प्रतिनिधी मुर्तीजापुर
येथील देवरण मार्गावर असलेल्या नाल्याचे नूतनीकरणाची काम जुना हिरपूर नाका ते लकडगंज येथील कालंका माता मंदिर पर्यंत सुरू आहे.आज दि.२२ रोजी सुभाष नगर जवळ मजूर खोदकाम करून माती काढण्याचे काम करीत असताना नाल्याची ९ ते १० फुट उंच दगडी जुनी भिंत अचानक कोसळली.यामध्ये त्या ठिकाणी काम करीत असलेले तिघांपैकी दोघांचा जागीच मृत्यू झाला.तर एक जण गंभीररित्या जखमी झाला असून त्याला तातडीने अकोला येथे पुढील उपचारार्थ हलविण्यात आले आहे.घटनेची माहिती मिळताच सदर नाल्याच्या ठिकाणी मोठी गर्दी झाली होती.त्यानंतर येथील उपजिल्हा रुग्णालयात देखील मृतक आणि जखमींच्या नातेवाईकांसह लोकांनी धाव घेतल्याने गर्दी झाली होती.गरीब घरातील दोघांचा अचानक मृत्यू झाल्याने सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे. तर दैव बलवत्तर म्हणून इतर चौघांना कुठलीही इजा झाली नाही.सदर काम हे नगरपालिकेच्या नागरी दलित वस्तीतून केल्या जात असल्याचे समजले.
याबाबत प्राप्त माहितीनुसार मूर्तिजापूर येथील देवरण मार्गावरील जुना हिरपूर नाक्यापासून ते लकडगंज येथील कालिका माता मंदिरापर्यंत नाल्याचे काम सुरू आहे.नाल्याचे बांधकाम आणि खोदकाम सुरू असल्याने बरेच मजूर या ठिकाणी काम करीत आहे.यामध्ये लोखंड बांधणारे,खोदकाम करणारे त्याचप्रमाणे बांधकाम करणारे काम करीत आहेत.आज दि. २२ रोजी मार्गावरील सुभाष नगर जवळ नाल्याचे खोदकाम मजूर करीत होते. यावेळेस जवळपास सात मजूर या ठिकाणी असल्याचे समजले.पूर्वी या ठिकाणी असलेल्या शेतात नाल्याचे पाणी पावसाळ्यात घुसत असल्याने जवळपास नऊ ते दहा फूट जुनी दगडी भिंत बांधलेली आहे.या ठिकाणी सात मजुरांपैकी चार जण विविध कारणांनी नाल्यातून वरती आले होते.तर तिघे त्याच ठिकाणी काम करीत होते.परंतु अचानक ४.३० वाजताच्या सुमारास भिंत कोसळली.भिंत कोसळल्याचे लक्षात येताच आजूबाजूला काम करीत असलेले मजूर व जवळपासचे नागरिक मदतीसाठी धावले. भिंतीचा मलबा हटवून तिघांना बाहेर काढण्यात आले. तिघांना तात्काळ येथील श्रीमती लक्ष्मीबाई देशमुख उपजिल्हा रुग्णालयात उपचाराकरिता दाखल करण्यात आले. परंतु उपचारापूर्वीच लक्की लखन पचारे वय २० वर्ष आणि सागर सोळंके वय २४ वर्ष यांचा जागीच मृत्यू झाला.मृतक सागर सोळंके यांना पाच महिन्याचा मुलगा आहे.तर साबीर शहा वय २७ वर्ष जबर जखमी झाले.त्यांना तात्काळ पुढील उपचारार्थ अकोला येथे हलविण्यात आले. घटनेची माहिती मिळताच आमदार हरीष पिंपळे यांनी घटनास्थळी तसेच उपजिल्हा रुग्णालयात जाऊन भेट दिली व मृतकांच्या परिवारांना शक्य ते सहकार्य करणात येईल असे सांगितले.वंदे मातरम आपत्कालीन पथकाचे इम्रान व इतरांचे सहकार्य लाभले.सदर कामाच्या ठिकाणी मजुरांच्या सुरक्षिततेकडे दुर्लक्ष करण्यात आल्याचे म्हटले जात होते.
Users Today : 12