ग्रामीण भागात उडाला, हागणदारी मुक्ती योजनेचा बोजवारा..!!दिपक मापारी, रिसोड मानवी जीवनमान हायटेक बनून पहात आहे. तेव्हा मानवाचा चंगळवादाकडे कल वाढत असला तरी जीवनावश्यक मूलभूत सोयीकडे दुर्लक्षित होत आहे. घरोघरी डीव्हीडी, एलसीडी मोबाईल, फ्रिज सारख्या महागड्या वस्तू आहेत. मात्र ग्रामीण भागात अनेक गावांमध्ये आज घडीला बहुतांश घरी शौचालय नसल्याने परिसरातील अनेक गावांमध्ये उघड्यावरच हागणदारी अद्यापही सुरू असून गेल्या काही वर्षापासून हागणदारी मुक्त योजना तालुक्यातील बंद अवस्थेत आहे. त्यामुळे परिसरात हागणदारी मुक्त योजनेचा बोजवारा उडाला आहे..स्वच्छ भारत मिशन अभियानां अंतर्गत स्वच्छतेकडून समृद्धीकडे असा नारा देत तालुक्यात अनेक गावे हागणदारी मुक्त करून गुड मॉर्निंग पथक तयार करून हे पहाटे ५ ते ८ या वेळेत उघड्यावर शौचालय जाणाऱ्यांना पुष्पगुच्छ देऊन स्वागत करीत होते. परंतु गेल्या काही वर्षापासून हागणदारी मुक्त योजना शासनाने अर्धवट सोडून दिल्याने परिणामी तालुक्यातील ग्रामीण भागामधील काही गावात आजही उघड्यावर शौचालय नागरिक जात आहे. ग्रामीण भागात रस्त्यावरून चालताना किळसवाने स्वरूप पहावयास मिळते. सर्व रस्तेही प्रांत: विधीमुळे रंगलेले आढळून येत आहेत. यापासून मानवी आरोग्याला धोका आहे. हे सर्वांनाच माहीत असूनही या गोष्टीकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करण्यात येत आहे. घाणीमुळे विविध आजार जडण्याची भीतीही व्यक्त होत आहे. शासनाने राज्यात स्वच्छता अभियाना अंतर्गत दारिद्रय रेषेखालील लोकांना घरी शौचालय बांधण्यासाठी अनुदानही दिले जाते. मात्र जनतेकडून शासकीय योजना चाही लाभ घेतला जात नाही. १२ हजार रुपयात तयार होणारे शौचालयाचे मॉडेलही शासनाने जनतेच्या दारी पाठविले आहे. मात्र त्याचा उपयोग केला जात नाही. १० ते २० हजार रुपयाची एलसीडी टीव्ही, डीव्हीडी, व ३ ते ५ हजाराचे २ – ४ मोबाईल असतील मात्र घरी शौचालय नसल्याचे विपरीत चित्र सर्वत्र पाहावयास मिळत आहे. घरातील दोन ते तीन व्यक्तीकडून दहा वीस रुपयाचा अनावश्यक व्यसनावर खर्च केला जातो. मात्र आवश्यक शौचालय घरी बांधण्यासाठी कोणतेही लक्ष दिले जात नसल्याचे वास्तव चित्र आजही ग्रामीण भागातील गावागावांमध्ये दिसून येत आहे..
Users Today : 25