अकोला – मतदार यादीच्या विशेष संक्षिप्त पुनरीक्षण कार्यक्रमाकरीता जिल्ह्यातील सर्व ग्रामपंचायतींमध्ये दि. 10 नोव्हेंबर 2022 रोजी ग्रामपंचायतीत विशेष ग्रामसभेचे आयोजन करावे, असे निर्देश जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणुक अधिकारी निमा अरोरा यांनी दिले आहे.
भारत निवडणूक आयोग व मुख्य निवडणूक अधिकारी यांच्याकडून दरवर्षी विशेष संक्षिप्त पुनरीक्षण कार्यक्रमांतर्गत मतदार यादीची पडताळणी व दुरुस्ती करुन त्या त्रुटी विरहीत करण्यात येतात. आताही दि. 1 जानेवारी या अर्हता दिनांकानुसार नविन मतदार नांव नोदणी करुन मतदार यादी सुधारीत करण्याचा कार्यक्रम राबविण्यात येत आहे. हा उपक्रम गावातील प्रत्येक नागरीकांपर्यत सुलभतेने पोहचावा. तसेच या उपक्रमाचा प्रभावी व यशस्वीरीत्या अंमलबजावणी व्हावी याकरीता ग्रामविकास विभागाच्या शासन परीपत्रकानुसार, अकोला जिल्ह्यातील सर्व ग्रामपंचायतीमध्ये दि. 10 नोव्हेंबर रोजी मतदार यादीच्या विशेष संक्षिप्त पुनरीक्षण कार्यक्रमासाठी एका विशेष ग्रामसभेचे आयोजन करण्यात येणार आहे. निवडणूक विभागाच्या कार्यक्रमानुसार जिल्ह्यातील नागरीकांनी मतदार यादीत नाव समाविष्ट करणे, नाव वगळणे इत्यादी करिता मतदार केंद्रस्तरीय अधिकारी(बी.एल.ओ) यांचेकडे आवश्यक फॉर्म भरुन देण्यात यावे. मतदार यादीतील दुबार, स्थलांतरित, मयत मतदारांची नावे वगळण्याची कार्यवाही सुद्धा प्रस्तूत मोहिमेत घेण्यात येणार आहे. या व्यतिरीक्त ज्या मतदारांना आपले नाव नोंदवावयाचे असेल त्यांनी आपले विहित नमुन्यातील अर्ज भरुन मतदार केंद्रस्तरीय अधिकारी (बी.एल.ओ) यांचेमार्फत मतदार नोंदणी अधिकारी व सहायक मतदार नोंदणी अधिकारी यांचेकडे द्यावे, असे आवाहन करण्यात आले आहे.