सतीश मवाळ मेहकर लम्पी रोग होण्यापूर्वी पशुंमध्ये ताप येणे, नाक गळणे अशी प्राथमिक लक्षणे आढळतात. रोगाचा प्रतिबंध करण्यासाठी या लक्षणांचे नीट निरीक्षण करा, असे आवाहन पशुसंवर्धन अधिकारी डॉ.हरीश ठाकरे यांनी केले. स्थानिक नरसिंह संस्थानच्या वतीने २३ सप्टेंबरला झालेल्या लम्पी रोगाच्या जागृतीपर कार्यशाळेत ते बोलत होते. संस्थानचे पीठाधिश सद्गुरु ॲड.रंगनाथ महाराज पितळे हे अध्यक्षस्थानी होते. याप्रसंगी उपस्थित शेतकऱ्यांना डॉ.ठाकरे यांच्यासह डॉ.योगेश पोफळे, डॉ.हर्षल दळवी, डॉ.गणेश निकम, डॉ.अंकुश हाडे या पशुवैद्यकांनी मार्गदर्शन केले. तसेच शेतकऱ्यांनी विचारलेल्या प्रश्नांना सविस्तर उत्तरे देऊन शंका समाधान केले. प्रारंभी मान्यवरांचा संस्थानचे विश्वस्त डॉ.अभय कोठारी, विनोद डुरे, आशिष उमाळकर, योगेश म्हस्के, राजेश निकम यांनी सत्कार केला. डॉ.ठाकरे यांनी या रोगाला घाबरून न जाता पुरेशी काळजी घेतली तर निश्चितच आळा घालता येतो, असे सांगून पशुंचा हा रोग माणसांमध्ये संक्रमित होत नाही व बाधित पशुंचे दूध पिण्यास काहीच हरकत नाही हे स्पष्ट केले. तसेच नरसिंह संस्थानने धार्मिक कार्यक्रमांसोबत असे सामाजिक कार्यक्रम राबविणे कौतुकास्पद असल्याची भावना व्यक्त केली. सद्गुरु ॲड.रंगनाथ महाराज पितळे यांनी अध्यक्षीय भाषण केले. यावेळी सेवानिवृत्तीबद्दल रमेश इंगळे यांचा सत्कार करण्यात आला. कार्यशाळेचे प्रभारी म्हणून विनोद डुरे पाटील व सहप्रभारी म्हणून गजानन शिंदे यांनी जबाबदारी सांभाळली. अॕड.राहुल तुपे पाटील यांनी सूत्रसंचालन केले तर संस्थानचे विश्वस्त विठ्ठल खंदारकर यांनी आभार मानले. परिसरातल्या शेकडो शेतकरी व पशुपालकांनी या कार्यशाळेचा लाभ घेतला.
Users Today : 8