बार्टीने घेतला ध्यास – मातंग समाजाचा होईल विकास !!

Khozmaster
13 Min Read
                                                                          प्रतिनिधि रवि मगर                                                                                                                                                                                                                                                     डॉ.बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था (बार्टी) पुणेची स्थापना 22 डिसेंबर 1978 साली समता विचारपीठ या नावाने मुंबईत झाली. डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचा सामाजिक समतेचा विचार जनसामान्यांपर्यंत पोहोचविण्यासाठी आणि यासंबंधी अधिक संशोधन व प्रशिक्षण व्हावे या उद्देशाने ही संस्था स्थापन करण्यात आली. कलम 46 नुसार राज्य हे दुर्बलतर जनवर्ग आणि विशेषत: अनुसूचित जाती व अनुसूचित जनजाती यांचे विशेष काळजीपूर्वक शैक्षणिक व आर्थिक हितसंवर्धन करील आणि सामाजिक अन्याय व सर्व प्रकारचे शोषण यांपासून त्यांचे संरक्षण करील अशी ग्वाही भारतीय संविधानाने दिलेली आहे.संविधानातील ही तरतूदच बार्टीच्या निर्मीतीचा गाभा आहे. महाराष्ट्र शासनाच्या  सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागांतर्गत ही संस्था सन 2008 पासून स्वायत्तरित्या कार्यरत आहे. बार्टीचे मुख्यालय 28 क्विन्स गार्डन ,कॅम्प पुणे येथे असून महाड, नागपूर आणि नाशिक येथे उपकेंद्र आहेत.महाराष्ट्र राज्यातील अनुसूचित जातीतील 59 समाज घटकांच्या सर्वांगीण विकासासाठी बार्टी प्रयत्नशील आहे. बार्टीमध्ये कार्यरत संशोधन विभाग, प्रशिक्षण विभाग, योजना विभाग,विस्तार व सेवा विभाग,जात वैधता प्रमाणपत्र विभाग,लेखा विभाग व आस्थापना विभाग इ.विभागामार्फत बार्टीच्या विविध योजनांची अंमलबजावणी होत असते.तर विविध योजना आणि कार्याचा प्रसार आणि प्रचार करण्याचे कार्य समतादूत करत आहेत. अनुसूचित जातीला पडणाऱ्या प्रत्येक प्रश्नाची उकल करण्याची क्षमता बार्टीने निर्माण केलेली आहे. अनुसूचित जातीतील सर्व समाज घटकांना विकासाच्या मुख्य प्रवाहात आणने हे बार्टीचे ध्येय आहे. त्यातही वंचित आणि उपेक्षित असलेल्या समाज घटकांना प्राधान्य देऊन त्यांच्या विकासासाठी बार्टी विशेष प्रयत्न करत असल्याचे दिसून येते. यासाठी बार्टीचे महासंचालक धम्मज्योती गजभिये यांनी सामाजिक बांधिलकी आणि डॉ.बाबासाहेब आंबेडकरांना अपेक्षित असलेल्या सामाजिक समतेचा ध्येयवाद जोपासत या उपेक्षित घटकांच्या विकासासाठी पुढाकार घेतला आहे.
अनुसूचित जातीतील मांग-मातंग जात ही अतिप्राचीन असून एकेकाळी त्यांची स्वतंत्र राज्य होती. बदलत्या काळानुसार ते गतवैभव लयास जाऊन हा समाज सामाजिक गुलामगिरी, दारिद्रय आणि अज्ञानात लोटला गेला. महाराष्ट्रातील मातंग समाज हा विकासाच्या मुख्य प्रवाहापासून शेकडो हात दूर उभा आहे. हे आजचे वास्तव सूर्यप्रकाशाइतके स्पष्टपणे दिसून येते. आजही मातंग समाज मनुस्मृतीकालीन जीवन जगतो आहे की काय, याची शंका घेण्याइतपत ही परिस्थिती आज आपल्या समोर उभी आहे. 21 व्या शतकात हा समाज तितकाच दैववाद, कर्मकांड आणि त्याच-त्या अंधश्रध्दा, जादूटोणा यांसारख्या निष्कृष्ठ प्रथात अडकून पडला आहे. स्वाभाविकच मातंग समाजात इतर प्रगत जातीहून कितीतरी पटीने कमी असलेले शिक्षणाचे प्रमाण पाहायला मिळते.बेरोजगारी आणि त्यातून आलेल्या गरिबीमुळे समाजातील तरूण पिढी व्यसनाधिनतेच्या आहारी जातांना पाहायला मिळते. याचा एक भाग म्हणून ग्रामीण आणि शहरी भागातील मातंग मुलां-मुलींचे लग्ने कमी वयात होत असलेली दिसून येतात. पुर्ण शारिरीक आणि बौधिक वाढ होण्याअगोदरच किंवा कमवता मुलगा किंवा मुलगी होण्याअगोदरच त्यांच्यावर लग्नाची जबाबदारी येऊन पडत असल्यामुळे वैवाहीक समस्या आणि अपघात (घटस्फोट वगैरे) यांचे प्रमाण समाजात वाढलेले आहे.  महिलांच्या व बालकांच्या आरोग्यांचे प्रश्न आज  मोठे उग्र रुप घेऊन उभा राहिलेले आहेत.  त्यामुळे महाराष्ट्र शासनाच्या अनेक शासकीय योजनांचा लाभ घेण्यासाठी हे तरूण पात्र ठरतांना दिसत नाहीत.पुरेशी आर्थिक स्थिती नसल्यामुळे त्याला उद्योग-व्यवसायाला राष्ट्रीयकृत, बिगर राष्ट्रीयकृत बँकांचे कर्ज उपलब्ध होऊ शकत नाही. रोजगार आणि नोकरीतून स्थिरता मिळत नाहीच.परंतू कसून खाण्यासारखे जमिनीचे क्षेत्रही त्याच्या वाटनीला येत नाही. IT, IIT यांसारखी क्षेत्रे जणु या समाजातील तरुणांच्यासाठी नाहीतच अशी घट्ट धारणा एकूणच या सामाजिक परिस्थितीतून तरुणांच्या मनामध्ये बळावली आहे. अशाप्रकारे या-ना-त्या अवनतीच्या असंख्य बाबींमुळे मातंग समाजाचे सामाजिक, आर्थिक, राजकीय, शैक्षणिक जीवन आजच्या घडीला पार उध्दवस्त होऊन गेले आहे. सर्वार्थाने गरीब आणि शोषित बनलेल्या या समाजाचे बळकटीकरण करण्यासाठी ठोस पावले उचलणे अवश्य आहेत.
स्वातंत्र्याच्यानंतर भारतीय संविधानाने सर्व नागरिकांच्या विकासासाठी अनेक तरतुदी केल्या आहेत. शासन देखील या वंचित उपेक्षीत घटकांच्या सर्वांगीण विकासासाठी अनेक योजना राबवित आहे. परंतू अजुनही या समाजाचा पाहिजे तसा विकास झाला नाही त्यामुळे या समाजाकडे विशेष लक्ष देऊन विविध योजनांची आखणी आणि अंमलबजावणी करण्याचा बार्टीने प्रयत्न केला आहे.डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचा सामाजिक समतेचा, न्यायाचा विचार तळागाळातील सर्व उपेक्षीत-वंचित घटकांपर्यत पोहोचविण्यासाठी बार्टीकडून आजवर प्रयत्न होत आलेत.त्यासाठी बार्टीने अनु.जातीतील 59 घटकांना आपल्या केंद्रस्थानी आणलेले आहे.या घटकांपैकी एक असलेल्या मातंग समाजाच्या 13 मातंग परिषदा डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी सन 1920 ते 1945 या काळात घेतल्या होत्या.त्याचाही शास्त्रशुध्द अभ्यास बार्टीकडून सध्या होत आहे.ही समिती यासाठी महाराष्ट्रभर फिरून मातंग समाजाचा डॉ.