नांदेड (प्रतिनिधी) : भारतातील ८५ टक्के बहुजन समाजात राजकीय व सामाजिक जागृती निर्माण करणारे बहुजन नायक मान्यवर कांशीरामजी यांना मरणोत्तर भारतरत्न पुरस्कार देण्याची मागणी राष्ट्रीय गुरु रविदास समता परिषदेच्या वतीने करण्यात आली आहे. यासंबंधीचे सविस्तर मागणी राष्ट्रीय गुरु रविदास समता परिषदेचे राष्ट्रीय मुख्य संघटक इंजि. चंद्रप्रकाश देगलूरकर यांनी भारताचे राष्ट्रपती आणि प्रधानमंत्री यांच्याकडे ई-निवेदनाद्वारे केली आहे. मान्यवर कांशीरामजी यांचा जन्म पंजाबमध्ये झाला असल्याने या निवेदनाची एक प्रत पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान यांनाही पाठऊन केंद्र सरकारकडे पाठपुरावा करण्याची मागणी करण्यात आली. पंजाबच्या रोपड जिल्ह्यातील खवासपुर तालुक्यातील बुंगा ग्राम येथे सामान्य चर्मकार कुटुंबात जन्म झालेल्या कांशीरामजी यांनी उच्च शिक्षण घेऊन पुण्याच्या संरक्षण क्षेत्र आयुध निर्माण कार्यालयात वैज्ञानिक म्हणून नोकरी स्वीकारली परंतु मागासवर्गीय कर्मचाऱ्यांवरील अन्यायाच्या विरोधात लढा उभारुन नोकरीचा त्याग केला. लग्न न करता आपले संपूर्ण आयुष्य बहुजन समाजाच्या सामाजिक व राजकीय उत्थानासाठी समर्पित करुन टाकले, सहा हजार जातीत विभागलेल्या बहुजन समाजात आत्मभान निर्माण केले, अश्या त्यागी नेतृत्वाला भारतरत्न पुरस्कार देऊन या पुरस्काराचा सन्मान वाढवावा असे निवेदनात नमूद करण्यात आले आहे. मान्यवर कांशीरामजी यांनी “बामसेफ” कर्मचाऱ्यांचे संघटन निर्माण करुन सामाजिक जागृती केली तर बहुजन समाज पक्षाची स्थापना करुन उत्तर प्रदेशात स्वतःची राजकीय सत्ता प्रस्थापित केली. त्यांचे महानिर्वाण ९ ऑक्टोबर २००६ रोजी झाले असून भारतरत्न हा पुरस्कार मरणोत्तर प्रदान करुन त्यांचा सन्मान करण्यात यावा अशी मागणी त्यांच्या सोळाव्या स्मृती दिनानिमित्त (९ ऑक्टोबर) इंजि. चंद्रप्रकाश देगलूरकर यांनी केली आहे.