमिकेमुळे अखेर प्रशासन आणि पेट्रोल पंप चालकाला नमते घ्यावे लागले असून, मध्यरात्री १२ वाजता डिझेल वाटप सुरू करण्यात आले.
मिळालेल्या माहितीनुसार, धाड येथील भोंडे पेट्रोल पंपावर २६ मे रोजी दुपारी डिझेलचा टँकर दाखल झाला होता. टँकर रिकामा करून तत्काळ डिझेल वितरण अपेक्षित असताना शेतकऱ्यांना तब्बल तीन दिवस प्रतीक्षा करावी लागल्याचा आरोप करण्यात आला आहे. रात्री १० वाजेपर्यंत अनेक शेतकरी डिझेलसाठी रांगेत उभे होते. मात्र “आता डिझेल मिळणार नाही, उद्या सकाळी वाटप होईल,” असे सांगण्यात आल्याने शेतकऱ्यांमध्ये संतापाची लाट उसळली.
परिस्थिती गंभीर होत असल्याचे लक्षात येताच शेतकऱ्यांनी शेतकरी नेते रविकांत तुपकर यांच्या पत्नी ॲड. शर्वरी तुपकर यांच्याशी संपर्क साधला. माहिती मिळताच त्यांनी तत्काळ धाड येथील पेट्रोल पंपावर धडक देत व्यवस्थापनाला जाब विचारला आणि शेतकऱ्यांना तातडीने डिझेल देण्याची मागणी केली.
सुरुवातीला पंप प्रशासनाने टाळाटाळ करण्याचा प्रयत्न केल्याचे सांगितले जाते. मात्र ॲड. तुपकर यांनी तातडीने जिल्हा प्रशासनाशी संपर्क साधून संपूर्ण परिस्थितीची माहिती दिली. “खरिपाचा हंगाम तोंडावर असताना शेतकऱ्यांना डिझेलसाठी वणवण भटकावे लागत आहे. डिझेल उपलब्ध असतानाही ते न देणे हा शेतकऱ्यांवरील अन्याय असून बळीराजाची अशी अडवणूक खपवून घेतली जाणार नाही,” असा इशारा त्यांनी यावेळी दिला.
अखेर प्रशासनाच्या हस्तक्षेपानंतर रात्री ठीक १२ वाजता पेट्रोल पंपावर डिझेल वाटप पुन्हा सुरू करण्यात आले. यावेळी क्रांतिकारी शेतकरी संघटनेचे बंडू उर्फ समाधान नागवे, आकाश माळोदे, गजानन नाईकवाडे यांच्यासह परिसरातील शेकडो शेतकरी उपस्थित होते.
दरम्यान, या घटनेमुळे इंधन टंचाईच्या पार्श्वभूमीवर ग्रामीण भागातील शेतकऱ्यांच्या अडचणी पुन्हा एकदा समोर आल्या असून, प्रशासनाने इंधन वितरण अधिक पारदर्शक आणि सुरळीत करण्याची मागणी शेतकरी वर्गातून होत आहे.
