विदेशी नेतृत्व आल्यापासून सावरकरांचा अपमान करण्याचे काँग्रेसचे धोरण – आ. श्वेताताई महाले यांनी केला घणाघात

Khozmaster
7 Min Read

स्वातंत्र्यवीर सावरकर गौरव यात्रेचे चिखलीत आयोजन

चिखली : स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या विचारांचे आणि कार्याचे मोठेपण समजून घेण्याची पात्रता नसलेल्या विदेशी नेतृत्वाकडे पक्षाची धूरा आल्यापासून काँग्रेस पक्षाची नैतिक आणि राजनैतिक अधोगती सुरू झाली. याच हताशेतून राहुल गांधी स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या चरित्रावर चिखलफेक करत त्यांचा अपमान करत असल्याचा घणाघात आ. श्वेताताई महाले यांनी केला. दि. ३ एप्रिल रोजी राष्ट्रभक्त सकल हिंदू समाजाच्या वतीने आयोजित स्वातंत्र्यवीर सावरकर गौरव यात्रेला संबोधित करताना त्या बोलत होत्या. ज्येष्ठ स्वयंसेवक अरविंदराव असोलकर यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या कार्यक्रमात प्रा. निळूभाऊ चौधरी यांनी प्रमुख वक्ते म्हणून मार्गदर्शन केले.  स्वातंत्र्यवीर सावरकर चौकात आयोजित या कार्यक्रमातून राहुल गांधी यांच्या सावरकर विरोधी वक्तव्यांचा उपस्थितांनी ” सावरकर का अपमान, नही सहेगा हिंदूस्थान “, ” होश मै आओ होश मे आओ राहुल गांधी होश मे आओ “, ” भारत माता की जय “, ” वंदे मातरम् ” अश्या घोषणा देत व हातात फलक उंचावत निषेध व्यक्त केला. कार्यक्रमाचे अध्यक्ष अरविंदराव असोलकर यांनी आ. श्वेताताई महाले यांना स्वातंत्र्यवीर सावरकर लिखित ‘ हिंदूत्व ‘ हा ग्रंथ यावेळी भेट म्हणून दिला. मान्यवरांच्या हस्ते स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.सावरकरांचा विचारांची प्रेरणा पुढच्या पिढीपर्यंत नेण्यासाठी आम्ही तत्पर आहोत – आ. श्वेताताई महाले सावरकर म्हणजे काय, हे आपल्याला स्व. अटलजींच्या वाणीतून ऐकायला मिळालं. देशभरातील अनेक राजकीय नेत्यांनी सावरकरांबद्दल गौरवोद्गार काढलेले आहेत. मात्र ही काँग्रेसी व डाव्या विचारसरणीची मंडळी आहे, सदैव महापुरुषांचा अपमान करत असतात. त्यामुळे आपल्या सर्वांना आता एकजुटीने या विचारसरणीला चिरडून टाकण्याचं काम करायचं आहे. आज आपल्या महाराष्ट्रात हिंदुत्व मानणारं, हिंदुत्व जपणारं आणि हिंदुत्व वाढवणारं असं शिंदे-फडणवीस सरकार आलं आहे. हे सरकार सावरकरांच्या हिंदुत्वाचा विचार पुढे नेण्याचे कार्य करत आहे असे आ. श्वेताताई महाले आपल्या भाषणातून म्हणाल्या. स्वातंत्र्यवीर सावरकरांना जाज्वल्य इतिहास जपण्यासाठी आणि त्यांच्या विचारांची प्रेरणा पुढच्या पिढीपर्यंत पोहोचवण्यासाठी आम्ही सदैव तत्पर आहोत असे प्रतिपादन या प्रसंगी त्यांनी केले. थोर क्रांतिकारक स्वातंत्र्यवीर सावरकरांचा सातत्याने अपमान करणाऱ्या राहुल गांधी यांना समज यावी म्हणून काही राष्ट्रप्रेमी नागरिकांनी कायद्याच्या माध्यमातून त्यांच्या विरोधात न्यायालयात दाद मागितली, न्यायालयाने देखील योग्य भूमिका बजावली. याशिवाय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना लक्ष्य करत ओबीसी समूहातील विशिष्ट जातीविरुध्द अपशब्द बोलल्यामुळे न्यायालयाने त्यांना दोषी ठरवले आणि यातूनच राहुल गांधी यांना आपली खासदारकी गमावावी लागली. तरी देखील ते ताळ्यावर आले नाहीत, उलट आणखीच बिथरले आणि याच निराशेतून व हताशेतून ते बेताल बडबड करत सुटले आहेत अश्या शब्दात आ. महाले यांनी राहुल गांधी यांचा समाचार घेतला. शिवसेना प्रमुख स्व. बाळासाहेब ठाकरे यांना ज्या लोकशाहीत मतदानाच्या अधिकारापासून सहा वर्षे वंचित राहावे लागले त्याच लोकशाहीने राहुल गांधी यांची खासदारकी काढून घेतली, ती सुद्धा त्यांनी कायद्यात सुचवलेल्या सुधारणेच्या आधारे गेली त्यामुळे यासाठी मोदी सरकारला दोषी धरणे अन्यायकारक असल्याचे स्पष्ट मत आ. श्वेताताई महाले यांनी मांडले.इंदिरा गांधींनीही मान्य केले होते सावरकरांचे मोठेपणस्वातंत्र्यवीर सावरकरांचे मोठेपण आणि त्यांनी देशाबद्दल केलेला त्याग हा दिवंगत पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्यापासून माजी मुख्यमंत्री शरद पवार यांच्या पर्यंतच्या नेत्यांनी मान्य केला आहे. स्वर्गीय यशवंतराव चव्हाण असो की माजी पंतप्रधान मनमोहन सिंह असो या सर्वांनी सावरकरांचा नेहमी आदरच केला. सावरकरांवर टपाल तिकीट काढले एवढेच नव्हे तर सावरकरांच्या राष्ट्रीय स्मारकाला इंदिरा गांधी यांनी दिलेली देणगी देखील दिली होती याची आठवण आ. श्वेताताई महाले यांनी करून दिली. असे असतानाही राहुल गांधी हे सावरकरांच्या विरुद्ध जे बोलत आहेत तो सावरकरांचा केवळ विरोधच नसून कृतघ्शता असल्याचे त्या म्हणाल्या.

*राहुल गांधी यांच्या वक्तव्यांची पाळंमुळं थेट नेहरुंपर्यंत – निळूभाऊ चौधरी*

भारतावर दिडशे वर्ष राज्य करणाऱ्या परकीय इंग्रजांनी स्वातंत्र्यवीर सावरकरांनी देशाप्रती केलेल्या त्यागाची महती मान्य केली परंतु; स्वातंत्र्यानंतर आलेल्या पंडित नेहरू यांच्या काँग्रेसी सरकारने मात्र या थोर क्रांतिकारक देशभक्ताची सदैव उपेक्षाच केली, त्यामुळे आज राहुल गांधी सावरकरांविषयी जे काही बोलत आहेत त्याची पाळंमुळं थेट त्यांचे पणजोबा पंडित नेहरूंपर्यंत जात असल्याचे प्रा. निळूभाऊ चौधरी म्हणाले. याचे उदाहरणासहीत दाखले त्यांनी आपल्या प्रमुख भाषणातून दिले. कॉलिन्स लॅरी आणि लॅपिए डॉमिनिक या ब्रिटिश लेखकांनी लिहिलेल्या ‘ फ्रिडम अँट मिडनाईट ‘ या पुस्तकात भारताचे अखेरचे व्हाइसरॉय माऊंटबॅटन यांचा हवाला देत सावरकरांनी भारताच्या स्वातंत्र्यासाठी केलेल्या क्रांतिकार्याचा उल्लेख प्रा. चौधरी यांनी केला. शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी सावरकरांना अभिप्रेत असलेले ‘ राजकीय हिंदूत्व ‘ अंगीकारले, याचा राग म्हणून तत्कालीन काँग्रेस सरकारने निवडणूक आयोगाच्या माध्यमातून बाळासाहेबांविरुद न्यायालयात खटला भरला आणि त्यांचा मतदानाचा अधिकार सहा वर्षांसाठी हिरावला याची आठवण करून देत आता हेच काँग्रेसी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर हुकुमशाहीचा मतलबी आरोप करत असल्याचे चौधरी म्हणाले. मुळात स्वातंत्र्यवीर सावरकर यांचे ज्वलंत विचार पेलवन्याची ताकद आपल्या समाजात नाही, त्यामुळे सावरकरांविषयी अपप्रचार करणारे लोक तोंडाला येईल ते बोलत सुटतात, अश्या लोकांना चोख प्रत्युत्तर देण्यासाठी सावरकरांचे विचार व त्यांचे जीवन समजून घेणे गरजेचे असून त्याकरिता प्रत्येकाने सावरकर साहित्य आवर्जून वाचावे असे आवाहन चौधरी यांनी केले.

भारतीय जनता पक्षाचे प्रदेश कार्यकारिणी सदस्य अँड. विजय कोठारी, सुरेशअप्पा खबुतरे, शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष रामकृष्णदादा शेटे, सचिव प्रेमराज भाला, भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष डॉ. प्रतापसिंह राजपूत, शिवसेना नेते शिवाजीराव देशमुख, तालुका प्रमुख गजाननसिंह मोरे, शहर प्रमुख विलास घोलप, तालुका संघचालक शरद भाला, भाजप शहराध्यक्ष पंडितराव देशमुख, तालुकाध्यक्ष कृष्णकुमार सपकाळ, माजी नगराध्यक्षा विमलताई देव्हडे, सुहास शेटे, ज्येष्ठ नेते रामदासभाऊ देव्हडे, विदर्भ प्रांताचे न्यास प्रमुख सुनील लाहोटी, संत सेवा संघाचे सुनील वायाळ, हिंदू राष्ट्र सेनेचे जिल्हा सहसंघटक दीपक गुळवे, शहर प्रमुख हरीहर सोळंके, बजरंग दलाचे जिल्हा संयोजक प्रवीण अंभोरे, सुरेंद्र पांडे, भाजपा अनुसूचित जाती मोर्चाचे जिल्हाध्यक्ष अँड. दिलीप यंगड, प्रा. वीरेंद्र वानखेडे, अँड. संजय सदार, युवा मोर्चाचे तालुकाध्यक्ष संतोष काळे, शहराध्यक्ष सागर पुरोहित, महिला मोर्चाच्या शहराध्यक्ष सुनीता भालेराव यांच्यासह भारतीय जनता पक्ष व शिवसेनेचे पदाधिकारी, कार्यकर्ते व सावरकरप्रेमी नागरिक व माता भगिनींची या कार्यक्रमास मोठ्या संख्येने उपस्थिती लाभली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन रेणुकादास मुळे यांनी केले तर युवराज भूसारी यांनी आभार मानले. कार्यक्रमाच्या सुरुवातीला राजेंद्र डांगे यांनी स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्यावरील गीत सादर केले. सामुहिक राष्ट्रगीत गायनाने कार्यक्रमाचा समारोप झाला.

 

0 9 3 7 4 1
Users Today : 22
Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *