वाढत्या कोविड संसर्गामुळे निर्देश जारी

Khozmaster
2 Min Read

बुलडाणा, दि. 5 : जिल्ह्यात कोविड आणि इन्फ्ल्युएंझा आजाराच्या रूग्णांमध्ये वाढ होत असल्याचे निदर्शनास आले आहे. संसर्ग वाढू नये, यासाठी नागरिकांनी शासनाने दिलेल्या निर्देशाचे पालन करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. ह. पि. तुम्मोड यांनी केले आहे.संसर्गाला आळा घालण्यासाठी गर्दी आणि बंदिस्त ठिकाणी विशेषत: सहव्याधी असणाऱ्या व्यक्ती आणि वृद्धांनी जाणे टाळावे. डॉक्टर, पॅरामेडिकल, रुग्ण आणि त्यांच्या नातेवाईकांनी आरोग्य सुविधा देताना रुग्णालयात मास्क घालावे. गर्दीच्या ठिकाणी आणि बंदिस्त ठिकाणी मास्क वापरावे. शिंकताना किंवा खोकताना नाक आणि तोंड झाकण्यासाठी रुमाल, टिश्यू वापरात आणावे. हाताची स्वच्छता राखणे, वारंवार हात धुणे, सार्वजनिक ठिकाणी थुंकणे टाळावे, चाचणी करण्यावर भर देणे आणि लक्षणांचा लवकर अहवाल देण्यात येणार आहे. श्वसनाच्या आजाराने ग्रस्त असल्यास वैयक्तिक संपर्क मर्यादित करावा, तसेच जिल्ह्याच्या ठिकाणी नियंत्रण कक्ष सुरु करण्यात येणार आहे. राज्यातील कोविड-19 रुग्णांमध्ये सातत्याने वाढ होत आहे. त्याअनुषंगाने रुग्णालय स्तरावर आणि कार्यक्षेत्रात भेटी दरम्यान आरोग्य कर्मचारी यांनी आयएलआय, सारीसारख्या आजाराची लक्षणे असलेल्या रुग्णांची तपासणी करणे आवश्यक आहे. त्याचप्रमाणे वर्गीकरणानुसार आणि इन्फ्ल्युएंझा -एच्या चाचणीच्या मार्गदर्शक तत्वानुसार एचवन एनवन आणि एचथ्रीएनथ्रीसाठी तपासणी करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.कोविड-19 व्यवस्थापन, इन्फ्ल्युएंझा -ए व्यवस्थापन दोन्ही आजारसोबत असतील, तर त्याच्या व्यवस्थापनाच्या सुचनेचे पालन करावे लागणार आहे. यासाठी रुग्णालयात ऑक्सीजनची पुरेशा प्रमाणात साठवणूक असावी लागणार आहे. प्रत्येक संस्थानिहाय माहिती तयार करुन कोविड पोर्टलवर टाकण्याच्या सूचना करण्यात आल्या आहेत. यासाठी कोविड रुग्णालय आणि वैद्यकीय महाविद्यालयाचा सहभाग घेण्यात येणार आहे.राज्यात चाचण्यांचा दर कमी झाला आहे. चाचण्यांचा दर दशलक्ष लोकसंख्येमागे 140 प्रतिदिन असणे आवश्यक आहे. तसेच घरी विलगीकरणाच्या सूचनांचे तंतोतंत पालन करावे, रुग्णांच्या सहवासिताचा शोध घेऊन मार्गदर्शक सुचनांनुसार चाचण्या करण्यात येणार आहे. रुग्णालयात औषधी आणि साहित्य उपलब्ध राहिल, याची खातरजमा करणे आवश्यक आहे. उपलब्ध कोव्हॅक्सीन पूर्णपणे वापरात येईल, यासाठी नियोजन करण्यात येणार आहे. लोकांमध्ये आजाराच्या प्रतिबंधात्मक उपाययोजनाबाबत जागरूकता वाढविण्यात येणार आहे. विविध माध्यमातून जनजागृती करण्यात येणार आहे. कोविड आणि इन्फ्युएंझा या दोन्ही आजाराचा प्रसार थांबण्यासाठी मार्गदर्शक बाबींचे नागरिकांनी पालन करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

 

0 9 3 7 4 2
Users Today : 23
Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *