चिखलीतील वाहतूक कोंडी गंभीर; नागरिकांचा पोलिस व पालिका प्रशासनावर संताप

KHOZ MASTER
2 Min Read

चिखली 

चिखली शहरातील वाहतुकीचा प्रश्न दिवसेंदिवस गंभीर बनत असून वाहतूक कोंडी, बेशिस्त पार्किंग, अतिक्रमण आणि अवजड वाहनांची शहरातील वाढती वर्दळ यामुळे नागरिक त्रस्त झाले आहेत. मात्र या समस्यांवर ठोस उपाययोजना करण्याऐवजी पोलिस आणि पालिका प्रशासन बघ्याच्या भूमिकेत असल्याची संतप्त प्रतिक्रिया नागरिकांतून व्यक्त होत आहे.

शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौक ते खामगाव चौफुली हा मार्ग सध्या सर्वाधिक वाहतूक कोंडीचा ठरला आहे. या परिसरात बँका, व्यावसायिक प्रतिष्ठाने, दुकाने आणि विविध कार्यालयांची मोठी संख्या असल्याने दिवसभर वाहनांची गर्दी असते. मात्र पार्किंगची कोणतीही नियोजनबद्ध व्यवस्था नसल्याने रस्त्याच्या दोन्ही बाजूंनी वाहने उभी केली जातात. परिणामी वाहतुकीचा वेग मंदावून वारंवार कोंडी निर्माण होत आहे.

नागरिकांच्या मते, वाहतूक पोलिसांच्या उपस्थितीतही बेशिस्त पार्किंगवर प्रभावी कारवाई होत नाही. त्याऐवजी हेल्मेट, कागदपत्रे आणि इतर कारणांवरून वाहनधारकांना अडवून चलान फाडण्यावर अधिक भर दिला जात असल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे.

दरम्यान, खामगाव-जालना महामार्गावरील खामगाव चौफुली येथे दिशादर्शक फलकांचा अभाव असल्याने बाहेरगावाहून येणाऱ्या अवजड वाहनांची दिशाभूल होत आहे. चौफुलीवरील चारही दिशांचे रस्ते एकसारखे दिसत असल्याने ट्रेलर आणि मोठी वाहने थेट शहरात प्रवेश करतात. शहरातील अरुंद रस्त्यांमध्ये ही वाहने अडकल्यानंतर वाहतूक ठप्प होते आणि नागरिकांना मोठ्या गैरसोयीला सामोरे जावे लागते.

विशेषतः ‘यू-टर्न’ घेताना अवजड वाहनांमुळे दीर्घकाळ वाहतूक कोंडी निर्माण होत असल्याचे चित्र आहे. त्यामुळे शहरातील वाहतूक व्यवस्थेचे नियोजन, पार्किंगची सुविधा, अतिक्रमण हटविणे आणि योग्य दिशादर्शक फलक उभारणे यासारख्या उपाययोजना तातडीने राबविण्याची मागणी नागरिकांकडून होत आहे.

0 9 7 1 9 3
Users Today : 23
Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *