एका झाडाची हत्या
त्यांनी मोठया थंडपणे
घातलाय घाव
धारदार कुऱ्हाडीचा
फळा-फुलांनी डवरलेल्या
फांदीवर!
फांदी प्राणांकीत वेदनेनं
व्याकुळ.
आठवत राहिलीय
पाखरांना दिलेली माया
माणसांना दिलेली छाया.
आठवलं तिला
रसरसलेलं अमृती फळ
वाऱ्याला घातलेली गळ!
पून्हा एक घाव जोराचा
नेमका वर्मावर!
खोडापासून अलग होताना
फांदीनं घातलीय साद
पावसाला या धरतीवर
पून्हा-पून्हा येण्यासाठी.
त्यांचे डोळे विलक्षण
छदमी हसलेले.
हया दरम्यान
त्यांनी घेतलीय
मुळांकडे धाव.
झाड मुळापासून
छाटण्यात
ते मोठे पटाईत!
कुऱ्हाडीचा हरएक
घाव झेलून घेताना
झाडाला स्मरलाय
मुळांचा मातीशी असलेला
आदीमसंदर्भ!
‘हे निसर्गा,
त्यांना कळत नाहीय
ते काय करताहेत ते!’
झाडाच्या सदगदीत ओठांवरची
प्रार्थना त्यांना ऐकू आलेली
नसेल काय?
▶️ 🎡रवींद्र जवादे
Users Today : 22