सिंदखेडराजा सुरेश हुसे ता26
येथून जवळच असलेल्या तढेगाव समृद्धी कॅम्प मध्ये कार्य करणारे मजूर,वाहनचालक तसेच इतरांचा डिसेंबर २०२२ पासूनचा थकलेला पगार द्या अशी मागणी करीत किनगावराजा पोलीस ठाण्यात मदतीकरिता धडकलेल्या कामगारांनी टाहो फोडला असून आमच्यावर तसेच कुटुंबावर उपासमारीची वेळ आली असल्याने पगार दिला नाही तर आमरण उपोषण देखील करणार असल्याचे कामगार बोलत आहे.
समृद्धी महामार्ग तयार होत असतांना तढेगाव कॅम्पला राहणारे रोडवेज सोल्युशन इंडिया प्रायव्हेट लिमिटेड कंपनीत काम करणारे ८० पेक्षाही अधिक मजूर कर्मचाऱ्यांचे गत ४ महिन्यांपासून पगार थकलेले आहेत.कंपनीचे मालक तसेच मॅनेजर यांच्या वारंवार कानावर घालून देखील त्यांनी कामगारांच्या कष्टाचा एक पैसाही देण्याचे औदार्य कंपनी दाखवत नसल्याचे सर्व कामगारांचे म्हणणे आहे.
सदर कॅम्पमध्ये पंजाब,हरियाणा,उत्तर प्रदेश,मध्यप्रदेश,ओरिसा,झारखंड,हिमाचल प्रदेश, छत्तीसगड येथील कामगार असून हातावर पोट असणाऱ्या या कामगारांचा रोडवेज सोल्युशन कंपनीने कंत्राटाचे कार्य होईस्तोवर अक्षरशः पिळून कामे करून घेतले.मात्र कामे पूर्ण झाल्यावर आता,उद्या,महिन्यांनी पगार देऊ अशी आश्वासने देऊन चार महिन्यांपासून त्यांच्या तोंडाला पाने पुसली आहेत.
समृद्धीच्या या कामगारांची आर्थिक परिस्थिती इतकी ढासळली आहे की भाड्याचे पैसेदेखील खिशात नसल्याने किनगावराजा पासून तढेगाव कॅम्प ज्याचे अंतर ९ किलोमीटरच्या जवळपास असून सदर सर्व ८० पेक्षाही जास्त कर्मचारी भर उन्हात पायपीट करीत किनगावराजा पोलीस स्टेशनमध्ये दाखल झाले.त्यांच्या खाण्याचेही सध्या वांदे निर्माण झाले असून गावी शिकत असणाऱ्या त्यांच्या मुलास फी अभावी शाळेतून घरी पाठवले असल्याचे कामगार सांगत आहेत.काही कामगारांच्या मुलींचे बाळंतपण जवळ आले असल्याने तर काहींचे आई वडील वृद्ध दुर्धर आजाराने ग्रस्त असल्याने त्यांना देखील पैशांची नितांत आवश्यकता असून पैशाअभावी औषधोपचार होत नसल्याचे त्यांनी सांगितले आह चौकटीत :- वाहनचालक,मजूर,टेक्निशियन अशा प्रकारची कामे करणाऱ्या मजुरांना समृद्धी कॅम्पमधील वाहनांचा उपयोग घेता येत नाही जर वाहन हलवले तर वाहन चोरीचा आरोप तुमच्यावर करू अशा प्रकारची धमकी मॅनेजर मार्फत होत असल्याची माहिती कामगारांनी दिली आहे.बुलडाणा येथील कामगार आयुक्तालयावर पायी चालत जाऊन दाद मागणार असल्याचेही कामगार सांगत आहेत.
1) किनगावराजा पोलीस ठाण्यात हताश स्थितीत बसलेले समृद्धीचे कामगार
2) सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक भारत चिरडे यांना निवेदन देतांना समृद्धीचे कामगार
Users Today : 18