बुलढाणा : ( खोज मास्टर ) अकील शाह
इतिहासात प्रस्थापित विरुद्ध विस्थापित असा संघर्ष सतत पहावयास मिळतो. आदिवासी समाजाला विकासाच्या मुख्य प्रवाहात येण्यासाठी शिक्षणाशिवाय पर्याय नाही, असे प्रतिपादन श्री शिवाजी शिक्षण संस्था अमरावतीचे कार्यकारिणी सदस्य हेमंत काळमेघ यांनी केले.महाराष्ट्र राज्य विर एकलव्य आदिवासी अधिकारी कर्मचारी संघटना यांच्यावतीने बुलढाणा आदिवासी
भिल्ल साहित्य संमेलन व जनजागर मेळावा उत्साहात पार पडला. स्थानिक राजे गार्डन लॉन्स येथे आयोजित मेळाव्याचे उद्घाटन हेमंत काळमेघ यांच्या हस्ते झाले. यावेळी ते बोलत होते. मेळाव्याच्या अध्यक्षस्थानी डॉक्टर गायकवाड,अनिरुद्ध छत्रपती संभाजीनगर हे होते. यावेळी आदिवासी विकास प्रकल्प विभागाच्या सह उपायुक्त श्रीमती जागृती कुमरे, तहसीलदार छाया पवार, राज्य संघटनेचे सचिव प्राचार्य डॉ. नानासाहेब गायकवाड, बुलढाण्याचे माजी आमदार विजयराज शिंदे, स्वागताध्यक्ष प्रा. दिलीप मोरे, जगदेवबाहेकर, अॅड अमोल बल्लाळ, अॅड. सतीशचंद्र रोठे, रामेश्वर युनाते, साहित्यिक वारूदादा सोनवणे, सुनील सोनवणे, प्राचार्य गोविंद गायकी, विमल भिल, निलेश भिल, डॉ. पंडित मोरे यांच्यासह संघटनेचे पदाधिकारी, समाज बांधव बहुसंख्येने उपस्थित होते.आद्य क्रांतिवीर तंट्या भिल्ल विचारपीठ मंचावरून हेमंत काळमेघ यांनी उपस्थित आदिवासी समुदायाला मार्गदर्शन केले. यावेळी त्यांनी आदिवासी समुदायाला विकासाच्या मुख्य प्रवाहात आणण्याची गरज व्यक्त केली. विकासाच्या मुख्य प्रवाहात येण्यासाठी आदिवासी समाजाला शिक्षणाशिवाय तरणोपाय नाही, असे काळमेघ म्हणाले. विजयराज शिंदे यांनीआदिवासींच्या विकासासाठी शासन स्तरावर पाठपुरावा करण्यासाठी कटिबद्ध असल्याचे सांगितले. दिलीप मोरे यांनीही यावेळी मार्गदर्शन केले.कार्यक्रमापूर्वी स्थानिक भिलवाडा परिसरातून दुचाकी मिरवणूक काढण्यात आली. यावेळी देण्यात आलेल्या, ‘तंट्या भिल्ल की जय, जय एकलव्य, बिरसा मुंडा की जय, भारत माता की जय’ या घोषणानी बुलढाणा नगरी दुमदुमली. चिखली मार्गावरील जगदंबा देवी संस्थान येथे एकलव्य व तंटे भिल्लच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून या मिरवणुकीचे रूपांतर ग्रंथदिंडीत झाले. समाजाची मातृसत्ताक पद्धती लक्षात घेऊन महिलांच्या हस्ते दिंडी काढण्यात आली. याप्रसंगी एकलव्य समाजभूषण, आदिवासी मित्र, माता शबरी समाज रत्न पुरस्काराचे वितरण करण्यात आले. पुरस्कारप्राप्त विमल भिल यांनी बोलीभाषेत आपले मनोगत व्यक्त केले. यावेळी कवी संमेलन व परिसंवाद पार पडले. प्राचार्य गायकवाड यांनी प्रास्ताविक केले, तर संचालन प्रा. संजय पवार, प्रा. श्रद्धा गायकवाड, प्रा. मंजुश्री खोब्रागडे व सौ. इंगळे यांनी केले.
Users Today : 23