नांदुरा येथे विविध योजनांच्या लाभाचे वाटपबुलडाणा,
राज्य शासन सर्वसामान्य जनता केंद्रबिंदू मानून निर्णय घेत आहे. यात शेतकरी वर्गाला चिंतामुक्त करण्यात पुढाकार घेण्यात आला आहे. महात्मा फुले सन्मान योजनेतून शेतकऱ्यांना कर्जमुक्त करण्यात येत आहे. त्यासोबतच भूविकास बँकेकडे गहाण असलेली 69 हजार एकर जमीन मुक्त करण्यात आली आहे, अशी माहिती सहकार आणि इतर मागास बहुजन कल्याण मंत्री अतुल सावे यांनी दिली.
नांदुरा येथे रविवारी, दि. २५ नोव्हेंबर २०२२ रोजी स्व. अटलबिहारी वाजपेयी यांच्या जयंतीनिमित्त सेवा सप्ताह अंतर्गत विविध शासकीय योजनांचा लाभ देण्यासाठी शिबिर पार पडले. यावेळी चैनसुख संचेती, शिवचंद्र तायडे आधी उपस्थित होते.
श्री. सावे म्हणाले, राज्य शासन सर्वसामान्य जनतेचे सरकार आहे. सकारात्मक विचार करून नागरिकांसाठी उपयोगी असणारे निर्णय घेण्यात येत आहे. लोकप्रतिनिधींनी त्यांच्याकडे असणाऱ्या योजना सांगाव्यात, त्या पूर्ण करण्यासाठी मदत करण्यात येईल.नागरिकांसाठी आयुष्यमान भारत ही आरोग्याची काळजी घेणारी योजना, उज्वला गॅस, रस्त्यांचे जाळे, सुकन्या, गरोदर माता, कौशल्य विकासाचे शिक्षण, जनधन योजना, मुद्रा योजना अशा विविध योजना राबविण्यात येत आहे. यातून समाजात बदल घडवून आणण्याचा प्रयत्न करण्यात येत आहे. सरकारच्या माध्यमातून विकास होत असताना जनतेसाठी आतापर्यंत शंभरावरून अधिक निर्णय घेण्यात आले आहे. पूर्वीच्या तुलनेत आता १५०० विद्यार्थ्यांना डॉक्टररेट, १५०० विद्यार्थ्यांना स्पर्धा, ५० विद्यार्थ्यांना परदेशी शिक्षण, पायलट प्रशिक्षण, जिल्ह्याच्या ठिकाणी वसतिगृह आदी योजना राबविण्यात येत आहे, असे त्यांनी सांगितले.यावेळी पूजा वाकोडे यांना जात प्रमाणपत्र, समेक जाधव अधिवास प्रमाणपत्र, कमलेश वाकोडे राष्ट्रीयत्व प्रमाणपत्र, रवींद्र जोशी आर्थिकदृष्ट्या मागास प्रवर्ग प्रमाणपत्र, गयाबाई जावकर आणि रेखाबाई ढोले यांना आर्थिक मदत प्रदान करण्यात आली. यावेळी आणिबाणीच्या काळात बंदिवास भोगलेल्यांचा सत्कार करण्यात आला.
Users Today : 17