आंबेडकर यांच्याशी असलेला ऋणानूबंध शोधून काढणार आहे. डॉ.आंबेडकर यांचा मातंग समाजाप्रती असलेला बंधुत्व, न्यायाचा दृष्टीकोण या कार्यामुळे जनतेसमोर जाणार आहे. अगदीच अलिकडे, बार्टीकडून मांग-गारुडी आणि मांग-रामोशी यांच्या संबंधीचे शास्त्रशुध्द अहवालही शासन स्तरावर पाठवून दिलेले आहेत.पुढील काळात शासन स्तरावरून या अभ्यासाला अनुमती मिळाली तर या उपेक्षित घटकाला निश्चितपणे न्याय मिळणार आहे.अर्थातच,डॉ.आंबेडकर यांचा या समाजाप्रती असलेला बंधुभावही या निमित्ताने अधोरेखित होणार असला तरी या घटनेमुळे एका उपेक्षित घटकाला न्याय मात्र मिळणार आहे, हे निश्चित मातंग समाजाच्या या सर्व समस्याची जाण बार्टीला असल्यामुळे ह्या समाजाच्या अल्पकालीन आणि दीर्घकालीन योजनांचा विकास आराखडा तयार करण्यासाठी बार्टीने महाराष्ट्रातील मातंग समाजाचे लोकप्रतिनिधी, सामाजिक संस्था / संघटनांचे प्रतिनिधी तसेच साहित्यीक आणि विचारवंत इ. समाज बांधवांना सोबत घेऊन दि.11.11.2022 रोजी ऑनलाईन बैठकीचे आयोजन केले यासाठी सामाजिक न्याय विभागाचे आयुक्त डॉ.प्रशांत नारनवरे आणि बार्टीचे महासंचालक धम्मज्योती गजभिये यांनी विविध समस्यावर सर्वांगाने विचार करून विकासाच्या वाटा मोकळ्या केल्या. यावेळी ऑनलाईन बैठकीत उपस्थित असलेल्या प्रतिनिधींनी मांडलेले प्रश्न सूचविलेले उपाय, शिफारशी इत्यादींना संकलीत करून एक मातंग विकास आराखडा तयार केला आणि त्याच्या अंमलबजावणीची जबाबदारी देखील निश्चित केली. या विकास आराखड्यानूसार बार्टी कार्य करणार आहे. यामध्ये आर्थिक (भौतिक) विकास आणि सामाजिक (वैचारिक) विकास अशा दोन घटकांवर लक्ष केंद्रीत करून बार्टीने आपली वाटचाल सूरू केलेली आहे. या आराखड्यानूसार अनेक विकासात्मक बाबींवर कार्य होत आहे.
मातंग समाजाच्या प्रतिनिधींना सोबत घेऊन बार्टीने केवळ विकास आराखडाच तयार केला नाही तर दिलेला शब्द देखील पूर्ण केलेला आहे. या आराखड्यात ठरल्याप्रमाणे मुद्दा क्र.02 नुसार सामाजिक जागृती व वैचारीक प्रबोधन करण्यासाठी साहित्यरत्न लोकशाही अण्णाभाऊ साठे पुरोगामी विचारमंचाची स्थापना दि.29.11.2022 रोजी करण्यात आली. हा मंच समाजाच्या प्रबोधनासाठी विविध कार्यक्रम, परिषदा संमेलने, जागृती मेळावे घेऊन समाजाच्या वैचारिक प्रबोधनासाठी कार्य करणार आहे. त्यासाठी त्यातील निमंत्रीत अध्यक्ष,सदस्य व कार्यकारणी नियोजन करत आहे.
तसेच मुद्दा क्र.03 नुसार स्पर्धा परीक्षेच्या माध्यमातून प्रशासकीय सेवेमध्ये टक्का वाढावा, जास्तीत-जास्त मांग-मातंग समाजाच्या तरुणांनी स्पर्धा परिक्षेत यशस्वी व्हावे. याकरिता मातंग समुदायाच्या विद्यार्थ्यांना महाराष्ट्रातील पुणे, मुंबई, नाशिक, औरंबागाद आणि लातूर इ.ठिकाणी प्रत्येकी 150 विद्यार्थी याप्रमाणे 1050 विद्यार्थ्यांसाठी विभागस्तरावर निवासी स्पर्धा परीक्षा प्रशिक्षण केंद्र सुरु करण्यात येत आहेत. यामध्ये महाराष्ट्रातील अनु.जातीतील मांग-मातंग, मिनिमादिग, दखनी-मांग, मांग-म्हशी, मदारी, गारुडी, राधमांग, मांग-गारोडी, मांग-गारुडी या समाज घटकातील युवक व युवतींना बँक (IBPS), रेल्वे, LIC इ. व तत्सम पदाच्या स्पर्धा परिक्षेच्या पूर्व तयारीसाठी निवासी स्वरुपाचा प्रशिक्षण कार्यक्रम निशुल्क राबविण्यात येणार आहे.
