हिरकणी कक्षांची दयनीय अवस्था; स्तनदा मातांची होतेय गैरसोय

KHOZ MASTER
2 Min Read

बुलढाणा

स्तनदा मातांना सार्वजनिक ठिकाणी आपल्या तान्हुल्याला सुरक्षित आणि सन्मानपूर्वक स्तनपान करता यावे, यासाठी बसस्थानकांसह विविध शासकीय कार्यालयांमध्ये उभारण्यात आलेले ‘हिरकणी कक्ष’ अनेक ठिकाणी दुर्लक्षित अवस्थेत असल्याचे चित्र समोर आले आहे. काही ठिकाणी या कक्षांना कायम कुलूप लावलेले दिसते, तर काही ठिकाणी अडगळ आणि इतर साहित्य ठेवून मूळ उद्देशालाच हरताळ फासण्यात आला आहे. परिणामी स्तनदा महिलांची मोठ्या प्रमाणात गैरसोय होत असल्याची भावना व्यक्त होत आहे.

महिला प्रवाशांची अडचण लक्षात घेऊन राज्य परिवहन महामंडळाने प्रत्येक बसस्थानकात वाहतूक नियंत्रक कक्षाजवळ हिरकणी कक्ष उभारले होते. या कक्षांबाहेर माता आणि बालकाचे चित्र लावून ओळख निर्माण करण्यात आली होती. माता आणि तिच्या तान्हुल्याव्यतिरिक्त इतर कुणालाही प्रवेश नसावा, अशी व्यवस्था करण्यात आली होती. तसेच महिला प्रवाशांना माहिती मिळावी यासाठी उद्घोषणादेखील करण्यात येत होती.

बुलढाणा बसस्थानकात कुलूपबंद कक्ष

बुलढाणा शहरातील बसस्थानकात हिरकणी कक्षाची सुविधा उपलब्ध असली तरी तो बहुतांश वेळा कुलूपबंद अवस्थेत असल्याचे दिसून येते. जिल्ह्यातील इतर अनेक बसस्थानकांमध्येही अशीच परिस्थिती असल्याची शक्यता व्यक्त होत आहे. त्यामुळे प्रवासादरम्यान स्तनदा मातांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे.

शासकीय कार्यालयांतीलही तीच अवस्था

बसस्थानकांसोबतच अनेक शासकीय कार्यालयांमध्येही हिरकणी कक्ष उभारण्यात आले आहेत. मात्र प्रत्यक्षात अनेक ठिकाणी या कक्षांचा वापर अडगळ ठेवण्यासाठी केला जात असल्याचे दिसून येत आहे. काही कार्यालयांमध्ये कक्ष कायम बंद ठेवले जात असल्याने महिलांना अपेक्षित सुविधा मिळत नाहीत.

काय आहे हिरकणी कक्ष?

स्तनदा मातांना सार्वजनिक ठिकाणी किंवा कार्यालयांमध्ये आपल्या बाळाला सुरक्षित, स्वच्छ आणि आरामदायी वातावरणात स्तनपान करता यावे तसेच काही वेळ विश्रांती घेता यावी, यासाठी उपलब्ध करून दिलेली स्वतंत्र आणि खासगी जागा म्हणजे हिरकणी कक्ष होय.

हिरकणी कक्षात अपेक्षित सुविधा

  • स्तनपानासाठी शांत आणि सुरक्षित स्वतंत्र जागा
  • बसण्यासाठी खुर्ची किंवा सोफ्याची व्यवस्था
  • स्वच्छ पिण्याचे पाणी
  • पंखा किंवा हवेशीर व्यवस्था
  • बाळाचे कपडे किंवा डायपर बदलण्यासाठी सुविधा
  • स्वच्छतागृह आणि चेंजिंग रूम
  • महिलांच्या सुरक्षिततेसाठी स्वतंत्र कुलूपबंद कक्ष

महिला आणि बालकांच्या आरोग्याच्या दृष्टीने हिरकणी कक्ष अत्यंत महत्त्वाचे मानले जात असताना त्यांची योग्य देखभाल आणि नियमित वापर सुनिश्चित करण्याची मागणी नागरिकांकडून होत आहे. प्रशासनाने याकडे गांभीर्याने लक्ष देऊन बंद कक्ष सुरू करावेत आणि आवश्यक सुविधा उपलब्ध करून द्याव्यात, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

0 9 7 1 9 3
Users Today : 23
Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *