बुलडाणा : (खोज मास्टर) अकील शाह /तालुक्यातील धाड नगरीच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने तत्कालीन ग्रामपंचायत प्रशासनाने धाडच्या विविध भागात लावलेले ‘सीसीटीव्ही’ कॅमेरे गेल्या वर्षांपासून बंद पडलेले असल्याने गावाची सुरक्षा वाऱ्यावर आहे. त्यामुळे उपरोक्त कॅमेरे पूर्ववत सुरु करण्यात यावे, अशी मागणी प्रहार जनशक्ती पक्षाचे जिल्हाप्रमुख वैभवराजे मोहिते यांनी ग्रामपंचायत प्रशासनाकडे केली आहे. कॅमेरे सुरु न केल्यास आंदोलनाचा इशारा देखील देण्यात आला आहे. ग्रामविकास अधिकाऱ्यांना देण्यात आलेल्या निवेदनात नमुद आहे की, धाड नगरीचा भौगोलीक विस्तार मोठ्या प्रमाणात आहे. गुन्हेगारीला लगाम लावण्यासह कायदा व सुव्यवस्था आबाधीत राखण्यासाठी लोकसंखेच्या तुलनेत पोलिसांची संख्या अत्यंत कमी आहे. समाजकंटकांच्या उपद्रवासह चोरी, घरफोडी तसेच अन्य गंभीर गुन्ह्यांना प्रतिबंध लावण्यासाठी तत्कालीन ग्रामपंचायत प्रशासनाने लाखो रुपये खर्ची घालुन धाड नगरीच्या प्रत्येक प्रवेशव्दारासह गावातील संवेदनशील समजल्या जाणारे चौक व परिसरात जवळपास ६६ ‘सीसीटीव्ही’ कॅमेरे लावले होते. लावण्यात आलेल्या कॅमेऱ्यांमुळे समाज कंटकांच्या उचापत्या कमी होवून गुन्हेगारीलाही बऱ्यापैकी लगाम लागला होता. सोबतच गुन्हेगार निष्पन्न करण्यासाठी उपरोक्त कॅमेरे पोलीस प्रशासना साठी ‘तिसरा डोळा’ ठरत होते. मात्र, देखभाल दुरुस्ती अभावी गेल्या काही वर्षां पासून सर्वच कॅमेरे पूर्णत: बंद पडलेले आहेत. त्यामुळे धाडच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला असुन शासनाचे लाखो रुपये पाण्यात जाण्याच्या मार्गावर असल्याचे निवेदनात नमुद असुन सदर कॅमेरे सुरु करण्यात यावे, अशी मागणी देखील प्रहार जनशक्ती पक्षाचे जिल्हा प्रमुख वैभवराजे मोहिते यांनी केली आहे. कॅमेरे पुर्ववत सुरु न केल्यास आंदोलन छेडण्याचा इशाराही निवेदना अंती देण्यात आला आहे.
Users Today : 19