नंदुरबारमध्ये गवळी समाजातर्फे शेकडे वर्षापासून दिवाळी पाडव्या निमित्त “सगर” उत्सवाची परंपरा कायम

Khozmaster
3 Min Read

प्रतिनिधी

प्रविण चव्हाण

नंदुरबार -: संगणक आणि इंटरनेटच्या युगातही वीरशैव लिंगायत गवळी समाजात शेकडो वर्षापासून “सगर उत्सव” अर्थात पशुधन पूजनाची परंपरा आजही कायम आहे. म्हणून दरवर्षी दीपावली पाडवा व बलिप्रतिपदा निमित्त मुक्या प्राण्यांचा “सगर उत्सव” नंदनगरीचे आकर्षण ठरते. यावर्षी बुधवार दिनांक 26 ऑक्टोंबर रोजी “सगर” उत्सव साजरा करण्यात येणार आहे.गेल्या दोन वर्षापासून कोरोना काळात विविध प्रतिबंधांमुळे सगर उत्सव साध्या पद्धतीने झाला होता. गवळी समाज पंच मंडळातर्फे यंदा मोठ्या जल्लोषात सगर उत्सव साजरा करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. महाभारत काळात भगवान श्रीकृष्णाने गोवर्धन पर्वत उचलून गवळी समाजाच्या पशुधनाचे संरक्षण केले होते. तेव्हापासून सगर उत्सवास प्रारंभ झाल्याचे जुने जाणकार सांगतात. पारंपारिक दुग्ध व्यवसायानिमित्त गवळी समाज बांधव दीपावली सणाच्या आनंदोत्सवात सहभागी होतात. आगामी काळात आणि नववर्षात राज्यासह देशात आणि समाजात कुठलेही अघटीत संकट येऊ नये म्हणून गाई, म्हशी आणि रेडा यांचे पूजन करण्यात येते. पशुधन गवळी समाजाच्या उदरनिर्वाहाचे साधन असले तरी गाय आणि म्हैस लक्ष्मीचे स्वरूप असून यमराजाचे वाहन रेडा यांचे पाडव्यानिमित्त पूजन करण्यात येते. नंदुरबारसह महाराष्ट्रात सर्वत्र वीरशैव लिंगायत गवळी समाज म्हैस व रेडा यांच्या माध्यमातून बंधुभाव जोपासत शेकडो वर्षापासून ही परंपरा आजही कायम आहे. दिवाळी पाडव्याला एकमेकांना शुभेच्छा देण्यासाठी समाज बांधव एकत्र येतात. या उत्सवाचे वैशिष्ट्य म्हणजे सगर अर्थात रेड्यांची मिरवणूक काढण्यात येते. गवळी समाज बांधव आपापल्या म्हशी आणि रेड्यांच्या शेंगांना मोरपिसे व झेंडूच्या माळा लावून त्यांच्या अंगावर रंगबेरंगी झुली कोरून सजवतात. प्रथा परंपरेनुसार अनेक वर्षांपासून शहरातील ऐतिहासिक मोठा मारुती मंदिर परीसरातील सोनी विहीर चौकात सगर पूजन करण्यात येते. त्यानंतर नंदुरबार शहरातील गवळीवाडा, बालवीर चौक, देसाईपुरा परिसरातून गाई, म्हशी आणि रेड्यांची वाजत- गाजत मिरवणूक काढण्यात येते. ऑक्टोबर रोजी दुपारी बारा वाजेच्या सुमारास सोनी विहिरी जवळ सगृर उत्सवाला प्रारंभ होईल. या ठिकाणी गवळी समाजातील पंच मंडळी, मानकरी व समाज बांधव उपस्थित राहतील. सगर पूजनाच्या ठिकाणी रेडे सलामी देतात आणि म्हशी नतमस्तक होतात. मानकरी व पंचांच्या चर्चेनंतर उमद्या रेड्यांच्या झुंजी लावण्यात येतात. रेड्यांच्या झुंजी पाहण्यासाठी शहर व परिसरातील हौशी मोठ्या प्रमाणावर गर्दी करतात.गवळी समाजाचे प्रमुख मानकरी आणि पंच उपस्थित राहून आलेल्या गाई – म्हशी मालकांना “शिवशरणार्थ” संबोधुन स्वागत करतात.नंदुरबार येथील गवळीवाडा आणि तालुक्यातील वावद येथे गवळी समाज बांधव वास्तव्यास असल्याने दरवर्षी दीपावलीनिमित्त “सगर” ऊत्सवाची परंपरा दोन्ही ठिकाणी कायम ठेवली आहे.- महादू विठ्ठल हिरणवाळे,जिल्हा कार्याध्यक्ष,महाराष्ट्र राज्य वीरशैव लिंगायत गवळी समाज बहुउद्देशीय संस्था, नंदुरबारआजच्या स्थितीत नंदुरबार येथे बोटावर मोजणे इतक्या गवळी समाज बांधवांकडे पाळीव प्राणी आहेत. वाढत्या महागाईमुळे त्यांचे पालन पोषण करणे अवघड झाले आहे. “सगर” उत्सवाच्या माध्यमातून दरवर्षी रेड्यांच्या झुंजी प्रमुख आकर्षण ठरते.

– अशोक वाघोजी यादबोले,   जिल्हा सचिव,

महाराष्ट्र राज्य वीरशैव लिंगायत गवळी समाज बहुउद्देशीय संस्था, नंदुरबार.

 

0 9 4 9 2 8
Users Today : 100
Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *