बुलढाणा,
धर्मवीर छत्रपती श्री संभाजी महाराज यांच्या जयंती उत्सवाच्या पूर्वसंध्येला बुधवार, दि. १३ मे २०२६ रोजी बुलढाणा शहरातील गांधी भवन, जयस्तंभ चौक येथे “धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज जन्मोत्सव २०२६” निमित्त विशेष शिवगीतांच्या बहारदार कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमामुळे संपूर्ण परिसर शिवभक्ती आणि वीरश्रीच्या उत्साहाने दुमदुमून गेला.
कार्यक्रमाचे उद्घाटन बुलढाणा विधानसभा मतदारसंघाचे आमदार Sanjay Gaikwad यांच्या हस्ते करण्यात आले. कार्यक्रमाच्या प्रारंभी धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. यावेळी “जय भवानी… जय शिवराय…” तसेच “धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज की जय…” या घोषणांनी गांधी भवन परिसर दणाणून गेला.
कार्यक्रमाला नगराध्यक्षा सौ. पूजाताई संजय गायकवाड, नगरपालिकेचे गटनेते मृत्युंजय संजय गायकवाड, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी गुलाबराव खरात, शिवसेना नेते विजय अंभोरे, राजेश एकडे, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. दत्तात्रय बिराजदार, ठाणेदार संग्राम पाटील, शिवसेना शहरप्रमुख आशिष जाधव, किसान सेना जिल्हाप्रमुख संदीप गायकवाड, पृथ्वीराज गायकवाड, महिला आघाडी जिल्हा समन्वयक अनुजाताई सावळे, भैय्यासाहेब जैस्वाल, प्रा. अमोल वानखेडे, ज्येष्ठ पत्रकार राजेंद्र काळे, महिला आघाडी शहरप्रमुख मयुरीताई देशपांडे, राजेश हेलगे, पवन भालेराव, प्रवीण जाधव, अंगद आगाशे यांच्यासह शिवसेनेचे पदाधिकारी, नगरसेवक, नगरसेविका व शिवप्रेमी नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. अनिल रिंढे यांनी केले.
या कार्यक्रमात प्रसिद्ध शिवव्याख्याते व गायक अवधुत गांधी यांनी छत्रपती शिवाजी महाराज तसेच धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांच्या शौर्यगाथा, पराक्रम, धर्मनिष्ठा आणि हिंदवी स्वराज्याच्या इतिहासावर आधारित शिवगीते सादर केली. त्यांच्या दमदार सादरीकरणामुळे संपूर्ण परिसर शिवमय झाला होता. प्रत्येक गीताला उपस्थित शिवभक्तांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत होता.
कार्यक्रमादरम्यान युवकांमध्ये वीरश्रीचा उत्साह पाहायला मिळाला, तर माता-भगिनी आणि ज्येष्ठ नागरिकांनीही मोठ्या संख्येने उपस्थित राहून कार्यक्रमाची शोभा वाढवली. धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांचे विचार, त्याग, राष्ट्रनिष्ठा आणि हिंदवी स्वराज्याप्रती असलेली अखंड निष्ठा नव्या पिढीपर्यंत पोहोचवणारा हा कार्यक्रम शिवप्रेमींसाठी प्रेरणादायी व अविस्मरणीय ठरला.
Users Today : 10