चिखली
महाराष्ट्र राज्याचे माजी मंत्री तथा ज्येष्ठ समाजसेवक स्व. भारतभाऊ बोंद्रे यांच्या सार्वजनिक जीवनातील उल्लेखनीय कार्याप्रति कृतज्ञता व्यक्त करत महाराष्ट्र शासनाच्या वतीने त्यांच्या निवासस्थानी भेट देऊन विधानसभेचे सन्मानचिन्ह व स्मृतिपत्र परिवारास प्रदान करण्यात आले.
स्व. भारत राजाभाऊ बोंद्रे यांचे काही दिवसांपूर्वी वृद्धापकाळाने दुःखद निधन झाले. त्यांच्या निधनाबद्दल महाराष्ट्र विधानसभेने सोमवार, ८ डिसेंबर २०२५ रोजी एकमताने शोकप्रस्ताव संमत करून श्रद्धांजली अर्पण केली होती.
कै. भारतभाऊ बोंद्रे यांचा जन्म १ ऑगस्ट १९४३ रोजी चिखली येथे झाला होता. त्यांनी बी.एस्सी. व एलएल.बी. पर्यंत शिक्षण घेतले होते. सामाजिक आणि राजकीय क्षेत्रात सक्रिय कार्य करताना त्यांनी विवेकानंद व्यायामशाळेचे अध्यक्ष, लायन्स क्लबचे उपाध्यक्ष तसेच चिखली शहर युवक काँग्रेसचे अध्यक्ष म्हणूनही जबाबदाऱ्या सांभाळल्या होत्या.
बुलढाणा जिल्ह्यातील सिंचन विकासामध्ये त्यांचे महत्त्वपूर्ण योगदान राहिले. खडकपूर्णा प्रकल्पासह जिगाव, पेन टाकळी, कोराडी आणि नळगंगा प्रकल्पांच्या उभारणीत त्यांनी पुढाकार घेतला. शेतकऱ्यांना जलसिंचनाची सुविधा उपलब्ध झाल्यास त्यांचे आर्थिक जीवनमान उंचावेल, या भूमिकेतून त्यांनी विविध प्रकल्पांसाठी सातत्याने प्रयत्न केले.
स्व. भारतभाऊ बोंद्रे हे सन १९७२, १९८०, १९८५ आणि १९९० अशा चार वेळा चिखली विधानसभा मतदारसंघातून निवडून आले होते. त्यांनी जून १९८८ ते मार्च १९९० या कालावधीत पाटबंधारे खात्याचे राज्यमंत्री म्हणून तर मार्च १९९० ते जून १९९१ या कालावधीत उद्योग, शिक्षण व तंत्रशिक्षण खात्यांचे मंत्री म्हणून कार्यभार सांभाळला होता.
त्यांनी समाजकारण, लोकसेवा आणि विकासकामांत दिलेले योगदान प्रेरणादायी असून त्यांच्या कार्याची आठवण कायम राहील, अशा भावना यावेळी व्यक्त करण्यात आल्या.
यावेळी चिखलीचे नगराध्यक्ष श्री. पंडितदादा देशमुख, उपविभागीय अधिकारी श्री. शरद पाटील, अप्पर तहसीलदार श्री. सौरभ गावंडे, मंडलाधिकारी श्री. ए. टी. शेळके, राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हा कार्याध्यक्ष श्री. शंतनू बोंद्रे यांच्यासह विविध मान्यवर उपस्थित होते.
