अनुसुचित जाती व नवबौध्द प्रवर्गातील विद्यार्थ्यांकरीता भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजना

Khozmaster
3 Min Read

अकोला –  अनुसुचित जाती व नवबौध्द घटकातील शासकीय वसतीगृहात प्रवेश न मिळालेल्या विद्यार्थांना मॅट्रिकोत्तर शिक्षण घेता यावे म्हणून भोजन, निवास व इतर शैक्षणिक सुविधा या विद्यार्थ्यांना स्वत: उपलब्ध करुन घेण्यासाठी शासनाने भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजना सुरु केलेली आहे. सन 2020-2021 व 2021-2022 या कोविड प्रादुर्भावाच्या कालावधीत शैक्षणिक संस्था प्रत्यक्ष बंद असल्यातरी या कालावधीत ऑनलाईन प्रणालीव्दारे शिक्षण सुरु असल्याने या दोन वर्षासाठी योजनेअंतर्गत संबधित विद्यार्थ्यांचे अर्ज शैक्षणिक वर्ष 2021-22 मध्ये शासनाचे आदेशान्वये स्विकारण्यांत आले आहे. दोन्ही वर्षाकरीता जवळपास 6 ते 7 हजार आवेदनपत्रे या कार्यालयास प्राप्त झालेली आहेत. या सर्व अर्जाची पडताळणीची कार्यवाही कार्यालय स्तरावर सुरु असून सन 2021-22 या आर्थिक वर्षात 595.37 लक्ष प्राप्त झालेल्या तरतूदीमधून नुतनीकरण व नविनीकरणाची पात्र अशी एकूण 1609 विद्यार्थ्याची आवदेनपत्रे निकाली काढण्यांत आलेली असून लाभाची रक्कम संबधित विद्यार्थ्यांचे बॅक खात्यात एनईएफटीव्दारे अदा करण्यांत आली आहे. तर चालू आर्थिक वर्षात आतापर्यंत 120.28 लक्ष तरतूदी मधून 325  विद्यार्थ्यानां लाभाची रक्कम रक्कम संबधित विद्यार्थ्याचे बॅक खात्यात एनईएफटीव्दारे अदा करण्यांत आली आहे. तसेच उर्वरीत पात्र सन.2020-21 करीता 215 व सन 2021-22 करीताचे 1433 असे एकूण 1648 अर्ज निकाली काढण्यासाठी वरिष्ठ कार्यालयास तरतूदीची मागणी करण्यांत आलेली आहे. तर तपासणी अंती आक्षेपित असलेल्या अंदाजे 2177 विद्यार्थ्यानांच्या अर्जाची त्रृटी पुर्तता करण्यात येणार आहे. या योजनाचा लाभ पात्र अनुसूचित जाती व नवबौध्द घटकांतील मागासवर्गीय विद्यार्थ्यांना प्राध्यान्याने दिल्या जाईल.

भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजनेअंतर्गत अर्ज सादर केलेल्या विद्यार्थ्यांना या कार्यालयाकडून त्यांचे आवेदनपत्राच्या सद्यास्थिती बाबत लेखी स्वरुपात कळविण्यांत आल्यानंतर त्यांनी आक्षेपीत अर्जाची पुर्तता तात्काळ करुन घ्यावी. आपल्या आवेदन पत्र मंजूरीबाबत कार्यालयाबाह्य व्यक्तीशी संपर्क करु नये. असे केल्यास संबधित विद्यार्थ्यांची आर्थिक पिळवणूक झाल्यास त्यास हे कार्यालय जबाबदार असणार नाही. तसेच याबाबत कोणी अमिष देत असल्यास अशा संबधितावर योग्य ती कार्यवाही बाबत सक्षम यंत्रणेकडे रितसर तक्रार दाखल करावे. योजनेअंतर्गत प्राप्त अर्जाचा निपटारा करण्यांकरीता संबधित विद्यार्थी, पालक, विद्यार्थी संघटना यांनी कार्यालयास सहकार्य करावे. जेणेकरुन कार्यालयास्तरावरुन तपासणी व डाटा संगणीकृत करण्यांची कार्यवाही जलद होऊन लाभाची रक्कम संबधित विद्यार्थ्यांच्या खात्यावर जमा करण्याची कार्यवाही तातडीने पुर्ण करता येईल. तसेच या कार्यालयामार्फत वेळोवेळी संबधित विद्यार्थ्याच्या भ्रमणध्वनीव्दारे तसेच लेखी स्वरुपात त्यांचे अर्जाच्या सद्यास्थितीबाबत अवगत करण्यांत येईल. अधिक माहितीसाठी सहायक आयुक्त,समाजकल्याण,अकोला किंवा प्रशासकीय कामकाजा मुळे सहायक आयुक्त,समाजकल्याण,अकोला कार्यालयास उपलब्ध नसल्यास या कार्यालयाचे विशेष अधिकारी तथा रचना व कार्यपध्दती अधिकारी गट-ब यांना भेटता येईल.

Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *