प्रतिनिधी रामेश्वर वाढी,पातूर :- तालुक्यातील चान्नी पोलिस स्टेशन अंतर्गत येत असलेल्या विवरा येथे काल दि.26 ऑक्टोबर 2022 रोजी मयत झालेल्या एका युवकाची प्रेतयात्रा निघत असतांना सदर प्रेतयात्रा थांबवून प्रेत मंदिरात नेऊन एका महाराज ने सदर युवकास जिवंत केल्याचा प्रकार घडल्याने विवरा येथे मोठ्या प्रमाणात गर्दी जमली होती. कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी चान्नी पोलिसांनी घटनास्थळी पोहचून सदर गर्दीवर नियंत्रण मिळविले व मेल्यावर जिवंत झालेल्या प्रशांत रामकृष्ण मेसरे (वय अंदाजे 22), गोपाल रामकृष्ण मेसरे (वय अंदाजे 37) व महाराज असलेला सागर गणेश बोरले (वय 17) यास तात्पुरते ताब्यात घेऊन रात्री उशिरा सोडून देण्यात आले होते.
दरम्यान सदर घटनेबाबत प्रसारमाध्यमांमध्ये वृत्त प्रसारित झाल्यामुळे आज दि.27 ऑक्टोबर 2022 रोजी चान्नी पोलिसांनी घटनेची चौकशी केली असता विवरा येथे सागर गणेश बोरले याचे घरात एक वर्षांपासून देवीचे ठाणे मांडलेले असून नेहमी दरबार भरत होता व काही महिलांच्या अंगात देवी येण्याचा प्रकार चालत असे,याच दरम्यान काही महिन्यांपूर्वी प्रशांत रामकृष्ण मेसरे हा सागर बोरले या भोंदू महाराजच्या संपर्कात आला असता बोरले याने दिवाळीच्या तिसऱ्या दिवशी प्रशांत याचा मृत्यू होणार असल्याचे भाकीत प्रशांत याच्या आईवडिलांना केले होते.महाराजने सांगितल्याप्रमाणे भाकीत खरे ठरविण्यासाठी प्रशांत मेसरे याच्या मृत्यचा बनाव करून त्याची अंत्ययात्रा थांबवून त्याला मंदिरात नेण्यात आले व मंत्र-तंत्राने त्यास पुन्हा जिवंत केले असे भासविल्याचे प्रथमदर्शनी तपासात समोर आले असल्याने मयत झाल्याचे नाटक करणारा प्रशांत रामकृष्ण मेसरे व त्याचा भाऊ गोपाल रामकृष्ण मेसरे, भोंदू महाराज सागर गणेश बोरले सर्व राहणार विवरा या तिघांना चौकशी करीता घेण्यात आले असुन रात्री उशीरा पर्यत गुन्हा दाखल करण्याची प्रक्रीया चालु होती .या सर्व प्रकारामागे नेमका उद्देश काय होता, आणखी काही आरोपी वाढतील काय ? हे पोलीस तपासात पुढे येईल.
काल घडलेला प्रकार हा अंधश्रद्धेला खतपाणी घालणारा होता,तब्बल एक वर्षांपासून सदर प्रकारे दरबार भरवून अंधश्रद्धा पसरविण्याचे काम हा भोंदू महाराज करत असून देखील सूज्ञ नागरिक याचा विरोध करत नसल्याने अशे भोंदूबाबा फोफावत आहे.अशा प्रकाराला वेळीच आळा घालण्यासाठी प्रशासनासोबत सूज्ञ नागरिकांनी देखील प्रयत्नशील राहण्याची गरज आहे. चान्नी पोलीस प्रसार माध्यमातून बातम्या प्रसारीत झाल्यावर जागे झाले. सदर प्रकार प्रसार माध्यामाने प्रसारीत केला नसता तर चान्नी पोलीस या घटनेची दखल घेण्याच्या मनस्थीतीत नव्हते. घटना स्थळी चान्नी चे उपनीरीक्ष गणेश महाजन तपास करीत आहे.