शैक्षणिक कर्ज व्याज परतावा योजनेचा लाभ घेण्याचे आवाहन

Khozmaster
3 Min Read

प्रतिनिधी प्रा. भरत चव्हाण नंदुरबार नंदुरबार : देशांतर्गत व परदेशात उच्च व्यावसायिक शिक्षण घेणाऱ्या इतर मागास प्रवर्गातील विद्यार्थ्यांसाठी शैक्षणिक कर्ज व्याज परतावा योजना महाराष्ट्र राज्य इतर मागासवर्गीय वित्त व विकास महामंडळामार्फत बँकेमार्फत राबविण्यात येत असून या योजनेचा लाभ घेण्याचे आवाहन महाराष्ट्र राज्य इतर मागासवर्गीय वित्त व विकास महामंडळाचे जिल्हा व्यवस्थापक नंदुरबार यांनी एका प्रसिद्धीपत्रकान्वये केले आहे.राज्यातील इतर मागास प्रवर्गातील विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक हिताच्या दृष्टीकोनातून त्यांना उच्च शिक्षणासाठी प्रोत्साहित करणे, त्यांना शैक्षणिक व आर्थिकदृष्टया सक्षम करणे तसेच विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी कर्जावरील व्याज उपलब्ध करुन देण्याच्या दृष्टीने शैक्षणिक कर्ज व्याज परतावा योजना राबविण्यास शासनाने मान्यता दिली आहे.या योजनेतंर्गत राज्यांतर्गत व देशातंर्गत अभ्यासक्रमासाठी महत्तम कर्ज मर्यादा 10 लाख, परदेशी अभ्यासक्रमासाठी महत्तम कर्ज मर्यादा 20 लाख देण्यात येते. यासाठी अर्जदाराचे वय 17 ते 30 वर्ष असावे तो इमाव प्रवर्गातील महाराष्ट्र राज्याचा रहिवाशी असावा. अर्जदाराचे कौटुंबिक वार्षिक उत्पन्न मर्यादा ग्रामीण व शहरीभागाकरीता 8 लाखापर्यंत असावी. अर्जदार बारावीत 60 टक्के गुणांसह उत्तीर्ण असावा तसेच पदवीच्या द्वितीय वर्ष व्यावसायिक अभ्यासक्रमासाठी प्रवेश घेणारे विद्यार्थी 60 टक्के गुणासह पदवीका उत्तीर्ण असावेत. पदव्युत्तर अभ्यासक्रमासाठी किमान 60 टक्के गुणासह पदवी उत्तीर्ण असावा. बँकेने मंजूर केलेली संपूर्ण कर्ज रक्कम अर्जदारास वितरीत केल्यानंतर अर्जदार व्याज परतावा योजनेसाठी पात्र राहील. राज्य व देशांतर्गत अभ्यासक्रमासाठी प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्याकरीता शैक्षणिक शुल्क, पुस्तके, साहित्य खरेदी व अर्जदाराच्या राहण्याचा व भोजनाचा खर्च समावेश राहील. तर परदेशी अभ्यासक्रमासाठी प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांकरीता फक्त शैक्षणिक शुल्क, पुस्तके साहित्य खरेदीचा समावेश असेल. अर्जदाराचा सिबील क्रेडिट स्कोअर 01, -1 (म्हणजेच यापुर्वी त्याने कर्ज घेतलेले नसावे ) किंवा 500 पेक्षा जास्त असावा.या योजनेत संपूर्ण कर्ज संबधित बँकेचे राहणार असून विद्यार्थ्यांने बँकेच्या कर्जाची परतफेड नियमितपणे केल्यास कमाल 12 टक्के पर्यंतची व्याज परतावा रक्कम दर महिन्याला महामंडळ लाभार्थीच्या बँक खात्यावर जमा होणार आहे. ही योजना ऑनलाईन स्वरुपाची असून त्यांसाठी महामंडळाच्या www.msobcfdc.org.in या संकेतस्थळावर अर्जदाराचा इतर मागास प्रवर्गातील जातीचा दाखला, उत्पन्नाचा दाखला, आधार कार्ड, ज्या अभ्यासक्रमाकरीता शैक्षणिक कर्ज आवश्यक आहे त्या अभ्यासक्रमासाठीची पात्रता परीक्षा उत्तीर्ण झाल्याचे गुणपत्रक,अर्जदार व अर्जदाराचे पालक यांचे पासपोर्ट फोटो, अर्जदाराचा जन्माचा, वयाचा दाखला, शैक्षणिक शुल्क संबंधित पत्रे,शिष्यवृत्ती, शैक्षणिक शुल्कमाफी पात्रतेबाबतचे प्रमाणपत्र, मान्यताप्राप्त संस्थेत प्रवेश घेतल्याचा पुरावा तसेच आधार संलग्न बँक खाते पुरवा इत्यादी मूळ कागदपत्रे अपलोड करुन प्रस्ताव ऑनलाईन दाखल करावा. अधिक माहितीसाठी महाराष्ट्र राज्य इतर मागासवर्गीय वित्त व विकास महामंडळ लि.नंदुरबार जिल्हा कार्यालय डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन, टोकर तलाव रोड, नंदुरबार (दूरध्वनी क्रमांक 02564-210062 ) वर संपर्क साधावा.

0 9 4 9 5 9
Users Today : 131
Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *