बुलडाणा : ( खोज मास्टर ) शहीद शाह
महाविकास आघाडीचे सरकार पाडण्यापासून ते आजपर्यंत सुरू असलेल्या विविध राजकीय घडामोडींमध्ये स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लांबणीवर पडल्या आहेत. आधीच उभे राहण्याची तयारी करून ठेवलेल्या इच्छुकांचे नजरा निवडणुकांकडे लागल्या आहेत. मात्र, निवडणूक आयोगाकडून निवडणूक कार्यक्रमाची घोषणा होत नसल्याने इच्छुकांचे चेहरे चांगलेच सुकले आहेत. विविध राजकीय पक्षांच्या इच्छुक उमेदवारांसह अपक्षांचाही सध्या अपेक्षाभंग झाला असलातरी राजकीय स्पर्धेत आपले अस्तित्व टिकवून ठेवण्यासाठी आणि जनतेची मने जिंकण्याकरिता इच्छुक धावपळ करताना दिसत आहेत.
महानगरपालिका, नगरपालिका, जिल्हा परिषद व पंचायत समित्यांच्या निवडणुका रखडल्या आहेत. त्या ठिकणी प्रशासक कारभार पाहात आहे. याचा प्रशासनावर फारसा परिणाम झाला नाही. मात्र, सामान्य जनतेचा आवाज दाबल्या गेल्याचे दिसून येत आहे. लोकप्रतिनिधी नसल्याने अधिकारी जनतेच्या समस्यांकडे विशेष लक्ष देत नसल्याचा आरोप होत आहे. निवडणूक लागणार म्हणून शहरातील भावी नगरसेवक नागरिकांचे मन जिंकण्यासाठी झटत आहेत. परंतु निवडणुकीच्या तारखा जाहीर होत नसल्याने आता उभेच्छुकांची चांगलीच दमछाक होत आहे.पाच वर्षे कार्यकाळ संपल्यानंतर लोकप्रतिनिधी आपण किती काम केले, हे सांगण्यासाठी मतदारसंघात फिरत असतो. तर त्याचा प्रतिस्पर्धी विकास कसा थांबला, हे जनतेच्या लक्षात आणून देण्यासाठी जीवाचे रान करत असतो. हा खेळ गत वर्षभरापासून खेळत असलेले भावी लोकप्रतिनिधी चांगलेच मेटाकुटीला आहे. आता तर निवडणूक कधी लागणार माहीत नसल्याने केवळ मतदारसंघात फिरून करायचे तरी काय? असा प्रश्न या उभेच्छुकांना पडला प्रतिष्ठेची होणार निवडणूक तालुक्यातील काही ग्रामपंचायतींच्या निवडणुका झाल्यावर आता सर्वच राजकीय पक्षांना निवडणुकीचे डोहाळे लागले आहेत. तयारी करणारे खेडोपाडी फिरत असले तरी असे किती दिवस फिरायचे, हा त्यांनादेखील अंदाज येत नाही. राजकीय समीकरण जुळविण्यासाठी मात्र सर्वच नेत्यांची धडपड सुरू आहे.काही चतुर उमेदवार भूमिगत असतात. निवडणुकीची कुणकुण लागली की पायाला भिंगरी लावून फिरतात. आता निवडणुकीची तारीख हुलकावणी देत असल्याने भावी लोकप्रतिनिधींनी थोडी ढिल दिल्याचे दिसून येत आहे. शहरात असलेल्या २४ वॉर्डात शासकीय कर्मचारी फिरू शकत नाही. त्यामुळे त्यांच्याकडे नागरिकांच्या समस्या पोहचवता येत नाही. त्या सोडविण्यासाठी जास्त कालावधी लागतो. यावेळी नगराध्यक्षपदाची निवडणूक जनतेतून होत असल्याने सर्वच प्रमुख पक्षांत हालचाली वाढल्या आहेत. परंतु उमेदवार निश्चित करण्यासाठीदेखील वेळ हवा असतो. ज्यांना उमेदवारी हवी, यांना पक्षाचे फुलटाइम काम करावे लागते. शहरातील पिण्याच्या पाण्याची समस्या तसेच स्वच्छतेची काळजी घेणे हे शहरातील प्रमुख विषय आहेत. जोपर्यंत निवडणूक होत नाही, तोवर आयाराम गयारामदेखील डोके वर काढतील. काहीही करून नगरपालिका ताब्यात घ्यायचीच, असा चंग बांधणारेही सध्या गार होऊन बसले आहेत.
Users Today : 19