सहकारी शिक्षक आणि कर्मचारी यांच्या जाचाला कंटाळून एका शिक्षकाने आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना…प्रतिनिधी प्रविण चव्हाण नंदुरबार -: शहादा तालुक्यातील कवळीथ येथील हायस्कूलमधील सहकारी शिक्षक व कर्मचाऱ्यांच्या जाचाला कंटाळून शिक्षकाने आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे . या प्रकरणी नंदूरबार रेल्वे पोलिसात चार जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे . या बाबत अधिक माहिती अशी की , नंदलाल रामदास शिंपी ( ५६ ) रा . डोंगरगाव रोड , शहादा असे मयत शिक्षकाचे नाव आहे . शिंपी हे कवळीथ येथील आदर्श हायस्कूलमध्ये कार्यरत होते . सोमवारी दुपारी त्यांनी दोंडाईचा येथील उड्डाणपुलावरून उडी मारून आत्महत्या केली . शाळेतील सहकारी शिक्षक व काही कर्मचारी त्रास देत असल्याने आत्महत्या करीत असल्याची पोस्ट शिंपी यांनी त्यांच्या सोशल मीडिया अकाउंटवर शेअर केली होती . सोमवारी रात्री उशिरा आत्महत्या करणारे शिक्षक हे शहादा येथे रहिवासी असल्याचे समोर आले होते . आत्महत्येपूर्वी शिंपी यांनी सोशल मीडिया पोस्ट लिहून सहकारी शिक्षक आणि कर्मचारी यांची नावे सांगत , त्यांच्या कडून होणाऱ्या त्रासाची माहिती दिली होती . मयत नंदलाल शिंपी यांच्यावर शहादा येथे मंगळवारी अंत्यसंस्कार करण्यात आले . याप्रकरणी नंदूरबार रेल्वे पोलिसात फिर्यादीवरून चार जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे .
Users Today : 121