विद्यार्थ्यांनी ज्ञानार्जनासोबत आदिवासी संस्कृतीचे जतन करावे : डॉ . विजयकुमार गावित..

Khozmaster
3 Min Read
प्रविण चव्हाण
नंदुरबार -:सर्वांगीण आरोग्यासाठी खेळांचे अनन्यसाधारण महत्व आहे . तसेच विद्यार्थ्यांनी ज्ञानार्जनासोबत आदिवासी संस्कृतीचेही जतन करणे आवश्यक आहे , असे प्रतिपादन आदिवासी विकास मंत्री डॉ . विजयकुमार गावित यांनी केले . आदिवासी विभागाच्या राज्यस्तरीय क्रीडा स्पर्धांच्या उद्घाटन कार्यक्रम प्रसंगी डॉ . गावित बोलत होते .
 या कार्यक्रमासाठी आदिवासी विकास विभागाचे आयुक्त हिरालाल सोनवणे , आदिवासी विभागाचे अपर आयुक्त तुषार माळी , संदीप गोलाईत , नाशिक जात पडताळणी समितीचे सहआयुक्त विनोद पाटील , उपायुक्त अविनाश चव्हाण , सुदर्शन नगरे , हितेश विसपुते , सहायक आयुक्त हेमलता गव्हाणे , जिल्हा क्रीडा अधिकारी अविनाश टिळे यांच्यासह आदिवासी विकास विभागाचे अधिकारी व राज्यातील एकलव्य मॉडेल निवासी शाळेतील विद्यार्थी उपस्थित होते .
    यावेळी बोलताना डॉ . गावित म्हणाले की , जीवनात चांगला खेळाडू होण्यासाठी शिस्त , कौशल्य , चांगल्या सवयी , शारीरिक क्षमता , मानसिक आरोग्य या गोष्टी अतिशय महत्वाच्या आहेत . या गोष्टी शिक्षकांनी विद्यार्थ्यांना शिकवणे गरजेचे आहे . आश्रम शाळेच्या आवारात क्रीडांगण तयार करावेत . तसेच संस्कृतीचे महत्व सांगतांना त्यात पारंपरिक वाद्य , नृत्य , भाषा यांचे शिक्षण आश्रम शाळेतील विद्यार्थ्यांना देण्यात यावे , जेणेकरून या विद्यार्थ्यांच्या माध्यमातून संस्कृतीची जपणूक होण्यास मदत होईल .
केंद्र व राज्य शासनामार्फत विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासाच्या विविध योजना राबविण्यात येत आहेत . त्या योजनांच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना त्यांच्या प्रगतीसाठी संधी प्राप्त होत असते , या संधीचे रूपांतर स्वतःच्या प्रगतीसाठी करण्यावर विद्यार्थ्यांनी भर द्यावा . विद्यार्थ्यांनी स्वतःसोबतच गावातील इतर विद्यार्थ्यांनाही या विविध योजनांची माहिती देणे गरजेचे आहे . जेणेकरून त्यांच्यातील कलागुणांना संधी मिळून ते देखील आयुष्यात प्रगती करतील . आश्रम शाळेतील विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी शासनामार्फत आवश्यकती सर्व मदत करण्यात येईल , अशी ग्वाही देखील मंत्री डॉ . गावित यांनी दिली .मंत्री डॉ . गावित पुढे म्हणाले , विविध स्तरावर स्पर्धा घेतांना त्यात शिस्तीचे पालन होणे आवश्यक आहे . त्यासोबतच आयोजित करण्यात येणाऱ्या स्पर्धा व्यवस्थित पार पडतील त्यासाठी नियोजन करणे गरजेचे असल्याचेही मंत्री त्यांनी सांगितले .आदिवासी आयुक्त हिरालाल सोनवणे म्हणाले , आदिवासी विद्यार्थी हे जिद्दी , साहसी व चिकाटीचे असतात . या विद्यार्थ्यांच्या व्यक्तिमत्व विकासाकरिता आदिवासी विकास विभाग सातत्याने कार्यरत आहे . एकलव्य मॉडेल निवासी शाळा यांच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना उत्तम शिक्षण देवून त्यांना विविध क्षेत्रात प्रगतीसाठी संधी उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न आदिवासी विभाग प्रयत्न करत आहे . आयोजित करण्यात आलेल्या क्रीडा स्पर्धेच्या माध्यमातून आदिवासी विद्यार्थ्यांमध्ये असलेल्या कौशल्य व कलागुणांना उभारी देण्याचे काम आदिवासी विभाग करत आहे .  कार्यक्रमाच्या सुरुवातीला आदिवासी विकास मंत्री डॉ . विजयकुमार गावित यांच्या हस्ते क्रीडा ज्योत प्रज्ज्वलित करून तीन दिवसीय राज्यस्तरीय क्रीडा स्पर्धांचे उद्घाटन करण्यात आले . राज्यातील एक हजार 746 खेळाडू या स्पर्धेमध्ये सहभागी झाले आहेत . यासर्व खेळाडूंना क्रीडा स्पर्धेसाठी शपथ देण्यात आली . त्यानंतर बेंगलोर येथे झालेल्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेतील विजेत्यांचे डॉ . गावित यांच्या हस्ते सन्मानचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला .
   या कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन अपर आयुक्त संदीप गोलाईत यांनी केले .
0 9 4 7 5 0
Users Today : 39
Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *