बदलत्या काळात कुटुंब व्यवस्थेचे वास्तव; जागतिक कुटुंब दिनानिमित्त बुलढाण्याचे सामाजिक चित्र समोर

KHOZ MASTER
3 Min Read

बुलढाण 

मोबाईलच्या पडद्यावर एकाच घरातील चार माणसं वेगवेगळ्या जगात हरवलेली, रोजगारासाठी मुलं पुणे-मुंबईसारख्या शहरांत स्थायिक झालेली, गावात एकाकी राहणारे वृद्ध आई-वडील, शिक्षणासाठी वाढत चाललेले कर्ज आणि महिलांवर वाढणाऱ्या जबाबदाऱ्यांचा ताण… जागतिक कुटुंब दिनानिमित्त बुलढाणा जिल्ह्याकडे पाहिल्यास आजच्या बदलत्या कुटुंब व्यवस्थेचे हे वास्तव स्पष्टपणे समोर येत आहे.

यंदाचा जागतिक कुटुंब दिन “कुटुंब, असमानता आणि बालकल्याण” या संकल्पनेखाली साजरा केला जात आहे. संयुक्त राष्ट्र संघाने कुटुंबाभिमुख सामाजिक सुरक्षा, महिलांच्या आर्थिक सहभागाला चालना, बालसंगोपन आणि गुणवत्तापूर्ण शिक्षण यावर भर देण्याची आवश्यकता अधोरेखित केली आहे. बुलढाणा जिल्ह्यातील परिस्थितीदेखील याच वास्तवाशी मिळतीजुळती असल्याचे दिसून येते.

जिल्ह्यातील मोठा वर्ग अजूनही शेतीवर अवलंबून आहे. मात्र शेतीतील अनिश्चितता, कमी होत चाललेले उत्पन्न आणि मर्यादित रोजगाराच्या संधींमुळे अनेक कुटुंबांची आर्थिक घडी विस्कटत चालली आहे. शिक्षण आणि नोकरीसाठी युवक मोठ्या शहरांकडे स्थलांतर करत असल्याने संयुक्त कुटुंब पद्धती हळूहळू कमी होत असल्याचे सामाजिक जाणकारांचे मत आहे.

एकीकडे मुलांच्या शिक्षणासाठी पालकांना कर्जाचा आधार घ्यावा लागत आहे, तर दुसरीकडे मोबाईल आणि सामाजिक माध्यमांच्या वाढत्या वापरामुळे घरातील संवाद कमी होत असल्याची खंतही व्यक्त केली जात आहे. एकाच घरात राहूनही कुटुंबातील सदस्यांमध्ये भावनिक दुरावा वाढत असल्याचे चित्र अनेक ठिकाणी पाहायला मिळत आहे.

महिलांवरील वाढता ताण

बदलत्या कुटुंब व्यवस्थेचा सर्वाधिक परिणाम महिलांवर होत असल्याचे दिसून येते. ग्रामीण भागातील महिला घरकामासोबत शेती, मुलांचे संगोपन, वृद्धांची देखभाल आणि काही ठिकाणी नोकरी अशा अनेक जबाबदाऱ्या सांभाळत आहेत. त्यामुळे त्यांच्यावर मानसिक आणि शारीरिक ताण वाढत असल्याचे आरोग्य क्षेत्रातील तज्ज्ञ सांगतात.

जिल्ह्यात ५.६० लाख कुटुंबे

२०११ च्या जनगणनेनुसार बुलढाणा जिल्ह्याची लोकसंख्या सुमारे २५.८६ लाख असून जिल्ह्यात सुमारे ५ लाख ६० हजार कुटुंबांचा समावेश आहे. बहुतांश लोकसंख्या ग्रामीण भागात वास्तव्यास आहे. साक्षरतेत वाढ झाली असली तरी महिला साक्षरता, सामाजिक संधी आणि आर्थिक सहभागामधील तफावत अजूनही कायम असल्याचे दिसून येते.

कुटुंबांसमोरील प्रमुख आव्हाने

  • रोजगारासाठी वाढते स्थलांतर
  • शिक्षणाचा वाढता आर्थिक बोजा
  • वृद्धांमधील एकाकीपणा
  • महिलांवरील वाढत्या जबाबदाऱ्या
  • मोबाईलमुळे कमी होत चाललेला कौटुंबिक संवाद

जागतिक कुटुंब दिन हा केवळ शुभेच्छांचा दिवस नसून समाजातील बदलत्या नातेसंबंधांचा आणि सामाजिक वास्तवाचा आरसा असल्याचे मत व्यक्त होत आहे. सुविधा वाढल्या, घरं मोठी झाली; मात्र नात्यांमधील ऊब आणि संवाद टिकून आहे का, हा प्रश्न आज बुलढाण्यासह संपूर्ण समाजासमोर उभा ठाकला आहे.

0 9 7 1 9 3
Users Today : 23
Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *