धडगाव मध्ये गुटखा विक्री जोमात, अन्न प्रशासन कोमात

Khozmaster
2 Min Read

प्रविण चव्हाण नंदुरबार – : राज्यात गुटखा विक्रीला बंदी असतानाही तालुक्यात गुटख्याची दणक्यात विक्री सुरू आहे. विक्रेत्यांना अभय दिले जात असल्याने गुटखा विक्री जोमात आणि अन्न औषध प्रशासन कोमात गेल्यासारखी परिस्थिती निर्माण झाली आहे. महाराष्ट्रात गुटखा विक्रीला बंदी आहे; परंतु तालुक्यात राजरोसपणे गुटखा विक्री सुरू आहे. गुटखा विक्रीला परवानगी द्यावी यासाठी संबंधित गुटखा विक्रेत्यांनी मोठे प्रयत्न केल्याने खुलेआम विक्री होत असल्याचे बोलले जात आहे. परिणामी अगदी सहज मिळत असलेल्या गुटख्याच्या आकर्षणामुळे महीलांसह अल्पवयीन मुल-मुली व विद्यार्थीही बळी जात असल्याचे धक्कादायक प्रकार समोर येत आहे. त्यामुळे शहरात गुटखा विक्री कुणाच्या आशीर्वादाने सुरू आहे याची पाळेमुळे उखडण्याची गरज आहे. शहरात काही होलसेल विक्रेत्यामार्फत तालुक्यातील खेडयापाडयातील छोटया दुकानदारांना विक्रीसाठी खुलेआम माल पुरवला जातो. विशेष म्हणजे मोटारसायकल वा स्कुटरवर त्याची डिलिव्हरी दिली जाते. यातून विक्रेत्यांना कुणाचीही भीती नसल्याचे स्पष्ट होते. दरम्यान, अन्न व औषध प्रशासनामार्फत गुटखा विक्रेत्यांवर कारवाई होणे गरजेचे आहे. मात्र अन्न प्रशासनाकडून कुठल्याही विक्रेत्यांवर गेल्या काही महिन्यांमध्ये कारवाई केल्याचे ऐकिवात नाही. तसेच पाेलिसांकडूनही गुटखा विक्रेत्यांवर कारवाई केल्याचे दिसून आले नाही. बेकायदा गुटख्याची विक्री सुरू असताना अन्न प्रशासन आणि पोलिस प्रशासन याकडे दुर्लक्ष का करतंय? असा प्रश्न अनेकाकडून उपस्थित केला जात आहे.  दर्गम भागातील नागरिक बाजारात आपला शेती माल विक्रीसाठी आल्यानंतर जुगार, सट्टा याला बळी पडून रिकाम्या हाती घरी जाताना दिसत आहे. वरिष्ठ पातळीवरुन यासाठी कारवाई होणे आवश्यक आहे.  शाळकरी मुलेही व्यसनाधीन गेल्या काही वर्षांत गुटख्याच्या व्यसनामुळे तोंडाचा कर्करोग होण्याचे प्रमाण वाढल्याचे डॉक्टर सांगत आहे. त्यामुळे अश्या पदार्थांचे सेवन न करण्यासाठी जनजागृती करण्याचे सरकारचे राज्य पातळीवर प्रयत्न सुरू आहेत. मात्र, प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे शहरात विक्रीसाठी गुटखा सहज उपलब्ध होत आहे. परिणामी शाळकरी मुलेही व्यसनाधीन होत आहे.

 

0 9 3 7 4 2
Users Today : 23
Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *