कितीही नोटीस आल्या तरी मागे हटणार नाही : काहीही झाले तरी जलसमाधी आंदोलन होणारचं: रविकांत तुपकर आंदोलनावर ठाम
बुलढाणा, प्रतिनिधी
स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते रविकांत तुपकरांना आता नोटीस दिली आहे. मुंबईच्या अरबी समुद्रात होणारे जलसमाधी आंदोलन थांबवा, अन्यथा पोलीस कारवाई करू, असा इशारा पोलिसांनी एक नोटीशीद्वारे रविकांत तुपकरांना दिला आहे. बुलढाणा शहर पोलीस स्टेशनचे ठाणेदार प्रल्हाद काटकर यांनी दि.19 नोव्हें. च्या रात्री 12.00 वा. तुपकरांच्या निवासस्थानी जावून नोटीस बजावली. परंतु अशा नोटीशींना मी घाबरत नाही, काही झालं तरी जलसमाधी आंदोलन करणारचं असा ठाम निर्धार रविकांत तुपकरांनी केला आहे.
सोयाबीन-कापूस प्रश्नी रविकांत तुपकरांनी गेल्या अनेक दिवसांपासून आक्रमक भूमिका घेतली आहे. खाजगी बाजारात सोयाबीनचा भाव प्रति क्वि.8,500 रु. व कापसाचा भाव प्रति क्वि.12,500 रु. स्थिर रहावा यासाठी सरकारने धोरण आखावे, यासह अन्य मागण्यांसाठी रविकांत तुपकर चांगलेच आक्रमक झाले आहेत. 6 नोव्हेंबर रोजी तुपकरांच्या नेतृत्वाखाली बुलढाण्यात हजारो शेतकऱ्यांचा विराट मोर्चा निघाला होता. त्यावेळी तुपकरांनी मागण्या मान्य न झाल्यास राज्यभर आंदोलन पेटवू,असा इशारा दिला होता. सोयाबीन-कापूस उत्पादकांच्या प्रश्नावर सरकारने दुर्लक्ष केल्यामुळे तुपकरांनी मुंबईच्या मंत्रालयाशेजारील अरबी समुद्रात हजारो शेतकऱ्यांसह जलसमाधी घेणार असल्याचा इशारा दिला आहे. यामुळे प्रशासनाची आता चांगलीच तारांबळ उडालेली दिसत आहे. पोलिसांनी रविकांत तुपकरांना दिलेल्या नोटिशीमुळे कार्यकर्ते संतप्त झाले आहेत. रविकांत तुपकर मात्र आंदोलनावर ठांम असल्यामुळे सरकार आणि तुपकरांमध्ये संघर्ष होण्याची चिन्हे निर्माण झाली आहेत.सरकार शेतकऱ्यांना जगूही देत नाही,मरुही देत नाही,अशा नोटीशीला आम्ही घाबरत नाही, अश्या नोटीसांनी माझ्या घरातील कपाट भरले आहेत. जर सरकारला आमची प्रेतचं पाहिजे असतील तर 24 नोव्हें.ला बघूनच घ्या…! असेही तुपकर म्हणाले. मंत्रालयाशेजारील अरबी समुद्रात जलसमाधी घेणारचं, हिम्मत असेल तर अडवूनच दाखवा,असे आवाहनच रविकांत तुपकरांनी सरकारला दिले आहे.
Users Today : 30