जनतेच्या तक्रारींवर थेट पाठपुरावा; जनता दरबारातील समस्या तातडीने सोडविण्याचे निर्देश

KHOZ MASTER
2 Min Read

चिखली 

‘जनता दरबार’ उपक्रमात प्राप्त झालेल्या तक्रारींच्या निपटाऱ्यासाठी तहसील कार्यालय, चिखली येथे अधिकाऱ्यांसोबत आढावा बैठक घेण्यात आली. यावेळी जनतेच्या प्रत्येक तक्रारीची गंभीर दखल घेऊन त्यावर तातडीने आणि प्रभावी कार्यवाही करण्याचे स्पष्ट निर्देश संबंधित अधिकारी व कर्मचाऱ्यांना देण्यात आले.

चिखली विधानसभा मतदारसंघातील नागरिकांसाठी दरमहा पहिल्या सोमवारी तहसील कार्यालयात ‘जनता दरबार’ उपक्रम सुरू करण्यात आला आहे. मे महिन्यात पार पडलेल्या पहिल्या जनता दरबारास मतदारसंघातील विविध भागांतून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. शेतकरी, महिला, युवक, ज्येष्ठ नागरिक यांच्यासह विविध घटकांनी जमीन, पाणी, रस्ते, वीज, शासकीय योजनांचा लाभ तसेच महसूल विभागाशी संबंधित जवळपास २५० तक्रारी मांडल्या.

या सर्व तक्रारींचा वेळेत निपटारा व्हावा यासाठी आयोजित आढावा बैठकीत प्रत्येक प्रकरणाचा सविस्तर आढावा घेण्यात आला. कोणत्या तक्रारी निकाली काढण्यात आल्या, कोणत्या प्रलंबित आहेत, त्यामागील कारणे काय आहेत तसेच संबंधित उपाययोजना कोणत्या टप्प्यावर आहेत, याबाबत अधिकाऱ्यांकडून माहिती घेण्यात आली.

यावेळी अधिकाऱ्यांना स्पष्ट शब्दांत निर्देश देण्यात आले की, पहिल्या जनता दरबारात प्राप्त झालेल्या सर्व तक्रारींचा निपटारा दुसरा जनता दरबार होण्यापूर्वी म्हणजेच १ जून २०२६ पूर्वी पूर्ण करण्यात यावा. एकही तक्रार प्रलंबित राहणार नाही याची दक्षता घेण्याचे आदेश देण्यात आले. तक्रारींच्या निपटाऱ्यात दिरंगाई झाल्यास संबंधित अधिकाऱ्यांवर जबाबदारी निश्चित केली जाईल, असा इशाराही यावेळी देण्यात आला.

दरम्यान, दुसरा ‘जनता दरबार’ १ जून २०२६ रोजी तहसील कार्यालय, चिखली येथे आयोजित करण्यात आला असून मतदारसंघातील ज्या नागरिकांच्या शासकीय तक्रारी, अडचणी किंवा समस्या प्रलंबित आहेत, त्यांनी उपस्थित राहून आपल्या समस्या मांडाव्यात, असे आवाहन करण्यात आले आहे.

जनतेच्या समस्या थेट शासन दरबारी पोहोचवून त्यांचे त्वरित निराकरण करण्यासाठी हा उपक्रम प्रभावी माध्यम ठरत असून लोकप्रतिनिधी आणि जनता यांच्यातील विश्वास अधिक दृढ करण्याचा प्रयत्न असल्याचे यावेळी सांगण्यात आले.

Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *