भोकरदन : सध्या प्रत्येक क्षेत्रात जीवघेणी स्पर्धा आहे. त्याप्रमाणेच इलेक्ट्रॉनिक मीडिया आणि प्रिंट मीडियातील विविध वृत्तपत्रांमध्ये मोठी स्पर्धा आहे. आज जरी इलेक्ट्रॉनिक मीडियामध्ये मोठी आधुनिकता आली असली तरीही प्रिंट मीडियाचे महत्त्व आणि विश्वासार्हता आजही समाजात टिकून आहे. लाखोंच्या संख्येने वाचक दररोज विविध वृत्तपत्रे वाचतात. त्यामुळे प्रिंट मीडियातील पत्रकारांची वस्तुनिष्ठ व निर्भिड पत्रकारिता समाजासाठी नक्कीच दिशादर्शक ठरते, असे प्रतिपादन औरंगाबादच्या उच्च न्यायालयाचे जेष्ठ विधीज्ञ ॲड.महेश देशमुख यांनी केले.
भोकरदन येथील माजी नगराध्यक्ष ॲड. हर्षकुमार जाधव यांच्या संकल्पनेतून भोकरदन मित्रमंडळा वतीने मंगळवारी (दि.२४) रत्नमाला लॉन्समध्ये लोकशाहीचा चौथा स्तंभ पत्रकारिता क्षेत्रात उत्तुंग काम करणाऱ्या पत्रकारांचा गौरव करण्यात आला. या प्रसंगी श्री.देशमुख बोलत होते.
अध्यक्षस्थानी उच्च न्यायालयाचे माजी मुख्य शासकीय अभियोक्ता ॲड.नंदकिशोर खंदारे हे होते तर प्रमुख पाहुणे म्हणून व्यापारी महासंघाचे अध्यक्ष महादुसिंग राजपुत, माजी नगराध्यक्ष शेषराव सपकाळ, चंद्रकांत पगारे, माजी उपनगराध्यक्ष शब्बीर कुरैशी यांची उपस्थिती होती.
या पुढे बोलतांना श्री.देशमुख म्हणाले की, सोशल मीडियामुळे आपल्याला काही वेळात प्रत्येक गोष्टीची माहिती समजते; परंतु जोपर्यंत आपण पेपरमध्ये बातमी वाचत नाही, तोपर्यंत सुज्ञ नागरिक त्या बातमीवर विश्वास ठेवत नाही. याचा अर्थ प्रिंट मीडियाचे महत्त्व कधीच कमी होऊ शकत नाही, असे ते म्हणाले.
ॲड.नंदकिशोर खंदारे म्हणाले की, पत्रकारिता करणे सोपी गोष्ट नाही. कोणत्याही परिस्थितीत पत्रकारांना काम करावे लागते. प्रसंगी युद्धभूमी, नैसर्गिक आपत्तीच्या ठिकाणी जाऊनही पत्रकार समाजाला जागृत करण्याचे काम करत असतात. त्यांच्या या कार्याबद्दल त्यांचा आज गौरव करणे हे आपले आद्यकर्तव्य असल्याचे खंदारे म्हणाले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक ॲड.हर्षकुमार जाधव यांनी केले आहे. ते म्हणाले की, पूर्वीची मुल्याधिष्ठीत पत्रकारिता आणि आताची मीडिया ट्रायल पत्रकारिता यात मोठा फरक आहे. पूर्वी कितीही विरोधात लिखाण केले तरी पत्रकारांना कुणी दूषणे देत नसत मात्र, आता त्यावर त्वरित प्रतिक्रिया तर येतेच शिवाय ही प्रतिक्रिया कधी हिंसकही होते. मात्र पत्रकारांनी सत्य बाजू नेहमी जनतेसमोर ठेवावी आणि चौथ्या स्तंभाचे कार्य प्रामाणिकपणे सुरू राहावे, असे मत ॲड.जाधव यांनी व्यक्त केले. याप्रसंगी जेष्ठ पत्रकार विजय सोनवणे, रवींद्र देशपांडे, नानासाहेब वानखेडे, रमेश इंगळे, युवराज पगारे, वैभव सोनवणे, इम्रान खान, शेख सलीम, सुरेश गिराम, विश्वास ढगाळ, अमोल शिंदे, विलास खांडवे, प्रितम देशमुख, जुनेद पठाण, समीर देशमुख आदींचा सत्कार जेष्ठ विधीज्ञ ॲड.महेश देशमुख, ॲड.नंदकिशोर खंदारे यांच्या हस्ते करुन स्मृतिचिन्ह देऊन पत्रकारांचा गौरव करण्यात आला.
या कार्यक्रमाचे सुत्रसंचालन नारायण जिवरग यांनी तर आभार नानासाहेब वानखेडे यांनी मानले.
कार्यक्रम यशस्वीतेसाठी विलास शिंदे, ॲड.सुहास देशमुख, फैसल चाऊस, विकास जाधव, हाजी हादु चाऊस, राजेंद्र जाधव, जयंत जोशी, राजु इंगळे, रणजित जाधव, भुषण जाधव आदींनी परिश्रम घेतले.
Users Today : 11