महाराष्ट्र शासनाच्या आगामी पोलीस भरतीच्या अनुषंगाने अनुसूचित जाती आणि त्यातील मांग-मातंग व इतर घटकांकरिता राज्यातील 36 जिल्ह्यांमध्ये 06 महिने कालावधीचे पोलीस मिलिटरी भरती पूर्व प्रशिक्षण कार्यक्रम राबविण्यासाठी प्रशिक्षण संस्थांची निवड करण्याकरिता ही ई-निवीदा प्रक्रीया राबविली आहे. सन 2022-23 या कालावधीत मांग-मातंग समाजातील एकूण 314 उमेदवारांनी महाराष्ट्रातील विविध प्रशिक्षण संस्थेमार्फत या प्रशिक्षणाचा लाभ घेतला. तसेच महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत घेण्यात येणाऱ्या राज्यसेवा परिक्षेमध्ये जास्तीत-जास्त अनु.जाती मांग-मातंग व इतर घटकाची निवड व्हावी. याकरिता बार्टी संस्थेमार्फत राज्यातील 05 महसूल ठिकाणी प्रशिक्षण संस्थांची निवड करण्याकरिता ई-निवीदा प्रक्रीया सुरू आहे. सन 2019-22 या कालावधी दरम्यान मांग-मातंग समाजातील एकूण 65 विद्यार्थ्यांनी महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत घेण्यात येणाऱ्या राज्यसेवा पूर्व परिक्षेचा लाभ घेतला. केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या नागरी सेवा परिक्षेमध्ये देखील या वंचित घटकातील विद्यार्थ्यांचे निवड होण्याचे प्रमाण वाढावे यासाठी बार्टी संस्थेच्या वतीने सन 2015 पासून दिल्ली येथील नामवंत खाजगी प्रशिक्षण संस्थेच्या मार्फत केंद्रीय नागरी सेवा परिक्षेचे पूर्व कार्यक्रम सुरू आहे. यामध्ये सन 2016-17 ते 2022-23 या कालावधीत मांग-मातंग समाजातील एकूण 69 विद्यार्थ्यांनी लाभ घेतला. तसेच महाराष्ट्रातील 06 महसूल विभागातील खाजगी प्रशिक्षण संस्थामधील Pre IAS, SIAC Mumbai व यशदा पुणे अशा शासकीय प्रशिक्षण संस्थामधून 47 विद्यार्थ्यांनी लाभ घेतला आहे. नागरी सेवा मुख्य परिक्षेस पात्र ठरलेल्या मांग-मातंग समाजातील 31 विद्यार्थ्यांना बार्टीच्या आर्थिक सहाय्य योजनेचा लाभ मिळाला. तर 05 विद्यार्थ्यांना नागरी सेवा आर्थिक सहाय्य योजनेचा लाभ मिळाला. सन 2013 पासून अनु.जाती आणि त्यातील वंचित मांग-मातंग व इतर घटकातील विद्यार्थ्यांच्या संशोधक वृतीला मान देऊन संशोधक निर्माण करण्याच्या दृष्टीकोनातून बार्टी संस्थेने डॉ.बाबासाहेब आंबेडकर नॅशनल रिसर्च फेलोशिप (BANRF) सुरू केली त्यामुळे Ph.D व M.Phil करणाऱ्या मांग-मातंग वंचित घटकातील समाजातील 114 विद्यार्थ्यांना सन 2022 पर्यंत लाभ मिळाला आहे. तर सन 2021 च्या फेलोशिप निवड प्रक्रीयेमध्ये मांग-मातंग समाजातील 85 विद्यार्थ्यांचा समावेश आहे.
अशाप्रकारे मातंग समाजाच्या विकासाचा ध्यास बार्टीने घेतला आहे. याशिवाय आद्यक्रांतीवीर वस्ताद लहूजी साळवे व क्रांती आग्रणी मुक्ता साळवे यांच्या जीवन कार्यावर सखोल संशोधन करण्यासाठी बार्टीने संशोधन प्रकल्प हाती घेतला आहे. अनुसूचित जाती व वंचित मांग-मातंग जातीतील महाराष्ट्रामध्ये JMFC परिक्षेची तयार करणाऱ्या अनुसूचित जातीच्या विद्यार्थ्यांना आरक्षणाची तरतूद नाही. मात्र गुजरात, पंजाब, बिहार, पश्चिम बंगाल, दिल्ली, हरियाणा, राजस्थान, उत्तर प्रदेश आणि तेलंगणा इ. राज्यात अनुसूचित जातीला JMFC आरक्षणाची तरतूद आहे. या राज्यांप्रमाणे महाराष्ट्रातही अनुसूचित जातीला JMFC मध्ये 13% आरक्षणाची तरतुद व्हावी. यासाठी बार्टीमार्फत JMFC या परिक्षेची तयारी करणाऱ्या अनुसूचित जातीतील व न्यायालयात Practice करणारे वकिल व विद्यार्थी यांचे सर्वेक्षण करून शासनास हा अहवाल सादर करणार आहे.
