उभा देश विकला माझा !! मी बघत राहिलो !!

Khozmaster
8 Min Read
!! उभा देश विकला माझा !! मी बघत राहिलो !!
मी जन्म दिलेला मुलगा बदमाश निघू शकतो पण मी निवडलेली सरकार बदमाश निघूच शकत नाही ही आजची भारतातील मतदारांची मानसिक स्थिती आहे.
विविध साम्राज्यांच्या आक्रमणातून, करोडो बलिदानातून, हजारो आंदोलनातून, शिस्तबद्ध विरोधातून, धर्मनिरपेक्षतेच्या गाजावाजाने, लोकशाहीच्या मिरवणुकीने, संविधानाच्या मार्गावर दिमाखदार तोऱ्यात उभा झालेला देश, विकला माझा ! पण मी बघत राहिलो.
आता कुठं ! विकासाची स्वप्ने हा देश आतुरतेने पाहू लागला होता, करोडो रोजगाराच्या गोतावळ्यात गुंतून राहणारा, पाठीवर दणके मारून शाळेत पाठविणारा, शिक्षणाने मुलं घडविणारा, नोकरी लागल्यावर आई-वडीलांच्या डोळ्यात आनंदाश्रू पाहणारा, अर्थव्यवस्थेला सातासमुद्रापार नेण्याचे स्वप्न पाहणारा, रुपयाला डाॅलरच्या शैर्यतेत जिंकविणार म्हणणारा, पाच वर्षांत बॅकेत पैसे डबल करणारा, देश माझा ! सहज विकून टाकला, आणि मी बघत राहिलो.
आमची बैल रडतात, त्यांना विकल्यावर ! मालकही रडतो, पैसे हातात घेतल्यावर ! पण राजकारणी मिरवतात, देश विकल्यावर ! शेतकरी शेतीत हरला तर आत्महत्या करतो ! पण राजकारणी निवडणूक हरला तर आत्महत्या करत नाही ! शेतकरी मेला तर त्याची पोरं उघड्यावर पडतात ! आणि राजकारणी मेला तर त्याची पोरं सहानुभूतीच्या लाटेनं आपोआप निवडून येतात ! हा टोकाचा विरोधाभास समजण्यास माझं घेतलेलं शिक्षण कामात आलं नाही, यांची लाज वाटूनही मी निर्लज्जपणे गप्प बसलो व माझा देश छाती ठोकून विकून टाकला आणि मी बघत राहिलो.
पण मी तरी काय करू ? मी आता व्यसनी झालोय, अगदी, दारूड्या सारखा ! अचानक माझ्या सारख्या असंख्याना धर्माचे व्यसन लावले गेले, मला अचानक धर्म धर्म खेळ आवडायला लागला, दुसऱ्या धर्माचा राग यायला लागला, न दिसणारा ईश्वर आपला वाटायला लागला, झेंड्याच्या रंगात मला आपलेपणा वाटायला लागला, मला अचानक पक्ष आवडायला लागला, कधी नव्हे तो आज माईकवर विश्वास बसायला लागला, सरकारने सांगितलेल्या समस्या आपल्या वाटायला लागल्या, सरकारचे सर्वच काही पटायला लागले, सरकार जसं म्हणेल ! तसं करायला मला आनंद वाटायला लागला, देशातील पत्रकारांवर विश्वास बसायला लागला, विरोधक मूर्ख वाटायला लागले, पक्षाचा मानसिक गुलाम म्हणून मिरवायला मला गर्व वाटायला लागला, प्रश्न विचारणारा तुच्छ वाटायला लागला, माझ्या या सर्व आवडीच्या सह्या घेऊन ! माझा देश विकून टाकला व मी बघत राहिलो.
सनातन शिक्षणात इतकी ताकद असेल तर मग परकीय विद्यापीठे भारतात सुरू कशाला? शिक्षण जर मुलभूत हक्क आहे तर मग शाळा बंद कशाला? नोकऱ्या जर विकास करतात तर मग खाजगीकरण कशाला? रेल्वे जर माझ्या पैशाने बनलीय मग डबे अदानीचे कशाला? भ्रष्टाचार संपणार म्हणे मग नोटबंदी कशाला? ”We the people” जर आपल पहिलं वाक्य असेल तर मग धर्म कशाला? सत्ता जर बहुजनांची चाबी असेल तर निवडणुकीत भांडवलशाहीचे कुलूप कशाला? विरोध जर लोकशाहीचा ब्रह्मास्त्र असेल तर विरोधासाठी झेंडे कशाला? रोड माझ्याच पैशातून बांधलाय मग त्यावरून जाण्यासाठी पैसे कशाला? पोट भरण्यासाठी मी धडपडतोय, मेहनत करतोय मग २ रू किलो तांदूळ कशाला? आत्मनिर्भर भारताचे स्वप्न दाखवून शेतकऱ्याच्या सातबाऱ्यावर ६ हजार रूपयांचे उपकार कशाला? भांडवलदार मित्रांचे बुडीत कर्जे गरीबांच्या अकांऊट मधून कापताय कशाला? मी कर्ज घेत नाही मग माझ्या उरावर देशाचे कर्ज कशाला? असे कितीतरी प्रश्न समोर असतांनाही मी सरकारची थोरवी गात राहिलो. असाच माझा देश विकल्या गेला व मी बघत राहिलो.
पण मी सुद्धा चालाक आहे, मला माझ्या सोयीच्या गोष्टी पटकन पटतात, ज्याठिकाणी मला माझे शिक्षण वापरणे गरजेचे असते त्याठिकाणी मी हमखास पळ काढतो, माझ्या जातीशी व समाजाशी संबंधित प्रत्येक गोष्ट मी अनुकरणाने पाळतो यामध्ये मी तर्काचा वापर करत नाही, मी निवडलेल्या सरकारने गू जरी खाल्ला तरी तो का खाल्ला ? हे पटविण्यात मी माझी शक्ती पणाला लावतो, माझ्या पक्षाचा झेंडा दुसऱ्या झेंड्यापेक्षा मला श्रेष्ठ वाटायला लागलाय, मला धार्मिक टोळीत सक्रिय राहण्यात मजा वाटायला लागलीय, चुकीचा इतिहास जरी माझ्या ताटात वाढला गेला तरी त्याचे घास माझ्या मेंदूत भरण्यात मला मजा वाटायला लागलीय, माझा भारत भविष्यात महान होणार आहे ! असं माझ्यावर, मी निवडलेली सरकार बिंबवत आहे पण तो कसा महान करणार आहात ? हे विचारण्याची माझ्यात तिळभरही हिंमत नाही, भारताच्या काल्पनिक विकासाच्या गोष्टी माईकवर ऐकून रात्री झोप यायला लागलीय याच धार्मिक झोपेत माझा देश विकून टाकला व मी झोपूनच राहिलो.
एक काळ असाही होता विमानतळे, रेल्वे, बॅका, इन्शुरन्स, बंदरे, विद्यापीठे, मोबाईल सेवा, संरक्षण क्षेत्र, खाणी, विज आणि इतर माझ्याच होत्या, या क्षेत्रातील नोकऱ्या माझ्याच होत्या पण आता नाहीत. पण का नाहीत? हे विचारण्याचं धाडस आता माझ्यात नाही. कारण दुसऱ्याला चूक म्हणायला ! शिक्षणाचा वापर करावा लागतो, जे आता मी विसरलोय. एरव्ही माझ्या शेजाऱ्यांने जर दोन इंच वालकंपाऊंड इकडे आणला तर मी कुर्हाड घेऊन उभा होतो पण सरकारने माझं सर्वच विकलं तरी मी नुसता षंढासारखा बघत बसतो कारण सरकार मी निवडलेली आहे म्हणून ! की माझी आणि सर्वांची यात फरक आहे म्हणून! समस्या स्वतः ची असली तर प्रश्न पडतो, पण जर समस्या सर्वांची असली तर प्रश्न सोडवेल कोण ? हा प्रश्न पडतो. पण मी आता मूका झालोय या माझ्या मुके पणाचा फायदा घेऊन माझा देश ढोल ताशाच्या धार्मिक मिरवणुकीत विकून टाकला व मी बघत बसलो.
खरं सांगायचं तर ! मी आता नपुंसक झालोय. माझ्या मनगटात दम राहीला नाही. लढाई सोडाच ! साधं विरोधात व समाजाच्या भल्यासाठी बोलायची माझ्यात हिंमत नाही व वेळ तर अजिबातच नाही. धर्माच्या सुयांनी पार पोखरला गेलोय मी, मला आता देवदूताचे स्वप्न पडायला लागलेय, कुणीतरी येईल व माझे आयुष्य सफल करेल इतका मी फिल्मी झालोय,आमच्या महामानवांनी जी लोकशाही रूजवली ती कशी टिकवायची ? त्याचा सिलॅबस आता जातोय याची मला काळजी नाही. आता मी लक्झरी लाईफ जगतोय त्यामुळे दुसऱ्यांवरचा अन्याय मला काल्पनिक वाटायला लागलाय, माझे सातबारे व बॅक बॅलेंस बघून देशाचा विकास होतोय व दुसऱ्यांना पिवळा रेशन कार्ड मिळतोय यातील विरोधाभास मला हुकूमशाही वाटत नाही, किमती वाढत आहे पण मी श्रीमंत असल्याने मला उपभोग घेता येतोय व तिकडे काहींना ताप आल्यावर बचत गटातून कर्ज काढावा लागतोय या कृतीचा माझ्यावर आजकाल फरक पडत नाही, गरीबी ही गरीबांच्या कर्तृत्वाने मिळाली आहे अश्या मतांचा आता मी झालोय, माझी चारचाकी मी सुसाट पळवतोय पण काहींची पायपीट ही पिढीजात असायला हवी इतका मी आज श्रेष्ठ झालोय, या सर्व विरोधाभासांचा आता माझ्यावर फरक पडत नाही त्यामुळे त्यांनी देश विकून टाकला पण मी विरोध करत नाही.
आता उद्या तुम्ही नद्या,जंगले,पहाड, धरणे,आमची अंगणे, रस्ते, वन्यजीव, पक्षी सुध्दा विका आणि कमीच पडले तर आमच्या किडण्या, डोळे व‌ आतड्या सुध्दा विका पण तुम्ही तुमच्या धर्माला धोक्याच्या बाहेर काढा, इकडे आमच्या मुलांचे भविष्य पिढ्यांपासून धोक्यात राहीले तरी चालेल पण त्या धर्माला धोक्याबाहेर काढा. कारण तो नवीन नवीन धोक्यात आला आहे. आम्हाला धोक्याची सवय झालीय तुमच्या धर्माला धोक्याची सवय नाही. तो घाबरेल, दचकेल कदाचित बदला म्हणून तोच तुमच्या जीवावर आज नाही उद्या उठेल. आमच्या पिढ्या आणखी अंधारात जगतील पण तुमची गैरसोय नको म्हणून तुमच्या धर्माला सदैव जगवतील. तुम्ही असाच देश विकत राहा आम्ही असाच धर्म जगवत राहू आणि उद्या एकमेकांना कापून खाऊ!
© प्रा.आकाश
नेवजाबाई हितकारिणी महाविद्यालय
ब्रम्हपुरी
16/01/2023
Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *