जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थिनीची ऐतिहासिक कामगिरी; ५,३६४ मीटर उंच ‘माउंट एव्हरेस्ट बेस कॅम्प’ यशस्वी सर*

KHOZ MASTER
1 Min Read

बुलढाणा 

बुलढाणा जिल्ह्यातील साखळी बुद्रुक गावातील जिल्हा परिषद शाळेत शिकणारी विद्यार्थिनी सिद्धी विठ्ठल सोनुने हिने प्रतिकूल आणि अत्यंत कठीण परिस्थितीवर मात करत ५,३६४ मीटर उंचीवरील ‘माउंट एव्हरेस्ट बेस कॅम्प’ यशस्वीपणे सर करून उल्लेखनीय कामगिरी केली आहे. या कामगिरीमुळे जिल्ह्यासह संपूर्ण राज्याचे नाव उज्ज्वल झाले आहे.

अत्यंत कमी तापमान, उणे १० अंश सेल्सिअसपर्यंत घसरलेले हवामान आणि सुमारे १२० किलोमीटरचा कठीण ट्रेक अशा आव्हानात्मक परिस्थितीतही सिद्धीने कोणत्याही विशेष मदतीशिवाय हा प्रवास पूर्ण केला. विशेष म्हणजे, जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थिनीने एवढ्या उंचीवरील मोहीम यशस्वी करून दाखवणे ही दुर्मिळ आणि प्रेरणादायी घटना मानली जात आहे.

एव्हरेस्ट बेस कॅम्प येथे पोहोचल्यावर तिने भारताचा तिरंगा ध्वज फडकावत राष्ट्रगीत गायले तसेच छत्रपती शिवाजी महाराजांचा भगवा ध्वज फडकावत मानवंदना दिली. या क्षणी उपस्थित असलेल्या सहप्रवासी व मार्गदर्शकांमध्ये अभिमानाची भावना निर्माण झाली.

सिद्धी सोनुने हिची ही जिद्द, चिकाटी आणि साहसी वृत्ती ही ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांसाठी विशेष प्रेरणादायी ठरत आहे. जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थिनीने आंतरराष्ट्रीय स्तरावरील अशा मोहिमेत मिळवलेले यश हे शिक्षण व्यवस्थेतील क्षमतेचेही उदाहरण मानले जात आहे.

या यशाबद्दल तिचे सर्व स्तरांतून कौतुक होत असून भविष्यातही अशाच प्रकारे ती अधिक मोठी शिखरे सर करेल, अशा शुभेच्छा व्यक्त केल्या जात आहेत.

Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *