दुष्काळातील दुष्टचक्र ..

Khozmaster
10 Min Read

प्रतिनीधी रवि मगर           एक लहानसं गावं अन त्या गावाला आजूबाजूंनी समद्या लहान-लहान टेकड्यांनी गुरफटलेलं! कोराडी नदीच्या तीरावर बसलेलं गावं ते!गावात येताक्षणी नदीच्या तीरावर एक हापशी अन त्या हापशीला लागूनच म्हसंटी ,गावात येता-येता पहीले कोराडीचं दर्शन अन लगेचच चार-दोन पावलं पूढे सरकत नाही तर आपसूकच म्हसंटीच अन हापशीचं दर्शन व्हायचं .हापशीवर गावातल्या बाया-माणसं रातनं-दिवस पाणी भरतांना दिसायच्या त्यामुळे गावं हे पाण्यावाचून वणवण फिरत असल्याची मनाला जाणीव येणा-या-जाणा-या वाटसरूंना होणं हे सहाजिकच!कारण रहदारीचा रस्ताच तो! त्या रस्त्यानं समोरच्या गावाला जाणारे वाटसरू ये-जा करायचे. हापशीची रातनदिवस घटाळ चालूच असायची. त्यामुळे त्या हापशीच्या घटाळाचा आवाज समद्या गावातील माणसांच्याच नव्हे तर येणा-या जाणा-या वाटसरूंच्या कानात घुमायचा हे नित्याचच झालेलं. कारण पिढयानं-पिढयापासनंच चालत आलेली परंपराच म्हणावी लागेल.अन अशातच एखाद्यावेळेस मध्येच कधीतरी म्हसंटीत निखारा फुललेला दिसायचा त्यामुळे येणा-या-जाणा-या वाटसरूला गावात कुणीतरी गेल्याचा भास होणं हेही साहाजिकच!       अन अशा गावातच जंगल्याचा जन्म झाला .जंगल्याकडं बिगा दोन बिगा जमीन होती.तीही माळरानावर म्हणजेच माळजमीनीच ती!…आणि ती जमीन तो कसत होता.जमीनही काही पिकाला भारी नव्हती पण जेवढंही काही पिकत होती त्या पिकाच्या अन्नधान्याच्या भरवश्यावर जंगल्याच्या कुटुंबाची गुजराण होत असे .             त्याचा संसाराचा गाडा हा सुरळीत चालू होता .तो रातनं-दिवस काबाडकष्ट करून आपल्या काळ्या आईची सेवा न चुकता करत असे.आणि तिही त्याला पोटापुरतं खायला देत असे जंगल्याचा जन्म माळरानावर झाला तेव्हांपासून समद्या गावात तो जंगल्या म्हणूनच नावारूपास आला आणि त्यानं नावाप्रमाणे समद्या शिवाराला अन जंगलालाही आपलसं करून टाकलं व्हतं!कारण जंगलाचा स्वभावच हा निखालस आणि मोकळा असतो.        अशातच आगोठाचे दिवस डोक्यावर येऊ लागले पण त्या अगोदर जंगल्यान आपलं समदं शिवार आरशासारखं चम-चम चमकावं तस करून टाकलं होतं.शिवारंही काळशार दिसत होतं शिवारात साधी एखादी दात कोरायला काडीही त्यानं शिल्लक ठेवली नव्हती .पेरणीच्या लायक शिवार त्यान करून टाकलं व्हतं.फक्त वाट होती पावसाची! त्यामुळे तोही आपली मान वरती करून ढग जमा होण्याच्या प्रतिक्षेत आकाशाकडे एकटक नजरेनं पाहात होता. आगोस संपून आगोठाला सुरुवात होणार तत्पूर्वी पावसाची वर्दी देणारा पावश्यानेही म्हणजेच चातक पक्षानेही अधिकचा जोर धरला होता.एवढचं काय तर समदीकडे बेडुकानेही टराव-टराव आवाजाला सुरुवात केली होती.त्यामुळे या सालला चांगला पाऊस पडणार आणि पीकही चांगलंच येणार हीच आशा उराशी बाळगून जंगल्याच्या मनात अधिकच आशेचा एक नवा धागा निर्माण झाला.कारण तिगसत्ता पासून शिवार काही जास्त पिकलं नव्हतं जेवढंही काही पिकलं होतं तेवढ्यावरचं त्यानं समाधान मानलं होतं.पण जेही काही पिकलं होतं त्यातलं थोडफार अन्न-धान्य नवीन धाण येईपर्यंत पुरेल एवढंच घरात शिल्लक उरलं होतं.अशातच बेडकाचा टराव-टराव आवाज अन त्यातच पावसाची वर्दी देणारा पावश्यानेही पावसाचे संकेत दिले होते.त्यामुळे या सालला काहीच चिंता करण्याची गरज नाही असं जंगल्याला वाटत होते.               अशातच सुरवातीचे काही दिवस लोटल्या गेले हळूहळू आकाशात ढग जमा व्हायला लागले, अन अशातच रिमझिम पावसाच्या सरी कोसळायला सुरूवात झाली.सतत चार-दोन दिवस पावसाच्या सरी जमिनीवर कोसळल्यामुळे जिकडे-तिकडे ओलेचिंब झाले होते.एकंदरीत पाऊसही पेरणी लायक झाला.त्यामुळे जंगल्यानंही आपल्या शिवारात बियाणं टाकलं त्याला हळूहळू अंकुर फुटू लागले काळशारं दिसणारं समदं शिवार पावसाच्या सरी जमीनीवर कोसळल्यामुळे हिरवागार दिसू लागलं .आतापर्यंत निसर्गानेही ब-यापैकी साथ दिल्यामुळे समदं शिवार बहरूनं आलं ते हळुहळू हवेच्या मंद झुळूकीने छानसं डोलू लागलं एवढंच काय तर त्याकडे एकटक नजरेनं पाहलं तर ते हसरंही दिसत होतं. हळूहळू पिकही पोट-यात आलं! पोट-यात आलेलं पिकातं धाण तयार झालं जंगल्यान चार-दोन कणसं घरी आणले. जंगल्यानं अन त्याच्या बायकोनं रुखमानं आपल्या मुलाबाळांना त्याचा हुरडाही पोत्यात टाकून,त्याला बडवून त्यात थोडेफार तिळाचे दाणे टाकून शेकोटीवर तवा ठेवून, त्याला तयार करून ,त्याला भाजून आपल्या मुलाला खाऊ घातला.समदं कसं आनंदात चालू होतं. त्यामुळे लेकरा-बाळाचा प्रफुल्लित झालेला तो हसरा चेहरा डोळ्यासमोर पाहून जंगल्या अन, रूखमाही खूप खूश होते.आतापर्यंत समदं काही निसर्गाच्या संगतीनं सुरळीत चालू होतं. समदं काही सुरळीत चालू असतांना पहाड जसा अंगावर कोसळावा तसचं अचानक एक वादळी संकट विजेच्या कडकडाटासह,जोरदार मुसळधार पाऊस अन सोबतीला वादळवारा अन एवढच नव्हे तर बोरासारख्या गार-गुंडी पडायलाही सुरवात झाली.एकंदरीत ते दुष्काळाच्या दृष्टचक्राचा संकटच जसं की अंगावर एखाद्या पहाडासारखं कोसळावं तसचं त्याच शिवार हे अस्मानी संकटाच बळी ठरलं !जणू काही आभाळाची कु-हाडच छाताडावर आदळावी अन त्याचा तीव्र धक्का काळजावर व्हावा असं त्याला झालं. जस-जसा पाऊस जोर धरत होता तसतसं उभे झाडे कोलमडून पडत होती तसतसा तो काव-या-बाव-या नजरेनं आपल्या झोपडीतून तो उघड्या डोळ्यांनी पाहात होता. पण करणार काय मोठमोठाली झाडं या वा-या- वावधणाने पालथी घालणं लावली होती.तळहाताच्या फोडा प्रमाणं जपलेल नाजूक-साजूक, सजलं-धजलेलं कोवळं उभं पिक निसर्गाच्या अस्मानी संकटापूढे काय लगाम धरणारं!त्याला फक्त आपलं शिवार दिसू लागलं शिवार कसं असेल त्याची काय अवस्था झाली असेल ,हे विचारचक्र त्याच्या मनात घर करू लागलं त्यामुळे तो खूप कावरा-बावरा झाला त्याच्या जीवाचा पुरता थरकाप उडू लागला त्यामुळे तो अधिकच बैचेन होत होता .त्याचं मन हे अस्मानी संकट पाहून सैरभैर व्हायला लागलं.त्याचं क्षितिज पहाडासारखं रूंदावलेलं होतं !पण जसा पहाड अंगावर कोसळावं तसं एकदम त्याचं रंदावलेलं क्षितिज क्षणातच कमी झालं पण करावं काय कारण समोर टीचभर पोटाचा प्रश्न ‘आ’ वासून उभाच होता. जे आहे तेही किती दिवस पुरणार त्यामुळे त्याचा आकांत हा त्याचा त्यालाच माहित समोरच्याला त्याचं एवढं काय कळणारं फक्त त्याचा आकांत हा निसर्गच एकटक नजरेनं न्याहाळत होता .कारण त्याच्या सजल्या -धजलेल्या जीवनात,रंगविलेल्या स्वप्नात अचानक चक्रीवादळ आलं होतं ! आता काय करावं काहीच सुचत नव्हतं.जिकडे-तिकडे त्याला डोळ्यासमोर अंधार -अंधेरी दिसू लागली पहिलेच तर वरिस -दोन वरसापासून शिवार काही चांगलं पिकलं नव्हतं अन या साललां समद पिक अस्मानी संकटामुळे बेचिराख झालं होतं उगवून आलेलं धाण जमिनीत समदीकडे मातीत पसरलं होतं एक -एक दाणा उभ्या पिकातल्या धान्यांच्या दाण्याने जमिनीत लोळणं घेतलं होतं तोंडापाशी आलेला घास हातचा पुरता निघून गेला होता.एवढचं काय जंगलातली अरडी-दरडीही उन्मळून पडल्या होत्या. घरात शिल्लक राहीलेलं अन्न-धान्यही किती दिवस पुरणार ,तेही जास्त दिवस पुरणार नाही याची जाणीव मनोमन होत होती अशातच हळूहळू घरातलं ते अन्न-धान्यही काही दिवसात संपलं ,घरात जो काही ठोंबराही शिल्लक होता त्यावर गुजराण चालू झालं आता तेही संपणार आता भुकेने मरावं लागणार कारण भाकरीवाचून भूकेनं मरणं हे दुःख त्याला त्याच्या कुटुंबाच सहन होणार नव्हंत. कुठलही कामधंदा करण्याची तयारी असूनही सर्वत्र दुष्काळाचे दुष्टचक्र असल्यामुळे फिरूनही त्याच्या हाताला काही कामधंदाही मिळत नव्हता.आणि दुष्काळाच्या सावटामुळे कोणीही काम देत नव्हतं. घरातला ठोंबराही संपत चालला होता.रात्रीच्या वेळेस डोळे मिटतांना तो सतत आपल्या चिल्यापिल्याचा उद्याचा भाकरीचा विचार त्याच्या मनात सतत यायचा! आणि हा विचारच त्याला शांत झोपू देत नव्हता.तो रातभर विचार करत बसायचा त्याची समदी झोप हरवली.आणि असा विचार करत-करतच त्याच्या मनात विचार आला की ,या निसर्ग सृष्टीचा डोलारा खूप अफाट आहे आणि या सृष्टीवर आपल्यासाठीही एखादा कोपरा कुठेतरी शिल्लक असेलच या धरतीवर अनेक मुके प्राणी, पक्षी असे अनेक जीवजंतू राहतात ,ते त्यांची वाट स्वतः शोधतात जसे की,पक्षी जेव्हा आकाशाच्या दिशेने झेप घेतात आणि त्यांची वाट ही त्यांनाही माहित नसते .आकाशात अनंत त्यांच्या  चिल्यापिल्यासाठी वणवण फिरतात अन भाकरी आणतात आपल्या घरट्यात येतात आपल्या चिल्यापिल्यांना खायला देतात तीही त्यांच्यासाठी भाकरीचं असते तसचं आपल्यालाही वाट सापडेलचं .असा त्यानं मनात विचार केला अन,गाव सोडण्याचा विचार आपल्या सगीला रुखमाला बोलून दाखविला. या अगोदर थोड्याफार प्रमाणात अनेक वादळ त्याच्या जीवनात आले होते पण हे वादळ  इतर वादळापेक्षा काही औरच होतं. जंगल्यान हेही वादळ पचवलं अन समदा विचार करून आपल्या मुलाबाळांसाठी भाकरीच्या शोधात रानोमाळ फिरू लागला रानातल्या रानमेवा हुडकावू लागला पण हाताला काहीच लागत नव्हतं कारण निसर्गातील निसर्गचक्रानं अचानक थैमान घालून सर्व अरडी-दरडीही पालथी घातली होती रानात काहीही शिल्लक उरलं नव्हतं!त्यामुळे तो आपल्या कुटुंबासोबत पाठीवर बि-हाड  घेऊन शहराच्या वाटेनं निघाला.तो कसाबसा शहरात आला.शहर त्याच्यासाठी नवीनच होतं आणि शहराच्या काठावर त्यानं मोकळ्या जागेत आपलं पाल ठोकलं.अन कामासाठी तो समदं शहर पालथी घालू लागला अशातच त्याच्या प्रयत्नाला यश आलं अन त्याला आता कामही लागलं  काम लागल्यामुळे हळूहळू थोडफार पैकं जमा होऊ लागलं मुलाबाळांला पोटाला पोटभर खायला मिळू लागला .त्यामुळे थोडफार पैकं जवळ जमा होऊ लागल्यामुळे त्याच क्षितिज आता अधिकच रुंदावल्या गेलं.काळुंखी चढलेल्या मुलाच्या चेह-यावरही भाकर पोटात गेल्यामुळे सूर्यासारखं तेज दिसू लागलं. त्यांचे चेहरेही आता हसरे दिसू लागले ,पोटाला पोटभर मिळू लागलं            कारण भूक लागल्यावरच  भाकरीची किंमत कळते तशी कुणाला काय करणार !ती कमवायला खूप वेळ लागतो  ती लगेच काठवठ मध्ये थापून तयार केली जाते पण त्याच काठवठ मध्ये ते कणिक तयार करण्यासाठी काय-काय कष्ट उपसावे लागतात त्यासाठी किती झिजावं लागतं हे ज्याचं -त्यालाच माहित! कारण जळणा-यालाच विस्तव कळतो,न जळणा-याला काय कळणार!कारण भाकरीची किंमत काय असते, आणि संकट आल्यावर टीचभर पोटासाठी तिचा शोध घेण्यासाठी काय-काय करावे लागते हे ज्याचे त्यालाच माहित .कारण जंगल्याही दुष्काळाच्या दुष्टचक्रातून स्वतःला सावरत आपले पाणावलेले डोळे पुसत आपल्या लेकरासाठी भाकरीच्या शोधात खेड्यातून शहरात आला कारण या सृष्टीचा पसारा अफाट असल्यामुळे ,आणि मनमोकळी सजीव सृष्टी असल्यामुळे माणूस म्हणून माणूसच निसर्गाच्या सहवासात जंगल्या आला .कारण प्रश्न समोर उभा होता टीचभर पोटाचा आणि ह्याच  टीचभर पोटाची भूक क्षमवण्यासाठी तो शोध घेत होता

फक्त जीवनाच्या भाकरीचा!

0 9 4 6 7 1
Users Today : 21
Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *