अकोट तालुका मध्ये ३७ ग्रामपंचायत निवडणुका ,, प्रचार मोहिमेसाठी रणनीती चालू आगामी काळात कोण बाजी मारणार या कडे सर्वांचे लक्ष
विनोद वसु अकोट ता.प्रतिनिधी तालुक्यात
ऑक्टोबर ते डिसेंबर २०२२ या कालावधीत मुदत संपणाऱ्या ३७ ग्रामपंचायतींचा निवडणूक कार्यक्रम निवडणुक आयोगाच्या माध्यमातून जाहीर झाला आहे. तालुक्यातील ग्रामपंचायतींवर थेट जनतेतून सरपंचाची निवड केली जाणार आहे. यासाठी १८ डिसेंबर रोजी मतदान होणार असून २० डिसेंबरला निकाल लागणार आहे. त्यामुळे तालुक्यात गुलाबी थंडीत राजकीय वातावरण चांगलेच तापणार अशी चिन्हे आत्तापासूनच दिसू लागली आहेत.
सरपंच उमेदवारांसह सदस्यपदांसाठी उमेदवारांची निवड पूर्ण करून प्रचार मोहिमेसाठी रणनीती आत्तापासूनच आखली जात असल्याचे चित्र तालुक्यात दिसून येते.
आगामी काळात होणाऱ्या ग्रामपंचायतीच्या निवडणुकीत कोण बाजी मारणार याकडे सर्वांचेच लक्ष लागून राहिले आहे.
सरपंच पुन्हा जनतेतून युती सरकारचा शिंदे फडणवीस सरकारने घेतला मागे
पूर्वीच्या युती सरकारचा निर्णय बदलत महाविकासआघाडी सरकारने २०१९ साली सदस्यांमधून सरपंच निवडीचा निर्णय घेतला होता. परंतु काही महिन्यापूर्वी शिंदे फडणवीस सरकार सत्तेवर आल्यावर पुन्हा एकदा थेट जनतेतून सरपंच निवड होणार आहे. त्यामुळे ज्या गावांमध्ये ही निवडणूक होणार आहे तेथे दुसऱ्यांदा जनतेतून सरपंच निवड केली जाणार आहे. तालुक्यात होणाऱ्या ३७ ग्रामपंचायतींच्या निवडणुकीमध्ये आत्तापासूनच चुरस निर्माण झाल्याचे चित्र पाहायला मिळते.
उमेदवारांची मोर्चेबांधणीला सुरुवात
दरम्यान ग्रामपंचायत निवडणुकांमुळे ग्रामीण भागातील राजकीय वातावरण चांगले ढवळून निघाले आहे. भावी उमेदवारांनी मोर्चेबांधणीला आत्तापासूनच सुरुवात केली आहे. याच पार्श्वभूमीवर संभाव्य भावी उमेदवारांनी भाऊ, राम -राम म्हणण्यास सुरुवात केली आहे. कधी राम – राम न देणारे आता आवर्जून राम राम घेत आहेत. त्यामुळे ग्रामपंचायतीची निवडणूक ही एक प्रकारे राजकीय तालीमच समजली जाते. स्थानिक राजकारणावर पकड मजबूत करण्यासाठी ग्रामपंचायत निवडणूक हाच प्रमुख मार्ग आहे. त्यामुळे ग्रामपंचायत निवडणूक कार्यक्रम जाहीर झाल्यानंतर गावोगावच्या सर्वच राजकीय पक्षांनी कंबर कसली असून कार्यकर्ते देखील आता सतर्क झाले आहेत.
मतदारांच्या याद्या घेण्यासाठी इच्छुकांची गर्दी
तालुक्यात ग्रामपंचायत निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर झाल्यानंतर गावातील भावी उमेदवारांनी सर्वप्रथम मतदार याद्या गोळा करून आपल्या वार्डात किती मतदार आहेत. यापैकी किती जणांचे मतदान आपल्याला मिळू शकते, याचा अंदाज घेत सरपंच की सदस्य पदासाठी उमेदवारी अर्ज दाखल करायचा याची तयारी करण्यास सुरुवात केल्याचे चित्र दिसून येते.
Users Today : 11