राहुल गांधींना आदित्य ठाकरेंनी साथ ( बालाजी देशमुख) हिंगोली – काॅंग्रेस नेते राहुल गांधींच्या बहुचर्चित भारत जोडो यात्रा सध्या महाराष्ट्रातील डोंगरकडा (ता. कळमनुरी, जि. हिंगोली) येथे आहे.या यात्रेत युवासेना नेते आणि माजी पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे आज दुपारी सहभागी झाले. कालच राष्ट्रवादी काॅंग्रेसचे नेते या यात्रेत सहभागी झाले होते. आदित्य यावेळी राहुल गांधी यांच्याशी चालताना आणि चर्चा करतानाही दिसले.नांदेड जिल्ह्यातून चोरांबा फाटा येथून निघाल्यानंतर सायंकाळी चार वाजता कळमनुरी तालुक्यातील हिवरा फाटा येथे खा.राहुल गांधी यांची भारत जोडो यात्रा दाखल झाली.एक तास उशीर झाल्याने येथून ते झपाट्याने पुढे निघून गेले.यादरम्यान खा.राहुल गांधी यांच्यासमवेत शिवसेनेचे युवानेते तथा माजी मंत्री आदित्य ठाकरे हेही दिसून आले.शिवाय प्रदेशाध्यक्ष नाना पटोले,माजी प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे, विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे, आ. प्रज्ञा सातव, शिवसेनेचे आ. राहुल पाटील आदींसह राज्यातून आलेली काँग्रेसची नेतेमंडळी सहभागी झाली होती.हिवरा फाटा येथून राहुल गांधी यांनी आपल्या पायांचा वेग वाढविला. रस्त्यात ते काही जणांना जवळ बोलावून बोलताना दिसत होते. शालेय मुले, युवक, डॉक्टरांसह विविध क्षेत्रातील मंडळीचा यात समावेश होता. रस्त्याने चालत असतानाच ते या मंडळींशी विविध विषयांवर चर्चा करीत होते.दुहेरी कठडे, सीआरएफ व स्थानिक पोलीस अशा दुहेरी सुरक्षा व्यवस्थेत त्यांचा हा ताफा अवघ्या काही वेळातच डोंगरकडा येथे पोहोचला.हिंगोली जिल्ह्यातील स्थानिक नेते माजी खा. सुभाष वानखेडे, संपर्कप्रमुख बबन थोरात, विनायक भिसे,गोपू पाटील, कृष्णराव पाटील, नांदेडचे दत्ता कोकाटे, बालासाहेब देशमुख आदींसह कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी केली. संतोष बांगर यांचे करायचे काय खाली मुंडके वर पाय, ५० खोके एकदम ओके अशा घोषणाही दिल्या.
Users Today : 17