बोरघर / माणगाव ( विश्वास गायकवाड ) पूर्वीच्या एलपीजी रिकव्हरी प्लांटच्या ठिकाणी गेल (इंडिया) लिमिटेड, उसर येथे 500 केटीए उत्पादन क्षमतेच्या नवीन पीडीएच पीपी प्रकल्पाचे बांधकाम सुरू झाले आहे. गेल (इंडिया) लिमिटेडने कंपनीच्या सीईआर/सीएसआर कार्यक्रमांतर्गत चांगल्या आरोग्याची सामाजिक जबाबदारी म्हणून या प्रकल्पाच्या आजूबाजूच्या गावातील लोकांना मोफत मूलभूत आरोग्य सेवांसह वोक्हार्ट फाऊंडेशनची मोबाईल क्लिनिक रुग्णवाहिका उपलब्ध करून दिली आहे. या रुग्णवाहिकेत एक एमबीबीएस डॉक्टर, एक नर्स, एक फार्मासिस्ट आणि औषधे या सुविधा उपलब्ध असतील. ही फिरती दवाखाना रुग्णवाहिका दररोज गावोगावी फिरून गावातील लोकांना वैद्यकीय सेवा पुरविणार आहे. या मोबाईल क्लिनिक रुग्णवाहिकेचे लोकार्पण आज दि.3 नोव्हेंबर 2022 रोजी जिल्हाधिकारी डॉ.महेंद्र कल्याणकर यांच्या हस्ते जिल्हाधिकारी कार्यालय, रायगड-अलिबाग येथे संपन्न झाले. यावेळी रायगड जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.किरण पाटील, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ.सुहास माने, अलिबाग तहसिलदार मीनल दळवी, मुख्य महाव्यवस्थापक व प्रभारी अधिकारी श्री.अनूप गुप्ता, महाव्यवस्थापक (पीडीएच पीपी प्रकल्प) श्री.वीरेंद्र कुमार, महाव्यवस्थापक (पीडीएच पीपी प्रकल्प) श्री.एम.काशिवेलराजन, महाव्यवस्थापक (एचआर) श्री.जितिन सक्सेना आणि गेल कंपनीचे इतर अधिकारी यावेळी उपस्थित होते. यावेळी जिल्हाधिकारी डॉ.महेंद्र कल्याणकर यांनी गेल कंपनीचे व उपस्थित सर्व अधिकाऱ्यांचे कौतुक केले तसेच गेल कंपनीच्या आजूबाजूच्या गावातील जास्तीत जास्त लोकांनी या मोबाईल क्लिनिक रुग्णवाहिकेचा लाभ घ्यावा, असे आवाहन केले.