श्री क्षेत्र संगमेश्वर महादेव मंदिर ट्रस्टची धर्मदाय आयुक्तांकडून दखल
सोयगाव प्रतिनिधी गोकुळसिंग राजपूत जामनेर तालुक्यातील पहूर येथील देवळी आणि गोगडी या पवित्र नद्यांच्या संगमावर वसलेल्या श्री क्षेत्र संगमेश्वर महादेव मंदिर येथे ट्रस्टने कोणतीही समिती स्थापन केलेली नसताना बेकायदेशीररित्या स्थापन झालेली स्वयंघोषित आरती समिती चौकशीच्या फेऱ्यात अडकली आहे . श्री क्षेत्र संगमेश्वर महादेव मंदिरात काही दिवसांपासून आरतीला येणाऱ्या बाबुराव घोंगडे , अजय देशमुख यांनी ट्रस्टची कोणतीही परवानगी न घेता आरती समिती स्थापन करून त्या माध्यमातून देणगी जमा करणे , पावती पुस्तक छापणे , कार्यक्रमांचे आयोजन करणे यासारखे प्रकार सुरू केले .एवढेच नाही तर श्रीक्षेत्र संगमेश्वर महादेव मंदिर ट्रस्ट ( २३ / १ / २००६ रजी . नं .ई १०८६ जळगांव ) अस्तित्वात असताना एकाच मंदिरावर ॐ श्री . संगमेश्वर महादेव व गुपित महादेव असा नावात फेरबदल करून धर्मदाय आयुक्त यांच्या कार्यालयात प्रस्तावही दाखल केला . श्री क्षेत्र संगमेश्वर महादेव मंदिर व गुपित महादेव मंदिर ही दोघे मंदिर वेगवेगळ्या ठिकाणी असून त्यांच्यात ३ किलोमीटर पेक्षा जास्त अंतर आहे . विशेष म्हणजे पहूर -कसबे ग्रामपंचायतीने दिलेल्या ठरावात श्री क्षेत्र संगमेश्वर महादेव मंदिराचा कुठलाही उल्लेख नाही . तोच ठराव धर्मदाय आयुक्तांना सादर केलेल्या प्रस्तावात जोडला आहे . त्यामुळे भाविकांची व प्रशासनाची देखील दिशाभूल होत आहे . या प्रस्तावास ट्रस्टने हरकत नोंदवली असून प्रस्ताव रद्द करण्याची मागणी करण्यात आली आहे . समितीची गरज काय ?श्री क्षेत्र संगमेश्वर महादेव मंदिर ट्रस्ट अस्तित्वात असताना ट्रस्टच्या माध्यमातून नित्यनेमाने विविध धार्मिक उपक्रम होत असताना समिती स्थापन करण्याचा नेमका हेतू काय ? याविषयी भाविकांच्या मनात संभ्रम निर्माण झाला आहे . क्षेत्र संगमेश्वर महादेव मंदिरचे अध्यक्ष तथा मंदिराचे पुजारी शिवभक्त रंगनाथ महाराज यांनी ट्रस्टतर्फे ग्रामविकास मंत्री ना . गिरीष महाजन , पालकमंत्री ना . गुलाबराव पाटील , जिल्हाधिकारी अमन मित्तल , पोलीस अधीक्षक एम . राजकुमार , जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ .पंकज आशिया ,हिंदू जनजागृती समिती , महाराष्ट्र मंदिर महासंघ यांच्यासह स्थानिक पातळीवर देखील लेखी निवेदने सादर केलेली आहेत .सहाय्यक धर्मदाय आयुक्तांकडून दखल -श्रीक्षेत्र संगमेश्वर महादेव मंदिर ट्रस्टने सादर केलेल्या लेखी निवेदनाची सहाय्यक धर्मदाय आयुक्त कार्यालय जळगाव यांच्याकडून दखल घेण्यात आली असून आरती समिती अखेर चौकशीच्या फेऱ्यात अडकली आहे . विकास कामांसाठी ट्रस्ट बदलविण्याची गरज काय ?केंद्र आणि राज्य सरकार धार्मिक वारसा स्थळे , गडकिल्ल्यांसह ऐतिहासिक ठिकाणे , मंदिरांच्या संवर्धन -संरक्षण आणि विकास कामांसाठी भरीव निधीची तरतूद करीत आहे . श्री क्षेत्र संगमेश्वर महादेव मंदिर ट्रस्ट देखील आज पावेतो लोकसहभागातून विकास कामे करत आले आहे . शासनाचा कोणताही निधी आजपर्यंत ट्रस्टला मिळालेला नाही . शासनाचा निधी मंजूर होण्यासाठी एकाच मंदिरावर नवीनच ट्रस्ट स्थापन केली पाहिजे का? असा सवाल संतप्त भाविकांमधून केला जात असून हे प्रकार त्वरित न थांबल्यास संवैधानिक मार्गाने जनांदोलनाचा इशारा भाविकांनी दिला आहे .
Users Today : 4