जळगाव: जिल्ह्यातील मुक्ताईनगर येथे आयोजित करण्यात आलेल्या महायुतीचा पहिला मेळावा आज मोठ्या उत्साहात संपन्न झाला. यावेळी मुक्ताईनगरचे आमदार चंद्रकांत पाटील यांनी शिवसेना पक्षामध्ये जाहीर प्रवेश केला. यावेळी महायुतीच्या वतीने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मुक्ताईनगर मतदारसंघातून आमदार चंद्रकांत पाटील यांना उमेदवारी महायुतीची घोषित केली.
आतापर्यंतच्या इतिहासात कुठल्याही सरकारने एवढ्या मोठ्या प्रमाणात सर्वसामान्यांच्या हितासाठीच्या योजना सुरू करून राबवल्या नाहीत; जेवढ्या गेल्या दोन वर्षात आपल्या महायुती सरकारने सुरू करून यशस्वीपणे राबावल्या, असं यावेळी त्यांनी सांगितलं. मुख्यमंत्री म्हणजे सीएम म्हणजेच ‘कॉमन मॅन’ आहेत. मात्र, मला राज्यातील जनतेला ‘सुपर मॅन’ करायचे असल्याची भावना यावेळी व्यक्त केले. परतीच्या पावसामुळे कापूस आणि सोयाबीनच्या पिकांचे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना सरकार वाऱ्यावर सोडणार नाही असेही यावेळी स्पष्ट केले.मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या अंमलबजावणीमध्ये आचारसंहितेचा अडसर येणार याची पूर्वकल्पना असल्याने आम्ही ऑक्टोबर महिन्यातच नोव्हेंबर महिन्याचे पैसे देऊन टाकले होते. ही योजना बंद करण्यासाठी काही जण पहिले मुंबई आणि नंतर नागपूर कोर्टात गेले आहेत. मात्र, मला खात्री आहे की माझ्या लाडक्या बहिणींच्या बाजूनेच कोर्ट निकाल देईल. तसेच, काही जणांनी निवडणूक आयोगाने ही योजना बंद करायला सांगितल्याची अफवा पसरवण्याचा प्रयत्न देखील केला. मात्र, नोव्हेंबरचा हफ्ता अगोदरच दिला असून २० तारखेनंतर आचारसंहिता संपल्यावर डिसेंबरचा हफ्ता देखील देण्यात येईल आणि कुणीही कितीही प्रयत्न केले तरीही ही योजना बंद होणार नाही असे यावेळी निक्षून सांगितले.सध्या दिवाळी जवळ आल्याने आतापासूनच विरोधकांच्या बुडाखाली फटाके फुटू लागले आहेत. २३ तारखेला महायुतीच्या विजयाचा जो धमाका होईल तो अॅटम बॉम्ब असेल आणि याच दिवशी चंद्रकांत पाटील यांच्या विजयाचे फटाके देखील या मुक्ताईनगरमध्ये फुटल्याशिवाय राहणार नाहीत, असा विश्वास यावेळी व्यक्त केला.मुख्यमंत्री सहाय्यता निधीमधून मदत देताना जात, पात, धर्म पाहिला जात नाही. लाडकी बहीण योजनेचे पैसे देखील सर्व धर्मातील भगिनींना देण्यात येतात. ‘आनंदाचा शिधा’चे वाटप देखील सर्वधर्मियांना करण्यात येते. तसेच, महात्मा फुले जन आरोग्य योजनेची तरतूद दीड लाखांहून वाढवून पाच लाख केली आणि तेही सर्वधर्मियांना लागू करण्यात येत असल्याचं यावेळी स्पष्ट करत आजवर धर्मधर्मात आपण कधीही तफावत केली नाही. त्यामुळे धर्माच्या नावाखाली दिशाभूल करणाऱ्यांना वेळीच ओळखावे, अशी अपेक्षा यावेळी त्यांनी व्यक्त केली