प्रतिनिधी प्रा. भरत चव्हण नंदुरबार : सामान्य नागरिकांच्या तक्रारी, अर्जांवर कालमर्यादेत निपटारा व्हावा, यासाठी 17 सप्टेंबर ते 2 ऑक्टोबर, 2022 या कालावधीत ‘राष्ट्रनेता ते राष्ट्रपिता सेवा पंधरवडा’ आयोजित करण्यात आला असून या कार्यक्रमाअंतर्गत पात्र लाभार्थ्यांना राज्याचे आदिवासी विकास मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री डॉ.विजयकुमार गावीत यांच्या हस्ते आज तहसिल कार्यालय, नंदुरबार येथे विविध योजनांच्या दाखल्याचे वाटप करण्यात आले.
या कार्यक्रमास खासदार डॉ. हिनाताई गावीत, जिल्हा परिषद सदस्य डॉ.सुप्रिया गावीत, जिल्हाधिकारी मनीषा खत्री, सहाय्यक जिल्हाधिकारी मीनल करनवाल, पुलकींत सिंग, जिल्हा पुरवठा अधिकारी महेश शेलार, तहसिलदार भाऊसाहेब थोरात,मुख्याधिकारी अमोल बागुल आदी उपस्थित होते.
यावेळी डॉ.गावीत म्हणाले की, सामान्य नागरिकांचे प्रलंबित अर्ज, तक्रारी यांचा निपटारा व्हावा, यासाठी हा ‘सेवा पंधरवडा’ राबविण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. या सेवा पंधरवड्यात आपले सरकार पोर्टलवरील 392 सेवा, महावितरणांच्या 24 सेवा, डी.बी.टी. 46 सेवा, नागरी सेवा केंद्रामार्फत देण्यात येणाऱ्या सेवा तसेच विविध विभागांचे स्वत:च्या योजनाशी संबंधित पोर्टलवरील प्रलंबित अर्ज अशा विविध माध्यमातून प्राप्त झालेल्या तक्रारींचा निपटारा करण्यात येणार आहे. मदत आणि पुनर्वसन, कृषी, महसूल, अन्न व नागरी पुरवठा, ग्रामविकास, नगरविकास, आरोग्य, पाणीपुरवठा, महावितरण, आदिवासी विकास, सामाजिक न्याय या विभागातील सेवांचाही त्यात समावेश करण्यात आला असल्याने या सेवा पंधरवाडाच्या काळात सर्व सामान्यांची प्रलंबीत असलेली कामे प्राधान्याने मार्गी लावण्याच्या सूचना त्यांनी यावेळी दिल्यात.
यावेळी पालकमंत्री डॉ.गावीत तसेच मान्यवराच्या हस्ते शेतकरी आत्महत्या प्रकरणांअंतर्गत मंजूर प्रकरणातील दोन लाभार्थांच्या वारसांना प्रत्येकी 30 हजार रुपये, 16 खातेदारांना सातबारे, 7 लाभार्थ्यांना राजस्व अभिनामार्फत दाखले वाटप, 31 शिधापत्रिकाधारकांना नवीन शिधापत्रिकेचे वितरण, रेशनधारक दुकानदाराना शिधापत्रिकेधारकाकडून ऑनलाईन रक्कम स्विकारण्यासाठी क्यु-आर कोडचे वितरण, प्राधान्य कुटूंब लाभार्थी योजनेचे प्रमाणपत्र, 7 विद्यार्थ्यांना जातीचा दाखला, विवाह प्रमाणपत्र, तसेच खरीप 2021 दुष्काळ अनुदानाचे वाटप करण्यासाठी युनियन बँक ऑफ इंडिया यांना 5 कोटी 94 लक्ष 85 हजार रुपयांचा धनादेश वितरीत करण्यात आला. यावेळी खासदार डॉ.हिनाताई गावीत यांनी आपले मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक व आभार प्रदर्शन तहसिलदार भाऊसाहेब थोरात यांनी केले. कार्यक्रम यशस्वीरित्या पार पाडण्याकरिता नायब तहसिलदार भिमराव बोरसे, राजेश अमृतकर, रिनेश गावीत, रमेश वळवी, प्रा.माधव कदम यांनी सहकार्य केले.