देवेंद्र सिरसाट.नागपूर . पक्षाच्या सदस्यांच्या तक्रारी अडचणी जाणून घेत, त्या वरिष्ठांपर्यंत पोहचविणे. सदस्यांना पक्षाशी एकसंध बांधून ठेवणे, सभागृहात पक्षाच्या संदर्भातील प्रशासकीय कामकाजाचा प्रमुख व्यक्ती म्हणजे गटनेता होय. जिल्हा परिषदेत या भूमिका बजावताना काँग्रेसच्या गटनेत्याला मात्र अपयश आले. काँग्रेस मधील बंडखोरीला हेही महत्वाचे कारण ठरले. जिल्हा परिषदेत काँग्रेसच्या गटनेतेपदी अवंतिका लेकुरवाळे यांची पक्षाने निवड केली. लेकुरवाळे यांनी जिल्हा परिषदेत पदार्पण केल्यापासूनच आपल्या वक्तृत्वाने छाप सोडली. राष्ट्रीय व राज्यस्तरीय विषय जिल्हा परिषदेच्या सभागृहात मांडून बुद्धीमत्तेची चुणुक दाखविली. त्याचीच पावती गटनेता म्हणून त्यांना मिळाली. सभागृहात विरोधकांवर नियंत्रण मिळवितांना त्यांचे आपल्याच सदस्यांवरील नियंत्रण हरविले. आपल्या पक्षाच्या सदस्यांना एकसंध ठेवण्याचा प्रयत्न त्यांनी केलाच नसल्याच्या भावना बंडखोर सदस्यांच्या आहे. उलट बंडखोरांनी उघडपणे बोलूनही त्यांचाच विरोध त्यांनी केला. पक्षामध्ये एका विशिष्ट गटातच त्या वावरल्या. कमी बोलणाऱ्या, फारसे पुढे पुढे न करणाऱ्या सदस्यांना त्यांनी सोबतच ठेवले नाही. गटनेता सदस्यांच्या भावनांना गंभीरतेने घेत नसल्यामुळे काँग्रेसमध्ये फुट पडल्याची दिसून आली. त्या अतिशय महत्वाकांक्षी आहेत. त्यांनी बाळगलेली उद्दीष्टाची पूर्ती करण्याची कसब त्यांच्यात आहे. तेवढ्या त्या सक्षमही आहे. परंतु पक्षात फुट पडू नये म्हणून त्यांना एकसंध बांधून ठेवण्याचा प्रयत्न त्यांच्याकडून होतांना दिसला नाही.