बुलडाणा, दि. 10 : जिल्ह्यात थंडीच्या लाटेची शक्यता आहे. याबाबत नागरीकांनी आरोग्यविषयक घ्यावयाची काळजी आणि करावयाच्या उपाययोजनांबाबत मार्गदर्शक सुचना जारी करण्यात आल्या आहेत. याचे नागरिकांनी पालन करावे, असे आवाहन करण्यात आले आहे.थंडीची लाट येण्या पुर्वी नागरीकांनी पुरेसे थंडीचे कपडे स्वतः जवळ ठेवावेत. एकावर एक असे अनेक कपडे घालावेत. आपत्कालीन स्थितीत आवश्यक वस्तूंचा साठा तयार करून ठेवा. थंडीची लाट आल्यानंतर थंडीची लाट आली असताना शक्यतो घरातच थांबा, थंड वाऱ्यापासून बचावासाठी लांबचा प्रवास टाळावे. शरीर कोरडे ठेवावे, कपडे ओले असाल तर कपडे पटकन बदलावेत, यामुळे शरीरामधील उष्णता कमी होणार नाही. हात मोजे, पाय मोजे वापरावेत. शक्यतो पूर्ण हात आणि पायाचा भाग सलगपणे झाकला जाईल असे मोजे घ्यावेत, ज्याने जास्तीत जास्त गरम वाटून थंडीपासून बचाव होतो.रेडिओ, टीव्ही तसेच वृत्तपत्रातून हवामानाविषयी ताज्या बातम्या मिळव्यात. नियमितपणे गरम पेय प्यावेत. मद्यपान करू नये, यामुळे शरीरातील तापमान कमी होते. घरातील वृद्ध आणि लहान मुलांची विशेष काळजी घ्यावी. थंडीचा पारा अधिक मोठ्या प्रमाणावर घटल्यास पाणी पुरवठा करणारे पाईप गोठण्याची शक्यता असते. त्यामुळे पुरेसे पाण्याचा साठा करून ठेवावा. थंडीने शरीराचा मऊ, नाजूक भाग, तसेच पायांची बोटांचा टोकाचा भाग, कानाच्या पाळीला आणि नाकाच्या शेंड्यावर पांढरटपणा किंवा पिवळेपणा जाणवले यांसारख्या लक्षणांकडे लक्ष द्या. थंडीचा चटका बसलेला शरीराचा भाग गरम पाण्यात म्हणजेच सहन होईल इतपत गरम पाण्यात बुडवावे.थंडीने शरीर कापत असल्यास त्याकडे दुर्लक्ष करू नये. हे शरीराचे तापमान कमी होत असल्याचे पहिले लक्षण आहे. अशा वेळी घरा बाहेर जाणे टाळावे, खुल्या जागेतून निवाऱ्याच्या ठिकाणी जावे. हायपोथरमियामुळे अचानक शरीराचे तापमान कमी होते. शरीराचे तापमान कमी झाल्यास अशा व्यक्तीला गरम, उबदार जागी आणून प्रथम त्या व्यक्तीचे कपडे बदलावेत, त्यांना उबदार कपडे द्यावेत. तात्काळ रुग्णाला डॉक्टरांकडे उपचारासाठी घेऊन जावे. थंडीचा थेट शरीराशी संपर्क होऊ देऊ नका घोंगडी, जाड कपडे, टॉवेल, ब्लॅकेटचा वापर करावा. शरीराचे तापमान वाढायला गरम पेय द्या. मात्र मद्य देऊ नये. रूग्णाची परिस्थिती अधिक बिघडत असल्यास वरिष्ठ वैद्यकीय अधिकाऱ्यांचा सल्ला घ्या. स्थानिक प्रशासकीय अधिकारी यांनी दिलेल्या हवामानविषयक सुचना, तसेच वैद्यकीय अधिकारी, कर्मचारी यांनी दिलेल्या वैद्यकीय सुचनांचे पालन करावे. असे आवाहन निवासी उपजिल्हाधिकारी दिनेश गिते यांनी केले आहे.
Users Today : 35