अनु.जातीतील मांग-मातंग समाजाच्या विकासासाठी बार्टी भविष्याचा वेध घेऊन विविध योजना राबविण्याचे नियोजन करीत आहे. अनु.जातीतील लोककलावंत आणि लोककला यांची जोपासना व्हावी यासाठी बार्टी आंतरराष्ट्रीय दर्जाचे सांस्कृतिक केंद्र उभारणार आहे. अनु.जातीला पडणाऱ्या प्रत्येक प्रश्नावर संशोधन करून विकासाचा मार्ग दर्शविणाऱ्या डॉ.बाबासाहेब आंबेडकर रिसर्च सेंटरची स्थापना करण्याचा बार्टीचा मानस आहे.या सेंटर मार्फत फुले,लहुजी, मुक्ता, अण्णा भाऊ, शाहू आंबेडकर यांच्या जीवनकार्यावर, त्यांच्या साहित्यावर पदवी,पदव्युत्तर अभ्यासक्रम अनेक विद्यापीठामध्ये सुरू करण्याचे प्रस्तावीत आहे. बार्टीच्या पुढाकाराने नुकताच लहुजी साळवे यांचे डाक तिकीट काढण्यासाठी केंद्र सरकारकडे प्रस्ताव सादर करण्यात आला आहे. ही समाजाच्या अस्मितेसाठी आवश्यक बाब आहे. शिक्षण हे वाघीणीचे दुध आहे, जो पिईल तो गुरगूरल्याशिवाय राहणार नाही याची जाणीव डॉ.बाबासाहेब आंबेडकरांनी करून दिली. शिक्षणाशिवाय आपला उध्दार होणार नाही हा विचार समाजात रुजविण्यासाठी बार्टी पुढाकार घेऊन राज्यातील मातंग वस्त्यामध्ये लोकशाहिर अण्णा भाऊ साठे पुरोगामी विचारमंचाच्या माध्यमातून जागृतीचे  कार्य करणार आहे. तसेच त्या वस्त्यांमध्ये अभ्यासिका देखील लवकरच सुरू होतील.
अनु.जातीच्या भूतकाळातील अंध:कार आणि वर्तमानकाळातील अस्वस्थतेला दिशा दर्शविणारा दीपस्तंभ म्हणजे बार्टी होय ! अनुसूचित जातीच्या विकासासाठी बार्टी हे उजेडाचे झाड आहे. महात्मा जोतीराव फुले, लहुजी वस्ताद साळवे, मुक्ता साळवे, गोपाळबाबा वलंगकर राजर्षी शाहू महाराज, डॉ.बाबासाहेब आंबेडकर, शिवराम जानबा कांबळे आणि लोकशाहिर अण्णा भाऊ साठे यांनी पाहिलेले न्याय स्वातंत्र,समता आणि बंधुता यावर आधारलेल्या नवसमाजाचे स्वप्न पूर्ण करण्याच्या दिशेने सुरू असलेली बार्टीची वाटचाल अभिनंदनिय आहे. सर्व समाज घटकांना सोबत घेऊन सामाजिक जाणीवेने आपल्या अधिनस्त अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना सदाचार, सहकार्य आणि समर्पण ही त्रिसूत्री देत बार्टीला अनु.जातीच्या विकासाचा सकारात्मक उर्जेचा स्त्रोत बनविणारे बार्टीचे महासंचालक धम्मज्योती गजभिये साहेब यांच्या या प्रयत्नांना कवी दुश्यंत कुमार यांच्या शब्दात सस्नेह शुभेच्छा देत म्हणावेसे वाटते –
“कौन कहता है के आसमाँ में सुराख नहीं हो सकता,
एक पत्थर तो तबीयत से उछालो यारों !”
डॉ.प्रेम हनवते
(प्रकल्प व्यवस्थापक संशोधन विभाग )
बार्टी,पुणे.
0 9 3 7 6 1
Users Today : 19
Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *