चिखली | 26 सप्टेंबर 2022
श्री रेणुका देवी संस्थान आणि बच्चानंद स्वामी संस्थान चिखली येथे आज पहाटे अभिषेक पुजे नंतर वैदीक विधींनी घटस्थापनेने शारदीय नवरात्रोत्सवास प्रारंभ झाला. 26 सप्टेंबर ते 4 ऑक्टोबर 2022 या दरम्यान “शारदीय नवरात्रोत्सव” विविध वैदिक, धार्मिक, अध्यात्मिक व समाजप्रबोधन पर उपक्रमांनी साजरा होत आहे. या काळात मंदीरात आदिमाया आदिशक्ती श्री रेणुका मातेच्या दर्शनासाठीही हजारो भाविक दर्शनासाठी मंदिरात येत असतात. त्यादृष्टीने संस्थानच्या विश्वस्त मंडळाने तयारी सुरु केली आहे. शिस्तबद्ध शांततेत व मोठ्या भक्तिभावाने सर्व विधी व कार्यक्रम साजरे होत आहेत.
मंदिराच्या सभागृहात ग्रंथराज ज्ञानेश्वरीच्या सप्तदिनात्मक सामुदायिक पारायणास प्रारंभ झाला याप्रसंगी व्यासपीठ नेतृत्व हभप श्री शालीग्राम महाराज भुसारी यांनी केले. शेकडो महिला पारायणात सहभागी झाल्या आहेत. त्यानंतर श्रीमद देवी भागवत कथेला आज सुरवात झाली असून वेदशास्र अभ्यासक पुज्य श्री सखाराम महाराज सराफ यांचे वाणीतून भाविकांना ऐकायला मिळत आहे. दररोज सकाळी व संध्याकाळी महाआरती व उसळीचा प्रसाद वाटप करण्यात येणार आहे. पंचमीला श्री स्वामी समर्थ गुरु मंदीर यांची दुर्गा सप्तशती पाठाची सामुदायिक देवी उपासना होईल. षष्टीला गोंधळ, सप्तमीला ग्रंथपुजन, ज्ञानेश्वरी पारायण समाप्ती तसेच हभप शालिग्राम महाराज भुसारी यांचे काल्याचे किर्तन होईल. अडवोकेट काळकर साहेब बुलढाणा यांचे हस्ते धार्मिक ग्रंथ पूजन तसेच विचार प्रकटन होईल व संध्याकाळी श्रीमद गोस्वामी तुलसीदास जी रचित श्री राम चरित्र मानस संगीतमय सुंदर कांड गायनाचार्य भजन सम्राट टीव्ही कलाकार श्री कमलेश भाई वर्मा यांचे होईल अष्टमीला सोमवारी दु.4.30 वाजता देवी समोर होम हवन वेदमुर्ती श्री गौरव जोशी यांचे पौराहित्याने होईल. नवमीला उपवास सुटतील, रात्री एकनाथी भारुड, पोवाडे तसेच भजन जागराचा कार्यक्रम होईल. विजयादशमीला दसरा उत्सव, शस्रपुजन त्यानंतर 7 सप्टेंबर शुक्रवारी द्वादशीला सकाळी 10 वाजता श्रीमद भगवदगितेचा पाठ व 12 वाजता महाप्रसादाने उत्सवाची सांगता होईल. भाविकांनी दर्शन, श्रवण, प्रसादाचा शांततेने लाभ घ्यावा, शिस्त पाळावी, गर्दीत सावधानता बाळगावी असे आवाहन अध्यक्ष राजाभाऊ खरात, उपाध्यक्ष गोपाल शेटे सचिव वसंत शेटे श्री सचिन भाऊ बोंद्रे श्री पंडितराव देशमुख श्री नि मावत दादा यांच्यासह विश्वस्त मंडळाने केले आहे.