अधिकाधिक गावे हर घर जल व ओडीएफ प्लस घोषित करावेत – मुकाअ भाग्यश्री विसपुते
बुलढाणा : ( खोज मास्टर ) *अकील शाह*ता. 22, दिनांक 15 मार्च ते 22 मार्च दरम्यान देशात जलजागृती सप्ताहाचे आयोजन करण्यात आले होते. त्यानुसार बुलढाणा जिल्ह्यातही मोठ्या उत्साहात जलजागृती सप्ताहाचे आयोजन करण्यात आले. दिनांक 22 रोजी जागतिक जल दिनानिमित्त जिल्हास्तरावर मुख्य कार्यकारी अधिकारी भाग्यश्री विसपुते यांच्या हस्ते जलपूजन करून जल प्रतिज्ञा घेण्यात आली.
दिनांक 22 मार्च हा जगभर जागतिक जल दिन म्हणून साजरा करण्यात येतो. केंद्र शासनाने दिनांक 15 ते 22 मार्च 2023 हा जलजागृती सप्ताह म्हणून साजरा करण्याचे निर्देश दिले होते. त्यानुसार बुलढाणा जिल्ह्यातही या सप्ताहाचे आयोजन करण्यात आले. या अंतर्गत जल जीवन मिशन अंतर्गत हर घर जल चे निकष पूर्ण करणारे तसेच स्वच्छ भारत मिशन अंतर्गत ओडीएफ प्लस चे म्हणजेच हागणदारी मुक्त अधिक चे निकष पूर्ण करणारे गावे घोषित करण्यासाठी विशेष ग्रामसभा घेऊन त्यांचे ठराव आणि आवश्यक ते व्हिडिओ घेण्याचे निर्देश होते. त्यानुसार अधिकाधिक गावे हर घर जल व ओडीएफ प्लस घोषित करण्यासाठी ठराव व व्हीडीओ घ्यावेत आणि ते ऑनलाईन करून गावे घोषित करावेत असे आवाहन मुख्य कार्यकारी अधिकारी भाग्यश्री विसपुते यांनी केले.
सदर कार्यक्रम हा जिल्हास्तर, प्रत्येक पंचायत समितीस्तर, ग्रामपंचायतस्तर तसेच शाळा व अंगणवाडीमध्ये साजरा करण्यात आला. यामध्ये पाण्याचे पूजन करून जल प्रतिज्ञा घेण्यात आली. तसेच पाणी व स्वच्छतेची जाणीव जागृती करण्यात आली. सदर कार्यक्रमाचे आयोजन प्रकल्प संचालक जलजीवन मिशन शिवशंकर भारसाकळे तसेच कार्यकारी अभियंता ग्रामीण पाणी पुरवठा विभाग राहूल जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली जल जीवन मिशन व स्वच्छ भारत मिशन कक्षाने केले. यासाठी अधिकारी कर्मचारी व गावकऱ्यांचा चांगला प्रतिसाद लाभला.
Users Today : 22